साडेसात कोटीच्या बियाण्याची माती, कंपन्यांनी दिले नऊ लाख हाती

biyane bogus.jpg
biyane bogus.jpg

अकोला : साहेब, आमच्या शेतात बियाणं उगवलच नाही हो...असा टाहो फोडत जिल्हाभरातून आठ हजार ३९ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे विविध कंपन्यांच्या निकृष्ट बियाण्याबाबत तक्रारी नोंदविल्या. या तक्रारीनुसार १३ हजार ५४ हेक्टरवर पेरलेलं सात कोटी ६३ लाख ७० हजार ८७२ रुपयांचं सोयाबीन बियाणं उगवलेच नाही. परंतु, कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार केवळ ६६१ तक्रारी सदोष असून, बियाणे कंपन्यांनी तर, १११ तक्रारीच सदोष असल्याचे मान्य करत, त्या शेतकऱ्यांना नाममात्र आठ लाख ९० हजार ६८० रुपयांचा मोबदला दिला आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव व इतर नैसर्गिक, अनैसर्गिक कारणांमुळे जिल्ह्यातील शेती नुकसानात जात आहे. यंदा मात्र पाऊसमान चांगले व पिकांना पोषक हवामान राहण्याचे संकेत हवामान विभागासह कृषी विभागाकडून मिळाल्याने, शेतकऱ्यांना खरिपातून चांगल्या उत्पादनाची व उत्पन्नाची अपेक्षा होती. त्यातही सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक जोर होता व अपेक्षेप्रमाणे दोन लाख ४८ हजार ८६३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी सुद्धा झाली. त्यासाठी जवळपास २४५ कंपन्यांकडून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले होते. मात्र त्यापैकी ९८ कंपन्यांचे जवळपास १३०५४.८५ हेक्टरवरील बियाणे उगवलेच नाही. त्याबाबत ८०३९ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी सुद्धा केल्या. मात्र त्यापैकी कृषी विभागाच्या पंचनाम्यात ६८१ व बियाणे कंपन्यांच्या पंचनाम्यात केवळ १११ तक्रारीच सदोष ठरल्या असून, इतर शेतकऱ्यांच्या बियाण्याची केवळ माती झाली आहे.


निकषांची जादू
आठ हजार ३९ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात यंदा पेरलेलं सोयाबीन बियाणं उगवलच नसल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली. तक्रारीनंतर त्यांचेपैकी अनेकांनी दुबार व तिबार पेरणी सुद्धा केली. मात्र कृषी विभागाने पंचनाम्याचे विशेष निकष लावत प्राप्त तक्रारींपैकी केवळ ६८१ तक्रारी सदोष ठरविल्या. बियाणे कंपन्यांनी तर कृषी विभागाच्याही एक पाऊल पुढे टाकत स्व निर्मित पंचनाम्याचे नियम, कायदे लावत केवळ १११ शेतकऱ्यांच्या तक्रारी सदोष ठरविल्या. त्यामुळे ही निकषांची जादू आहे तरी काय? याचा उलगडा करणे गरजेचे असून, त्याबाबत मात्र संबंधित अधिकारी व कंपन्यांनी चुप्पी साधली आहे.

कृषी विभागाच्या लेखी ३४ कंपन्यांच्या तक्रारी सदोष
जिल्ह्यात एकूण २४५ कंपन्यांचे सोयाबीन बियाणे विक्री करण्यात आले. त्यांचेपैकी ९८ कंपन्यांचे बियाणे बोगस, निकृष्ट असून ते उगवलेच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या. मात्र कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यातून केवळ ३४ कंपन्यांच्या बियाण्यांबाबत प्राप्त ६८१ तक्रारी सदोष ठरविल्या तर, केवळ पाच कंपन्यांनी १११ तक्रारी सदोष ठरवित त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना मोबदला दिला आहे. इतर कंपन्यांनी मात्र, त्यांचे कायदे, निकष लावत उर्वरित तक्रारी चुकीच्या ठरवून मोबदला देण्याबाबत हात वर केले आहेत.

तालुकानिहाय प्राप्त तक्रारी, पंचनामे व दिलेला मोबदला

तालुका प्राप्त तक्रारी कृषीचे पंचनामे कृषीच्या पंचनाम्यात सदोष बियाणे कंपनीने दिलेला रोख मोबदला
अकोला १९४३ १९४३ १५४ २३,५४४
मूर्तिजापूर २२३४ २२३४ ६७ ४,५४,२७४
बार्शीटाकळी १७१४ १७१४ ७२ ००००००
अकोट २१२ २१२ ८८ १,२४,४९०
तेल्हारा १०८७ १०८७ १८९ १,२६,१९०
बाळापूर ४२० ४२० ६६ ५५,९५०
पातूर ४२९ ४२९ ४५ १,०६,४१२
एकूण ८०३९ ८०३९ ६८१ ८,९०,८६०


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com