बोंड अळीचा धोका वाढला, सर्व्हे करून शेतकऱ्यांना हवी आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 30 October 2020

जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असून, आर्थिक संकटात सापडत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनास अहवाल सादर करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

अकोला :  जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असून, आर्थिक संकटात सापडत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनास अहवाल सादर करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

अकोला जिल्ह्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतातूर आहे. नवीन आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत अकोला पूर्वचे आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्याकडे व्यथा सांगितल्या.

. सावरकर यांनी आज (ता. २९ ऑक्टोबर) रोजी अकोला तालुक्यातील मौजे दोनवाडा, कासली या गावांतर्गत दौरा केला असता कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. गुलाबी बोंड अळी प्रभावित या गावांमधील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना कपाशी वेचणीचा साधा मुहूर्त सुद्धा करता आला नाही,

इतकी भयावह परिस्थिती आहे. यावर्षी जिल्ह्यात सततचा पाऊस, मूग पिकावरील रोगांचा प्रदुर्भाग, कोरोनामुळे व्यवसाय, बाजारपेठा बंद अशा अनेक कारणांनी शेतकरी वर्ग आधीच अतिशय आर्थिक अडचणीत सापडला आहे. सदर प्रकरणी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत आवश्यक सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाईसाठी अहवाल शासनास सादर करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय तसेच आर्थिक नुकसानीचे आर्थिक सर्वेक्षण करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांना केली आहे.

नुकसानीची पाहणी करतेवेळी आ. सावरकर यांचे समवेत भाजप अकोला तालुका अध्यक्ष अंबादास उमाळे, तालुका आत्मा अध्यक्ष भारत काळमेघ, वसंत झटाले, श्रीकृष्ण झटाले, देवानंद झटाले, शंकरराव झटाले, मोहन पाटील झटाले, भीमराव झटाले, धनंजय झटाले, बाळू झटाले, विजय झटाले, संदीप काळमेघ आदी उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The risk of bond larvae has increased, farmers need financial help by conducting a survey