मुख्यमंत्री महोदय, आपल्या शब्दाला की जागणार?, भाजपचा सवाल

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 29 September 2020

कोला जिल्‍ह्यासह विदर्भातील अनेक भागात अतिवृष्टी आणि सातत्याने पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी जिरायती २५ हजार आणि बागायती ५० हजार रुपये द्यायला हवे, असे म्हणणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आपल्या शब्दाला कधी जागणार? असा सवाल भाजपने केला आहे.

अकोला : अकोला जिल्‍ह्यासह विदर्भातील अनेक भागात अतिवृष्टी आणि सातत्याने पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी जिरायती २५ हजार आणि बागायती ५० हजार रुपये द्यायला हवे, असे म्हणणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आपल्या शब्दाला कधी जागणार? असा सवाल भाजपने केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाला जागत तातडीने मदत देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे केली आहे. आ. सावरकर यांनी म्हटले की, विदर्भ आणि राज्यातील अनेक भागातील या खरीप हंगामात लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी आणि सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेला परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर मार्च व एप्रिल २०२० मध्ये प्रचंड वेगाचा वादळी वारा, अवकाळी पाऊस व रब्बी हंगामातील काढणी करुन ठेवलेल्या आणि काढणीस आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकांसह आंबा, संत्रा, केळी, भाजीपाला, कांदा लिंबूचे नुकसान झाले.

आता पुन्हा पश्चिम विदर्भातील अनेक भागात खरीप हंगामात पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, कपाशी तसेच भाजीपाला आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

यापूर्वी नोव्हेंबर २०१९ आणि मार्च व एप्रिल २०२० असे तीन वेळा नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना अद्याप हेक्टरी २५ व ५० हजार तर सोडाच. परंतु दमडीचीही मदत दिलेली नाही.

शेतकरी वंचित
मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 'कोणतीही अट न घालता हेक्टरी २५ हजार आणि ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे असे म्हटले होते. मात्र मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यावर ठाकरे यांना आपल्या वक्तव्याचा सोयीस्कर विसर पडला असून अद्याप शेतकऱ्यांना दमडीचीही मदत दिली नाही.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Mr. Chief Minister, will you live up to your word ?, BJPs question