महानगरपालिकेनेच अडविला रस्ता

मनोज भिवगडे
Friday, 6 November 2020

जेल चौक ते टॉवरपर्यंतच्या उड्डाण पुलाच्या बाजूने रस्ता रुंदीकरणासह सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महानगरपालिकाच अडसर ठरत असल्याची माहिती आहे.

अकोला : जेल चौक ते टॉवरपर्यंतच्या उड्डाण पुलाच्या बाजूने रस्ता रुंदीकरणासह सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महानगरपालिकाच अडसर ठरत असल्याची माहिती आहे.

हा रस्ता तयार करण्यासाठी बस स्थानक ते टॉवरपर्यंतचे अतिक्रमण काढण्याबाबत वर्षभरापूर्वी दिलेल्या पत्रावर मनपा प्रशासनाकडून अर्धवट कारवाई करण्यात आल्याने रस्त्याचे काम थंडबस्त्यात पडले असल्याचे पत्र पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अकोला मनपाला दिले आहे.

अकोला शहरातील वाढत्या वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी व शहरातून होणाऱ्या जड वाहतुकीचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून जेल चौक ते टॉवर चौकापर्यंत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने नागरिकांना ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रोड तयार करणे आवश्यक होते.

मात्र अद्यापही हा रस्ता तयार न झाल्याने कंत्राटदाराला यापूर्वी नोटीसही बजावण्यात आली होती. अद्यापही नागरिकांना या रस्त्याने धुळ खातच जावे लागत आहे. मात्र या रस्त्याच्या दुर्तफा असलेले अतिक्रमणच रस्ता रुंदीकरणाच्या कामातील अडथळा ठरत आहे. यापूर्वी मनपाने अतिक्रमण निर्मुलनासाठी केलेली अर्धवट कारवाई थांबविल्याने रस्त्याचे सर्व्हिस रोडचे काम सुरूच होऊ शकले नाही.

दोन वर्षांपूर्वीच दिले होते पत्र
उड्डाण पुलाच्या कामात व सर्व्हिस रोड तयार करण्यात अतिक्रमणाची अडचण येत असल्याचे पत्र १२ फेब्रुवारी २०१९ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अकोला मनपाला दिले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी यासंदर्भात अतिक्रमण हटविण्याचे आदेशही दिले होते. थातुरमातूर कारवाई करण्यात आली. त्यानंतर हा विषय पुन्हा थंडबस्त्यात पडला. तेव्हापासून अकोलेकर या रस्त्याने जाताना धुळ खात आहेत.

नऊ महिन्यानंतरही सभामंडपाचा पाळणा हलेना!

पुन्हा दिले महापौरांना पत्र
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक व प्रकल्प संचालक व्ही.पी.ब्राह्मणकर यांनी २८ ऑक्टोबर २०२० रोजी महापौरांच्या नावाने पत्र देवून रस्त्या रुंदीकरणात अतिक्रमणाची येत असलेली अडचण दूर करण्याबाबत सूचित केले आहे. यापूर्वी १२ फेब्रुवारी २०१९ रोजीही याच आशयाचे पत्र मनपाला देण्यात आले होते. त्यामुळे आता मनपा याबाबत कोणता निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गांधी-जवाहर पार्क, बाजोरिया मैदानाची आवार भिंत पाडणार
उड्डाण पुलाच्या बाजूने सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी खासगी व्यक्तींनी केलेल्या अतिक्रमणासह महानगरपालिकेच्या मालकी हक्काचे गांधी-जवाहर पार्क व जनता भाजी बाजाराला लागून असलेल्या बाजोरीया विद्यालय क्रीडांगणाची आवार भिंत अडसर ठरत आहे. या दोन्ही आवार भिंती काढून सर्व्हिस रोडसाठीचा मार्ग मोकळा करावा, असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Municipal Corporation blocked the road