चार हजाराची लाच भोवली, दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघे एसीबीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 9 November 2020

जिल्ह्यातील किन्हीराजा पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या पिंपळशेंडा येथील भावकितील महिलांमधील घरगुती वादात कारवाई टाळण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने दोन पोलिस कर्मचारी व एका खासगी इसमासह तिघांना ताब्यात घेतले.

वाशीम  ः जिल्ह्यातील किन्हीराजा पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या पिंपळशेंडा येथील भावकितील महिलांमधील घरगुती वादात कारवाई टाळण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने दोन पोलिस कर्मचारी व एका खासगी इसमासह तिघांना ताब्यात घेतले.

ही घटना ८ नोव्हेंबर रोजी किन्हीराजा येथील शुभम हॉटेल येथे घडली असून, पोलिस कर्मचारी गणेश नरवाडे व संतोष गिऱ्हे तसेच शुभम तिवारी (खासगी इसम), असे एसीबीने ताब्यात घेतलेल्या लाचखोरांची नावे आहेत.

याबाबत सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील पिंपळशेंडा येथील तक्रारदाराच्या आईचे व चुलत भावजयीचा किरकोळ घरगुती कारणावरून वाद झाला. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली होती.

याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी हेड काँस्टेबल गणेश गणपत नरवाडे तसेच पोलिस शिपाई संतोष जगदेव गिऱ्हे दोन्ही रा.महसूल कॉलोनी मालेगाव यांनी तक्रारदाराला चार हजाराची लाच मागीतली, अशी तक्रार वाशीम एसीबीकडे देण्यात आली. त्यानुसार पडताळणीनंतर सापळा रचून केलेल्या कारवाईत लाचखोर कर्मचाऱ्यांनी लाचेची रक्कम शुभम रमेश तिवारी रा.किन्हीराजा याच्याकडे देण्यास सांगीतले.

त्यानुसार भ्रमणध्वनीवरून बोलणे झाल्यानंतर शुभमने सदर रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून, दोन्ही लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यांना देखील पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले.

ही कारवाई अमरावती विभाग लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, वाशीम येथील उपअधीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोल इंगोले, पीएसआय नंदकिशोर परळकर, शेख आसिफ, नितीन टवलारकर, अरविंद राठोड, राहूल व्यवहारे, सुनील मुंदे या पथकाने केली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Two policemen and three ACBs caught