Sanjay-Mahajan
Sanjay-Mahajan 
अ‍ॅग्रो

विनानांगरणी तंत्र, देशी कपाशीने खर्चात केली बचत

चंद्रकांत जाधव

विनानांगरणी शेती आणि देशी वाण या दोन बाबींवर भर देत भोरटेक बुद्रुक (जि. जळगाव) येथील संजय बळीराम महाजन यांनी कपाशीची अभ्यासपूर्ण व फायदेशीर शेती करण्यास सुरुवात केली आहे. एकरी १८ क्विंटलपर्यंत उत्पादनक्षमता मिळवत संकरित वाण व मशागत, निंदणीवरील खर्चात त्यांनी महत्त्वाची बचत केली आहे. जमिनीची सुपिकता टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.

जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्‍याच्या अखेरच्या टोकाला चाळीसगाव तालुक्‍याच्या सीमेनजीक भोरटेक बुद्रुक गाव आहे. जमीन काळी कसदार, पण विहिरी, कूपनलिकांना पुरेसे पाणी नाही. अशा प्रतिकूल स्थितीत संजय महाजन प्रयोगशील शेती करीत आहेत. त्यांच्याकडे दोन विहिरी असून, १७ एकर जमीन आहे. सन २००७ मध्ये कुटुंब विभक्त झाले. सुरुवातीला त्यांचे वडील बळीराम शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन पाहायचे. संजय यांना शेती व्यवस्थापनाचा फारसा अनुभव नव्हता. मात्र, शेतीत उतरल्यानंतर ते अधिक अभ्यासू झाले. तांत्रिक बाबी त्यांनी आत्मसात करण्यास सुरुवात केली. 

यशकथांनी दिली स्फूर्ती 
महाजन ॲग्रोवनचे सुरवातीपासूनचे वाचक आहेत. जरंडी (जि. औरंगाबाद) येथील अनंत जगताप यांनी कमी लागवडीच्या अंतरात लागवड करून कापसाचे चांगले उत्पादन साधल्याची यशोगाथा त्यांनी वाचली. त्यांच्या शेताला भेटही दिली. चर्चा करून आपणही तशी फुलविण्याचे ठरवले. 

त्या वेळी कापूस हेच त्यांचे प्रमुख पीक होते. अनेक वर्षे पाच ते सात एकरांत बीटी कापूस घ्यायचे. विहिरीला पाणी कमी असल्याने पावसाचा अंदाज घेऊन, ठिबकचा वापर करून चार बाय दीड किंवा दोन फूट अंतरात लागवड व्हायची. सन २००८ मध्ये जुलैमध्ये घेतलेल्या कापसाचे एकरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले. तेव्हापासून आत्मविश्‍वास वाढला. 

ॲग्रोवन व चिपळूणकरांचे तंत्र आले कामाला 
कृषी प्रदर्शनांना भेटी देणे, ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध यशोगाथांमधील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहणे, नवनव्या कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा शोध घेणे अशी वृत्ती संजय यांनी कायमच जोपासली. सन २०१० मध्ये पुण्यातील ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. तेथे जमीन सुपीकता, विनानांगराची शेती, तण देई धन ही पुस्तके घेतली. त्यांचा अभ्यास केला. पुस्तके वाचन व प्रदर्शनाच्या निमित्ताने या पुस्तकाचे लेखक व कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांच्या संपर्कात ते आले. यातूनच विनानांगरणीची शेतीबाबत उत्सुकता वाढली. कपाशीत अशी शेती होऊ शकते का याचे कुतूहल वाढले.

लग्नाच्या प्रसंगाने घडला प्रयोग 
मनातल्या शंकांना एक दिवस खरोखरच वाट मिळाली. सन २०१४ चा मे-जूनचा काळ होता. बाजरी व मक्याचे पीक घेतल्यानंतर या तीन एकरांत मशागत करून कापूस लावण्याचे नियोजन होते. दरम्यान, पुतण्याच्या लग्नात संजय व्यस्त होते. मॉन्सूनचा पाऊस येऊन गेला. आता पुढे काय करायचे हा प्रश्न पडला. अचानक विनानांगरणी तंत्राची संजय यांना आठवण झाली. त्यांनी चिपळणूकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. चिपळूणकर यांनीही कपाशीत हा प्रयोग निश्चित यशस्वी होऊ शकतो असा धीर दिला; मग त्यांच्याच सल्ल्यानुसार तीन एकरांत विनानांगरणीने कापूस लावण केली. त्यात बाजरी व मका यांची खोडकीस अवशेष तसेच होते. ते कुजले. पुढे चांगला परिणाम दिसू लागला. त्या वर्षी बीटी कपाशीचे एकरी १० क्विंटल उत्पादन आले.

आता विनानांगरणीच होते शेती 
 महाजन आता विनानांगरणीच कपाशी घेतात. 
 पूर्वी बीटी वाण घ्यायचे. अलीकडील दोन-तीन वर्षांत देशी वाणांचा वापर सुरू केला आहे. 
 मशागत, निंदणी खर्चात त्यांनी बचत साधली आहे. 
 तणनाशकांचा वापर ते करतात. मात्र, प्लॅस्टिक व पत्र्याच्या लहान डब्याने झाडे झाकून केवळ तणांवर फवारणी होते. तीन मजुरांकरवी दोन एकर शेतात हे काम सुकर होते. पुढे मजूर झाडे झाकण्याचे काम करतात, तर मागे फवारणी सुरू असते. वाफसा मिळाल्यास तण नियंत्रण मजुरांकरवी करण्यात येते. 
 अलीकडील काळात कापसाखालील क्षेत्र कमी केले आहे. 

उत्पादन
अलीकडील काळात त्यांना फरदडीसह एकरी १७ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उत्पादनापेक्षाही खर्चात बचत होत असल्याचे महाजन यांना समाधान आहे. आपल्या भागात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव फारसा जाणवत नसल्याचे महाजन सांगतात.  
 
कापूस व्यवस्थापनातील ठळक बाबी 
 मेमध्ये कापूस लावण न करता ठिबक पसरून घेतात. पावसाने ताण दिल्यास सिंचन सुकर होते. 
 त्यांनी रासायनिक खतांचे एक मिश्रण स्वअनुभवातून तयार केले आहे. यात २०० लिटर पाण्यात एक किलो १९-१९-१९, एक किलो ०-५२-३४, दीड किलो मॅग्नेशियम सल्फेट व अर्धा किलो सल्फर यांचे द्रावण तयार केले जाते. एकरी एक ते दीड किलो याप्रमाणे साधारण चार फवारण्या त्याच्या फायदेशीर ठरतात असा त्यांचा दावा आहे. 
 शेणखतासाठी एक बैलजोडी, पाच गायी व वासरू यांचे संगोपन. बाहेरून शेणखत घेत नाहीत. पशुधनाला बारमाही हिरवा चारा मिळावा, यासाठी संकरित गवताची गोठ्यालगतच लागवड
हळद, ऊस व भाजीपाला पिकेही घेतात. कमी खर्चाची शेती म्हणून तीन एकरांत सुबाभूळ. हळदीसोबत मोसंबीही यंदा घेतली. पावसाच्या पाण्यावर ऊस रोपांची लागवड करून ती वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. कापसाची विक्री गावातच व्यापाऱ्यांना होते. भाजीपाला, हळदीची विक्री बाजार समितीत होते. 

संजय यांचे मोठे बंधू भिकन चाळीसगाव येथील ए. बी. हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यांचा मोठा आधार आहे. संजय यांना रितेश, वल्लभ व व्यंकटेश ही मुले आहेत. नोकरी व शिक्षण यात ती व्यस्त आहेत.

झालेले फायदे 
 मशागत वा नांगरणी, बैलजोडी किंवा ट्रॅक्‍टरद्वारे सऱ्या पाडणे आदींवरील सुमारे सात ते आठ हजार रुपयांच्या खर्चात त्यांनी बचत केली आहे. त्यातून श्रम आणि महत्त्वाचे म्हणजे वेळेची बचत ते साधत आहेत. पिकांचे अवशेष जमिनीला दिल्याने जमीनही सुपीक होण्याला चालना मिळाली आहे. 
 रासायनिक खतांचा वापर व पर्यायाने त्यावरील खर्चही कमी केला आहे. 
 देशी वाण असल्याने बीटी बियाण्यांवर होणारा खर्चही टाळला आहे. 

मुलांना मोठा बॅंक बॅलेंस देण्यापेक्षा प्रत्येक बापाने कमीत कमी खर्चाची सुपीक जमीन आपल्या, कुटुंबाला, मुलांना वारसा म्हणून सोपविली पाहिजे, असा विचार संजय सांगतात. 
- संजय महाजन, ९५१८७६४२९३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT