काटेपूर्णा प्रकल्पाचे दहा वक्रद्वार उघडले

सुगत खाडे  
Monday, 12 October 2020

जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे १०० टक्के भरलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाचे रविवारी (ता. ११) दुपारी ३ वाजता दहाही वक्रद्वार ३० सेंटिमीटरने वर उचलण्यात आले. त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून प्रशासनाने नदी काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
 

अकोला : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे १०० टक्के भरलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाचे रविवारी (ता. ११) दुपारी ३ वाजता दहाही वक्रद्वार ३० सेंटिमीटरने वर उचलण्यात आले. त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून प्रशासनाने नदी काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यात मॉन्सूनचे ११ जूनरोजी आगमन झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने प्रगती केली. त्यानंतर मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचा दावा हवामान खात्याने केला होता. असे असल्यानंतर सुद्धा जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती.

त्यामुळे धरणांची पाणीपातळी तळ गाठत होती. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील धरणांध्ये संग्रहित असलेल्या पाण्याचा वापर सुद्धा वाढला होता. शहरी व ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी साठवलेल्या पाण्याची उचल वाढली होती. धरणांच्या पाणीसाठ्यात सुद्धा घट होत होती. या स्थितीमुळे जिल्हावासियांना पेयजल संकटाला सुद्धा सामोरे जावे लागू शकते, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती.

परंतु मध्यतंरीच्या काळात जिल्ह्यात सतत पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील लघू सिंचन प्रकल्प ओव्हर फ्लो झाले, मध्यम प्रकल्पांवरुन सुद्धा पाणी ओसंडून वाहू लागले. त्यासह काटेपूर्णा प्रकल्पात सुद्धा मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने त्यामधून सुद्धा आतापर्यंत सात ते आठ वेळा पाणी सोडण्यात आले. दरम्यान रविवारी (ता. ११) जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रकल्पाचे दहाही वक्रद्वार उघडून त्यामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

वान प्रकल्पात ९८ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील इतर प्रकल्पांप्रमाणेच वान प्रकल्पात सुद्धा चांगला जलसाठा जमा झाला आहे. वान प्रकल्पात रविवारी सकाळपर्यंत ९७.१४ टक्के पाणीसाठा जमा झाला. काटेपूर्णात प्रकल्प तर सकाळपर्यंत पूर्णतः भरले होते. त्यामुळे त्यातून पाणी सोडण्यात आले. याव्यतिरीक्त उमा, निर्गुणा, मोर्णा प्रकल्प सुद्धा पूर्णतः भरले आहेत. घुंगशी बॅरेजमध्ये सुद्धा ७९.५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Ten curved gates of Katepurna project opened