ramkrishna-garje 
अ‍ॅग्रो

शेतीला मिळतोय मधमाशीपालनाचा मोठा आधार

भैयासाहेब गायकवाड

बीड जिल्ह्यातील राजुरीमळा (ता. गेवराई) येथील वाल्मीक रामकृष्ण गर्जे यांच्या वाट्याला एकूण ६ एकर वडिलोपार्जित शेतीपैकी अडीच एकर शेती आली. गोदावरी नदीच्या काठावरील या गावामध्ये विहिरीलाही पाणी तसे वर्षभर पुरते. पाण्याची सोय असल्याने वाल्मीक हे दरवर्षी टरबूज आणि खरबुजाची लागवड करतात. भरपूर शेणखत घालून गादीवाफे तयार केल्यानंतर त्यावर प्लॅस्टिक मल्चिंग करतात. त्यावर लागवड करूनही उत्पादन तुलनेने कमी (८ ते १० टन) येत होते. उत्पादन वाढण्याच्या उद्देशाने  खामगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये भेट दिली. तेथील डॉ. एन. के. भुते यांनी त्यांना परागीकरण, फुलोरा आणि फळांची संख्या यांचे गणित उलगडून दाखवले. कमी खर्चामध्ये सातेरी मधमाशीपालनाविषयी माहिती दिली. अधिक प्रशिक्षण घेण्यासाठी लातूर येथील दिनकर पाटील यांचे नाव सुचवले. पाटील हे उत्तम मधमाशीपालक असून, त्यांच्याकडे ३ हजारांपेक्षा अधिक मधपेट्या आहे. त्यांच्याकडे आठ दिवस पूर्णवेळ राहून संपूर्ण मधमाशीपालनाची माहिती घेतली. या प्रशिक्षणासाठी त्यांनी काही मोबदला घेतला नाही. अशा प्रकारे त्यांना मधमाशीपालनाची गोडी लागली. सुरुवातीला केवळ पाच मधपेट्या घेत वाल्मीक यांनी सुरुवात केली. केवळ शेतीतील उत्पादनवाढीसाठी सुरू केलेल्या या पूरक उद्योगातून त्यांचे उत्पादन तर वाढले; पण आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांचाही फायदा होऊ लागला. यातून त्यांच्याकडे मधपेट्यांची मागणी वाढत गेली. आता त्यांच्या पेट्या बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांतही जातात. 

प्रचार आणि प्रसार हाच आधार 
गोदाकाठचे गाव असल्याने आजूबाजूला झाडझाडोरा, फुले यांची उपलब्धता होती. शिवारामध्ये डाळिंब, टरबूज, खरबूज आणि कांदे यांचे मुख्य उत्पादन घेतले जाते. त्यामुळे मधमाश्यांसाठी अन्नाची कमतरता भासत नाही. शेतीतील उत्पादनासाठी मधमाश्या किती महत्त्वाच्या आहेत, याविषयी आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी ते सातत्याने बोलत असतात. सातेरी मधमाशीचे शास्त्रीय व यशस्वी संगोपन, परागीभवनाचे  महत्त्व याबाबत ते शेतकऱ्यांनी जागृत करतात. त्यातून हानिकारक ठरणाऱ्या कीडनाशकांचा वापर कमी होण्यास मदत होत आहे. यातून मधमाशीचा मृत्यूदर कमी करण्यात यश आले आहे. वाल्मीक आता मधमाशीपालनाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. 

मधपेट्यांतून उत्पन्न
 मधपेट्या भाड्याने देण्यासाठी हंगामनिहाय, कालावधीनुसार दर कमी अधिक आहेत. पावसाळ्यामध्ये त्याचा दर हा दीड ते दोन हजार असतो. तर रब्बी, उन्हाळ्यामध्ये अधिक मागणीच्या काळात तो २२०० रुपये प्रतिपेटी असा राहतो. 
 कोल्हापूर येथून मागवलेल्या लाकडी पेट्यांची किंमत ही २००० रुपये पडते. त्यातही लाकडानुसार फरक असतो. सागवानी पेट्या २५०० रुपये पडतात. हा खर्च वाचवण्यासाठी स्वतः मधपेट्या तयार केल्या. त्या केवळ १५०० रुपयांत पडल्या. मात्र, पावसाळ्यांमध्ये त्या फुगून वेड्यावाकड्या होत असल्याने पुन्हा मधपेट्या विकत घेत आहे. 
 भाड्याने देण्याच्या व्यवसायातून प्रति मधपेटी १२ ते १५ हजार रुपये उत्पन्न प्रतिवर्ष मिळत असल्याचा वाल्मीक यांचा अनुभव आहे. 

मधमाशीपालनामुळे शेती उत्पादनात वाढ

 पूर्वी टरबुजाचे केवळ ८ ते १० टनांपर्यंत उत्पादन मिळत असे. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये टरबुजाचे उत्पादन खरिपात १५ ते २० टन, उन्हाळ्यात २५ ते ३० टन पोचले आहे. खरबुजाचे उत्पादनही १० ते १५ टनांपर्यंत पोचले आहे. अन्य मल्चिंग, शेणखत वगैरे बाबी समान असताना केवळ परागीकरणामुळे उत्पादनामध्ये ३५ ते ४० टक्के वाढ झाल्याचे वाल्मीक सांगतात.  

 टरबुजाला सरासरी ८ हजार रुपये प्रतिटन दर मिळतो. त्यातून एकरी ४५ हजार रुपये खर्च वजा जाता १.५ ते २ लाख रुपये उत्पन्न मिळते. मात्र, या वर्षी खरिपामध्ये लागवड करणे शक्य झाले नव्हते. आता जानेवारीमध्ये लागवडीचे नियोजन केले आहे.  

 कृषी विज्ञान केंद्र, खामगाव येथील कीटकशास्त्र विशेषज्ञांसह, समन्वयक डॉ. अजय किनखेडकर, डॉ. हनुमान गरुड यांचे मार्गदर्शनही मिळत असते.  

कुटुंबाची साथ 
मधमाशीपालनासह शेतीमध्ये पत्नी जयश्री  यांची मदत होते. मुले पार्थ आणि प्रज्ञा अद्याप लहान असून, ते शाळेत जातात. त्यांच्या  शिक्षणासाठी प्रतिवर्ष एक लाख रुपयांची तजवीज करणे शक्य होत आहे. 

सातेरी ही मधमाशी माझ्यासाठी खरी लक्ष्मी ठरली आहे. केवळ शेतीतून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे तसे अवघडच ठरले असते.  माझ्या परिवाराच्या सुख समाधानामध्ये मधमाशीपालनाचा मुख्य वाटा आहे. मधमाशीपालनाकडे वळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र, खामगाव येथील तज्ज्ञांचाही त्यात मोठा वाटा आहे. 
- वाल्मीक गर्जे

मधपेट्या केवळ परागीकरणासाठी
मधमाशी पेट्यांतून मधाचे उत्पादन घेण्याऐवजी त्यांनी पेट्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. कारण मधाचे उत्पादन घेतल्यास माश्यांची संख्या फारशी वाढत नाही. पाच पेट्यांपासून सुरू केल्यानंतर आता त्यांच्याकडे ६० पेट्या आहेत. ते विविध शेतकऱ्यांना मधपेट्या भाड्याने देतात. 

शेतकऱ्यांच्या ओळखीतून आणखी शेतकरी मिळत गेले. त्यांच्या संपर्कात आता १०० शेतकरी आहेत. एकेकाळी शेतीला पूरक म्हणून सुरू केलेला व्यवसाय मुख्य व्यवसाय बनला आहे. 

मधपेट्यांमध्ये मधमाश्यांची संख्या अधिक ठेवत, बागेमध्ये परागीकरणाची  शाश्वती देतात. 

भेट देऊन साफसफाई, स्वच्छता आणि मधमाश्यांच्या आरोग्याची पाहणी करतात. राणी व अन्य माश्या योग्य स्थितीत आहेत का, याकडे लक्ष देतात. 

मधमाश्यांची मरतूक झाली असल्यास ती कशामुळे झाली, याची पाहणी करतात. त्या बाबी टाळण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे लागते. मधपेट्यांची वाहतूक ही रात्रीच्या वेळीच करावी लागते.

 वाल्मीक गर्जे, ७८८७३६३८३२, (लेखक भैयासाहेब गायकवाड हे कृषी विज्ञान केंद्र, खामगाव येथे विषय विशेषज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT