सरकारी कार्यालयातील खासगी दलालांचा सुळसुळाट

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 9 November 2020

कामगार कल्याण मंडळ कार्यालयातील खासगी दलालांचा सुळसुळाट थांबविण्याची मागणी भाजप अल्पसंख्यांक मोर्चा अकोला महानगरच्या वतीने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

अकोला,  ः कामगार कल्याण मंडळ कार्यालयातील खासगी दलालांचा सुळसुळाट थांबविण्याची मागणी भाजप अल्पसंख्यांक मोर्चा अकोला महानगरच्या वतीने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

शासनाने गरीब व मजूर कामगारांना विविध योजनेचे लाभ मिळण्याकरिता कामगार कल्याण मंडळ अधिकारी कार्यालयाची स्थापना केली आहे. त्याकरिता सदर कामगार मंडळात कामगारांची नोंदणी करणे व नुतनीकरण करणे आणि सदर कार्यालयाच्या मार्फत मजूर कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात येत असते. त्याकरिता मजुर वर्ग आपली मजुरी सोडून सदर कार्यालयात नोंदणीकरिता, नुतनीकरणाकरिता किंवा साहित्य घेण्याकरिता सदर कार्यालयात यावे लागते.

तरी सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे असते. परंतु सदर कार्यालयातील कर्मचारी वर्ग हे कामगार मजुरांसोबत सहकार्याची भावना न ठेवता त्यांच्याशी सापत्न वागणुक देवून ते ज्या कामाकरिता सदर कार्यालयात येतात त्याबाबत त्यांना कोणतीही माहिती किंवा सहकार्य न करता कार्यालयातून हाकलून देतात.

ज्याचा गैरफायदा काही दलाल लोक घेतात. याच मुख्य कारण हेच आहे की, सदर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही दलाल वर्ग सदर कार्यालयात सक्रिय केलेला आहे. ते कामगारांकडून पैसे उकळून सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी साटेलोटे करुन त्यांना पैसे पुरवून कामे करण्यात येत आहे.

या गंभीर प्रकरणी मजूर वर्गाची समस्या लक्षात घेता कामगार कल्याण मंडळ कार्यालयातील खासगी दलालांवर त्वरीत आळा घालण्याची मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे सरचिटणीस जाकीर खान बिसमिल्ला खान, जुने खान, मोहम्मद शाहरुख, इमरान खान, बाबुराव सिरसाट, अकबर खान, एजाज खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रती कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव कामगार मंत्रालय, मुंबई, विभागीय आयुक्त अमरावती यांना माहिती व उचित कार्यवाहीकरिता अग्रेषित करण्यात आल्या आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The proliferation of private brokers in government offices