मध्यरात्री दरोडेखोरांनी अचानक केला घरावर हल्ला, डोळ्यात मिरची टाकूनही चोर पळाले

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 9 November 2020

रिसोड-मेहकर मार्गावरील ग्राम मोठेगाव नजीक असलेल्या मुलंगे फार्म हाऊसवर ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकत दीड लाखाचा ऐवज लंपास केला.

रिसोड (जि.वाशीम) ः रिसोड-मेहकर मार्गावरील ग्राम मोठेगाव नजीक असलेल्या मुलंगे फार्म हाऊसवर ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकत दीड लाखाचा ऐवज लंपास केला.

या घटनेनंतर रिसोड शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या परिवाराची चिंता सतावत आहे.

रिसोड-मेहकर मार्गावर मोठेगाव जवळ रस्त्यालगत असलेल्या शेतातील घरात अंजली मुलंगे ही महिला तिचे पती व दोन मुलांसह राहते. मध्यरात्री दरम्यान सर्व परिवार गाढ झोपेत असताना पाच ते सहा दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर अचानक हल्ला केला.

दरोडेखोरांनी घराच्या आत प्रवेश करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, महिलेसोबत त्यांच्या दोन्ही मुलांचे धाडसामुळे दरोडेखोर हे घराच्या प्रवेश करू शकले नाही. मात्र हे सर्व काही सुरू असताना काही दरोडेखोरांनी आत प्रवेश करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. चैनल गेट तोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोराच्या डोळ्यात अंजली मुलंगे यांनी मिरची पावडर फेकली.

दरोडेखोरांचा प्रतिकार मोठ्या धाडसाने मुलंगे परिवार करीत होता. मात्र शेवटी महिला व त्याचा परिवार घाबरला. दरोडेखोरांनी पूर्ण परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत जवळ असलेल्या सर्व दागिने रोख रक्कम देण्यास सांगितले.

यावर अंजली मुलंगे यांनी आपल्या अंगावरील मंगळसूत्र कानातील झुमके रोख रक्कम व तीन नामांकित कंपनीचे मोबाईल, असा दीड लाखाचा ऐवज नाईलाजाने दरोडेखोरांना स्वाधीन केला व दरोडेखोर तिथून पसार झाले.

यासंबंधी तक्रार अंजली मुलंगे यांनी रिसोड पोलिस स्टेशनला दिली असून, पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय अधिकारी पवन बनसोड, अप्पर पोलिस अधीक्षक विजय चव्हाण, प्रभारी ठाणेदार अनिल शिरसाठ यांनी त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. यादरम्यान श्वानपथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट पाचारण करण्यात आले. घटनेचा तपास पोलिस करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Robbery at home, thieves looted Rs 1.5 lakh