तूरीने केली यंदा चिंता दूर, विक्रमी भावाकडे वाटचाल पण शेतकऱ्यांना फायदा किती?

Akola News: Record increase in toor price this year
Akola News: Record increase in toor price this year

अकोला: शेतमलाला किफायतशीर किंमत मिळाल्यास शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे नफा मिळतो. शेतमाल दिर्घकाळ टिकवून ठेवता येत नसल्याने जवळच्याच बाजारात विक्रीसाठी जातो. अद्यापही मोठ्या प्रमाणात परंपरागत पध्दतीच्या विक्रीमुळे  शेतमालाला मिळणारी किंमत किफायतशीर नसल्याचीच दिसते.

असे असले तरी यंदा कधी नव्हे ते तूर उत्पादक शेतकऱ्यांना 'सुगी'चे दिवस आल्याचं सध्याचं चित्रं आहे. मात्र, बाजारातील आवक वाढल्यानंतर महिनाभरात भाव स्थिर होण्याची शक्यता आहे. सध्या तुरीला सरासरी 8500 रुपये भाव मिळत असून लवकरचं हा भाव 10 हजार रुपये गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने आणि नव्या हंगामातील तुरीची आवक होण्यास बराच वेळ असल्याने दरात वाढ झाली आहे.

यावर्षी कोरोनामुळे शेतकरी अगदी देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील शेतकरी यावर्षी कोरोनामुळे पडलेले बाजारभाव आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मुग, संत्रा, भाजीपाला अशी हातून गेलेली पिके यामुळे निराशेच्या गर्तेत सापडला आहे.

या कठीण परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना 'आशेचा किरण' दिसतो आहे तो तुरीच्या पिकात. कारण, दरवर्षी पडणारे तुरीचे भाव मात्र गेल्या अनेक वर्षांत आता पहिल्यांदाच वधारले आहेत. यावर्षी तुरीला 5600 रूपये इतका हमीभाव आहे.

दरवर्षी शेतकऱ्यांना कसा तरी हमीभावाइतका मोबदला मिळतोय. मात्र, यावर्षी तुरीला खऱ्या अर्थाने सुगी आली आहे. सध्या तुरीला सरासरी 8500 इतका भाव मिळतो आहे.

मात्र, तुरीच्या भावातील ही तेजी तात्पूरती ठरण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. पुढच्या महिनाभरात देशभरातील नवी तूर बाजारात येईल. राज्यातील बाजारात कर्नाटक आणि राज्यातील तूर आल्यानंतर हे भाव पडण्याची मोठी शक्यता आहे.

तुरीच्या सध्या वाढलेल्या भावाचा परिणाम तुर डाळीच्या भावावर होणार आहे. ऐन दिवाळीच्या काळात तूर डाळीचे भाव यामूळे वाढणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव बाजार समितीत तुरीला विक्रमी ९२०० रुपयांचा दर मिळाला. बाजार समितीत सोमवारी (ता.५) बाजारात ४५ ते ५० क्विंटल तुरीची आवक झाली होती.

८३०० ते ८७०० रुपये दराने या तुरीची खरेदी करण्यात आली. मंगळवारी (ता. ६) मात्र आवक वाढली असताना तुरीचे दरही वधारले. मंगळवारी ८५ ते ९० क्विंटल तुरीची आवक झाली ९००० ते ९२०० या दराने व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली.

2014 ला होता उच्चांकी दर
२०१४ मध्ये तुरीला उच्चांकी १४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला होता. गेल्या वर्षी मात्र ५००० ते ६५०० रुपये दराने तुरीचे व्यवहार झाले.सोमवारी खामगाव बाजारपेठेत तुरीची ८२०० दराने विक्री झाली होती. त्यानंतर मंगळवारी यात सुमारे ६०० रुपयांची वाढ होऊन ८८०० रुपयांचा दर तुरीला मिळाल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. वाशीम बाजार समितीत तुरीला सोमवारी ८८०० पर्यंत भाव मिळाल्यानंतर मंगळवारी पुन्हा ३५० रुपयांची त्यात वाढ होऊन ९१५० रुपयांचा दर १५ ते १६ क्विंटल तुरीला मिळाला.  

मागणी पूर्ण करण्यासाठी वाढीव दराने खरेदी
यंदा व्यापाऱ्यांकडेही पुरेसा स्टॉक उपलब्‍ध नाही. नाफेडने खरेदी केलेली काही तूर लॉकडाऊनच्या काळात विकली असून काही स्टॉक त्यांच्याकडेच शिल्लक आहे. बाजारपेठेत तुरीची (डाळवर्गीय धान्याचीही) मागणी वाढलेली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आता वाढीव दराने खरेदी करीत आहे.

बाजारपेठेत सध्या सुरु असलेला ट्रेंड असाच कायम राहिल्यास आगामी आठवड्यात हा दर दहा हजारांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यताही व्यापारी सूत्रांकडून व्यक्त झाली. परंतु हे दर किती दिवस टिकतील याबाबत कुणीही शाश्‍वती द्यायला तयार सुद्धा तयार नाही.

अकोल्यात भाव पडलेलेच
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला कमाल ८००० तर किमान ६५०० आणि सरासरी ७२०० रुपये दर मिळाला. कमीत कमी दर ६५०० रुपये होता. सरासरी ७२०० रुपये दरांनी तुरीची विक्री झाली. मंगळवारी १९६ क्विंटल तूर विक्रीला आली होती.

मागील सहा वर्षांतील तुरीचे हमीभाव
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाच्या पिकांचे हमीभाव वाढविण्याचे ठोस आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या सहा वर्षांत तुरीचा हमीभाव फक्त 1500 ते 2000 रूपयांनी वाढला. राज्यात गेल्या पाच वर्षांत तुरीचा हंगाम गाजला तो मिळालेल्या कमी भावामुळे आणि खरेदीत झालेल्या गोंधळ आणि भ्रष्टाचारामुळे. दरवर्षी शेतकऱ्यांना जेमतेम हमीभावाच्या आसपास भाव मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकरी बेचैन होते. यावर्षी मात्र परिस्थिती काहीशी बदलली आहे.


वर्ष भाव (हजार)
2015-16 : 4625
2016-17 : 5050
2017-18 : 5450
2018-19 : 5675
2019-20 : 5800
2020-21 : 6000

दरवाढीची कारणे

  • नाफेडकडून तुरीची लॉकडाऊनमध्ये मोठी विक्री
  • व्यापाऱ्यांकडेही पुरेसा स्टॉक उपलब्‍ध नाही
  • बाजारपेठेत तुरीच्या मागणीत वाढ
  • नविन तूर बाजार येण्याला दोन ते अडिच महिन्यांचा कालावधी लागणार
  • सध्या बाजारात अत्यल्प आवक सुरु
  • मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने खरेदी

या भाववाढीचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा किती?
तुरीला आता विक्रमी भाव मिळत असले तरी याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार का?, हाच खरा प्रश्न आहे. कारण, राज्यातील तूर नोव्हेंबरच्या शेवटी बाजारात येते. त्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना या वाढलेल्या भावाचा लाभ होण्याची शक्यता कमीच आहे.

सध्या मागच्या वर्षीची तूर न विकलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीचा फायदा होऊ शकतो. यावर्षी शेतकऱ्यांची तूर बाजारात येईपर्यंत सध्याच्या भावात दोन ते अडीच हजारांची घट होऊ शकते असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com