विवेक दळवे पारंपरिक पिकांबरोबरच विविध पिकांचे प्रयोगही करतात.
विवेक दळवे पारंपरिक पिकांबरोबरच विविध पिकांचे प्रयोगही करतात. 
अ‍ॅग्रो

युवकाने शोधल्या नव्या वाटा, इतरांसाठी झाला प्रेरणादायक

रमेश चिल्ले

विकासाचा राजमार्ग शोधायचा तर वेगळी वाट शोधावीच लागते. लातूर जिल्ह्यात कायम दुष्काळी औसा तालुक्यातील करजगाव येथील विवेक विठ्ठल दळवे या युवकाने शेतीत स्वतःचा प्रगतिपथ तयार केला आहे. प्रचंड आत्मविश्वास व सकारात्मता या बाबींच्या जोरावर विविध पिकांसह रेशीम शेतीत त्याने आगेकूच केली आहे. शेतकरी गट तयार करून त्यांनाही आधुनिकता व प्रयोगशीलतेची प्रेरणा दिली आहे. 

लातूर जिल्ह्यात कायम दुष्काळी अौसा तालुक्यात दोनेक हजार लोकवस्तीचे, डोंगरकुशीत विसावलेले व विकासापासून मैलोदूर असलेले गाव म्हणजे करजगाव. येथील विवेक दळवे या तरुणाने मात्र गावात शेतीचे सकारात्मक चित्र तयार केले आहे. बारावीत फलोत्पादन विषय घेऊन पास झाल्यावर विवेकने पनवेल (मुंबईनजीक) खासगी कंपनीत चारेक वर्षे नोकरी केली. मात्र त्याला शेतीसारखी खुणावू लागलेली. गावी आला की पाय शेतीबाहेर पडतच नसे. 

घरची परिस्थिती
वडिलोपार्जित हलकी मध्यम सोळा एकर शेती. त्यात एक-दीड एकर माळरान. पाण्यासाठी विहीर व बोअर वडिलांनी घेतलेले. सोयाबीन, तूर, हरभऱ्यातून अशा बेभरवशाच्या पाऊसकाळात व बाजारभावाच्या काळात फारसे मागे काही उरत नसे. मुलांची शिक्षणं, लग्ने, आजारपण, कपडालत्ता यासाठी बॅंक, सोसायटीचे कर्जदार होण्यावाचून गत्यंतरच नसायचे. नवीन काही करावे तर भांडवलाची चणचण. भूकंपाच्या काळात शेतातच पत्र्याचे शेड मारून संसार थाटलेला. 

शेतीचा व्यासंग
अशा परिस्थितीत आई-वडिलांचा विरोध पत्करून विवेकने नोकरी सोडलेली. नवीन काही करू पाहात होता. नवीन विचार करणाऱ्यावर खरे म्हणजे जबाबदारी जास्त पडते. तो जे घडवतो आहे त्यावर अनेक बाजूंनी त्याने विचार केलेला असतो. समवयस्क मित्रांबरोबर प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहणे, शेतीविषयक पुस्तके वाचणे, तज्ज्ञांशी संपर्क, कृषी प्रदर्शनांना भेटी आदींच्या माध्यमातून विवेकने शेतीचा व्यासंग वाढवला. 

प्रयोगांना सुरवात
आधुनिक शेती करायची तर पाणी हवे. ते पुरवून वापरण्यासाठी अडीच एकरांवर २०१११-१२ मध्ये ठिबक केले. त्यात एकरभर बटाटा लावला. तो दहा टन निघाला. पण दर मिळाला नाही. खर्च तेवढा निघाला. पुढे तेवढाच कांदा केला. तोही तेवढाच निघाला. त्यातून पंधरा हजार शिल्लक राहिले. पण माघार घेईल तो विवेक कसला? आईवडील नव्या धाडसांना रोखू पाहात होते. पण त्याने आणखी एक संधी मागितली. तिसऱ्या वर्षी पुन्हा अडीच एकरांवर ठिबक करून पॉली मल्चिंगवर बाजारात मागणी असलेल्या जातीचे कलिंगड लावले. सन २०१३ ची ही गोष्ट. मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये साडेनऊ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. एकरी बारा टनांप्रमाणे उत्पादन व उत्पन्न हाती लागले.

चार टन स्थानिक मार्केटला विकला. पन्नासेक हजार खर्च वगळता अडीच लाख रुपये तीन महिन्यांत शिल्लक राहिले. विवेकचा हुरूप वाढला. आईवडीलही जिद्दी पोरानं काहीतरी करून दाखवल्याने सुखावले. 

तूर, कोथिंबिरीची साथ
मधली दोन-तीन वर्षे दुष्काळाची गेली. तरी त्या काळात तीन एकर तुरीला ठिबक करून एकरी अकरा क्विंटलचे उत्पादन घेतले. क्विंटलला अकरा हजारांचा दर पदरात पडला. त्यातून खर्च वजा जाता तीनेक लाख रुपये मिळाले. दुसरीकडे मात्र सोयाबीनचा उत्पादन खर्च भरून निघाला नाही. पुढे २०१६ मध्ये २० गुंठे कोथिंबीर केली. त्यातून साठ हजार रुपये मिळाले. बाजारपेठेची परिस्थिती व मागणी लक्षात घेऊन पुढील वर्षी हे क्षेत्र ६० गुंठे केले. या वेळी सुमारे एक लाख रुपये मिळाले. गावात, भावकीत विवेकच्या शेती नियोजनाचे कौतुक झाले. त्यातून प्रयोगशील वृत्तीचे बळ वाढले. 

आश्वासक पहिले उत्पादन
विवेकने चुलते एकनाथ दळवे यांच्यासोबत भागीदारीत ६० बाय २४ फूट आकाराचे शेड उभी केली. औसा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात तुती लागवडीकडे शेतकरी वळताहेत. त्यादृष्टीने विवेकने आलमला, आशिव ठिकाणी जाऊन रेशीम शेतीतील बाबींचे घेतले. सेंद्रिय व्यवस्थापनवर भर दिल्याने पाला तजेलदार व भरपूर मिळाला. आत्तापर्यंत एकच बॅच घेतली. खरे तर शंभर अंडीपुंजांमागे सरासरी सत्तर किलो कोष मिळतात. पण विवेकला सुमारे २७५ अंडीपुंजांपासून अ ग्रेडचे २६३ किलो कोष उत्पादन मिळाले. रामनगर या प्रसिद्ध मार्केटमध्ये विक्री केली. त्यास ५०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. स्वतः बाजारात जाऊन मार्केटिंगचा घेतलेला अनुभव महत्त्वाचा ठरला. 

अन्य सहकाऱ्यांना प्रेरणा
विवेकच्या विचारांचे व कृतीचे अन्य सहकारीही अनुकरण करू लागले आहेत. सोनाई शेतकरी गटातील एकनाथ दळवे, शंकरप्पा पाटील, विठ्ठल जाधव, प्रकाश दळवे, गोविंद जाधव, बळवंत दळवे, राजेंद्र जाधव व जोतिबा दळवे असे समवयस्क तरुण रेशीम शेतीत पुढे येत आहेत. सोयाबीनमधून जिथे उत्पादन व दरही हाती लागत नाही अशावेळी रेशीम शेतीकडे वळून उत्पन्नवाढीच्या केलेल्या प्रयत्नांबाबत गटाचे व विशेषतः विवेकचे कौतुक होत आहे. 

यशाची नांदीच 
आणखी गट तयार होत आहेत. पारंपरिक शेतीच्या जोखडातून बाहेर येण्यासाठी ते धडपडताहेत ही यशाची नांदी म्हणता येईल. गावातील तरुण पोरं आधुनिक शेतीची कास धरून, कृषी खात्याच्या संपर्कात राहून योजनांचा फायदा घेताहेत. कांदा चाळ, शेडनेट, ट्रॅक्‍टर, पेरणी, मळणी यंत्र, अवजारे अशा बाबींसाठी ते पुढे येताहेत. या सकारात्मक बदलात कृषी अधिकारी रमेश चिल्ले, रेशीम अधिकारी यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. या तरुणांना शेतीविषयक पुस्तके देऊन शेतीची आवड त्यांच्यात निर्माण करण्याचे काम चिल्ले करीत आहेत. 

शेतकरी गट व रेशीम शेतीत पदार्पण
गावातील प्रगतिशील शेतकरी सुभाषराव जाधव यांनी रेशीम शेतीचे महत्त्व गावातील तरुणांना पटवून दिले. त्यातून विवेकने समविचारी अठरा-वीस तरुणांना एकत्र करून सोनाई शेतकरी गट स्थापन केला. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुती लागवड, रेशीम अळी संगोपन, शेड उभारणी आदी बाबी शिकून घेतल्या. व्ही-वन जातीचे वाण आणून विवेकनेही २०१७ च्या जूनमध्ये ठिबकवर लागवड केली. 

सारे कुटुंब राबल्याचा फायदा
विवेक आपली पत्नी व आई-वडील यांच्यासह शेतीत राबतो. रेशीम शेतीतही पत्नी दीपाली व भावजय यांनी आनंदाने विविध कामे केली. चुलत्यांसह सर्वजण झपाटून राबत होते. सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंतचा वेळ कसा जायचा ते कळायचे नाही. कुटुंबाने आता गावाशेजारी शेतात पत्र्याच्या शेडच्या जागी टुमदार बंगला बांधला आहे.

- विवेक दळवे, ९८९०२४२१२१ (लेखक लातूर येथे कृषी अधिकारी असून, शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT