अ‍ॅग्रो

‘दीपक’ सोसायटीचा ‘टेस्ट आॅफ कोल्हापूर’ गूळ

राजकुमार चौगुले

कोल्हापूर ही ऊसशेती व त्याचबरोबर गूळ व्यवसायाचीही पंढरी मानली जाते. गूळ म्हटले की तो कोल्हापूरचाच, असेच समीकरण मानले जाते. कोल्हापूर बाजार समिती आवारातील गूळ मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. याच आवारात दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी कार्यरत आहे. कै. दीपक जाधव हे गोकाक (कर्नाटक) येथे गुळाचे प्रसिद्ध व्यापारी होते. त्यांचे निधन झाल्यानंतर स्मृतिप्रीत्यर्थ श्रीमती सुजाता दीपक जाधव यांनी २००१ मध्ये संस्थेची स्थापना केली. त्या विद्यमान चेअरमन आहेत. माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक हे त्यांचे वडील. केवळ स्वत:साठी व्यवसाय न चालवता अन्य शेतकऱ्यांनाही त्यात सामावून घेतल्यास सर्वांचाच फायदा होईल, असा त्या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश होता. 

बदल घडवला  
संस्थेतर्फे नियमित स्वरूपात सभासदांच्या गुळाची खरेदी- विक्री सुरू होती. दोन वर्षांपासून मात्र संस्थेने व्यावसायिकपणा अंगीकारला. बाजारपेठेतील मागणी अोळखली. स्थानिक व परराज्यांतील व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार गुळाच्या पॅकिंगमध्ये बदल करण्यास सुरवात केली. संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला सभासद व संस्थाचालक यांमध्ये बैठक होऊन आढावा घेतला जातो. त्यातून शेतकऱ्यांची  मानसिकता बदलवण्याचे प्रयत्न करण्यात आले. 

ग्राहकांची मानसिकता हेरली
अलीकडील काळात ढेप फोडून त्याचे तुकडे करून वापरण्याची मानसिकता ग्राहकांत राहिलेली नाही. लहान स्वरूपातील तुकडे उपलब्ध केले तर ते त्याला त्वरित वापरता येतील ही गरज लक्षात आली. संस्थेने त्यादृष्टीने गुळाचा आकार तयार करण्यास सुरवात केली. त्यातून मग लॉलिपॉप, वड्या, पावडर आदी पॅकिंगचे नमुने समोर आले, तसे साचे तयार करण्यात आले. 

शेतकऱ्यांना किफायतशीर दर 
संस्था रास्त भावाने शेतकऱ्यांकडून गुळाच्या विविध प्रकारांची खरेदी करते. प्रतिकिलो लॉलिपॉप ६० रुपये, गूळ पावडर ५५ रुपये, मोदक ५५ ते ६० रुपये, गूळ वडी ४५ रुपये किलो अशा दराने गूळ उत्पादकांकडून खरेदी होते. दहा ते पंधरा टक्के नफा ठेवून हे पदार्थ संस्था पुढे वितरित करते. संस्थेच्या जागेतच पॅकिंग केले जाते. मालाच्या आवकेनंतर सुमारे २५ दिवसांनंतर शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाते. शेतकरी व संस्थेच्या व्यवहारात पारदर्शकता राहावी याबाबत प्रयत्न सुरू असतात. 

गूळ पोचला अमेरिकेत 
 विविध व्यापाऱ्यांशी संपर्क करत असताना निर्यात करण्याचीही संधी संस्थेला मिळाली. योग्य त्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संस्थेने मागील वर्षी पाच टन पावडर लॉलिपॉप व एक व अर्धा किलो पॅकिंग असा एकूण बारा टन गूळ मुंबईतील व्यापाऱ्यांमार्फत अमेरिकेला पाठवला. संस्थेच्या दृष्टीने ही गौरवाची बाब असल्याचे श्रीमती जाधव यांनी सांगितले. 

देशातील बाजारपेठ 
सध्या बंगळूरला महिन्याला ५०० किलो गूळ पावडर, तर चेन्नईला महिन्याला १० किलो गूळ पाठवला जातो.
पुणे, मुंबई व हैदराबाद येथेही मागणीनुसार वितरण होते. 

‘ऑनलाइन मार्केटिंग’ 
संस्थेची ‘वेबसाइट’ आहे. त्याचबरोबर दिल्लीतील एका कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. ही कंपनी देशभरात कोणत्या भागात कोणत्या गुळाची आवश्‍यकता आहे याची माहिती देईल. त्यानुसार थेट शेतकऱ्यांच्या गुऱ्हाळातूनच संबंधित ठिकाणी माल पोच करण्याचे नियोजन आगामी काळात आहे. 

उत्पादकांत निरोगी स्पर्धा 
संस्थेचे कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकात मिळून सुमारे ४७१ सभासद आहेत. जास्तीत जास्त दर्जेदार गूळ संस्थेकडे यावा यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी गूळ उत्पादकांत स्पर्धा लावली जाते. सर्वाधिक गूळपुरवठा करणाऱ्या पहिल्या पाच उत्पादकांना अनुक्रमे सात, सहा, पाच, चार व तीन हजार रुपयांची बक्षिसे दिली जातात. संस्थेच्या वार्षिक सभेत याचे बक्षीस वितरण होते. सभासदांना ५ ते ७ टक्के लाभांशही दिला जातो. 
 बैठकांतून कल्पना
शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांसोबतही बैठका होतात. यातून बदलत्या बाजारपेठेचा आढावा घेतला जातो. सध्या संस्था १५ ग्रॅमचे लॉलिपॉप तयार करते, ते १० ग्रॅमचे करावे अशी सूचना व्यापाऱ्यांनी केली. एक लॉलिपॉप आकाराचा गूळ चहात टाकल्यास एक कप चहा तयार होईल अशी संकल्पना राबविल्यास असे लॉलिपॉप प्रसिद्ध होतील अशी कल्पना व्यापाऱ्यांनी मांडली. ही सूचना मान्य होऊन तसे प्रयत्न यंदाच्या हंगामापासून सुरू होणार आहेत. 
वर्षाला वीस ते बावीस लाखांचा नफा 
संस्थेची वर्षाला पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. यातून वीस ते बावीस लाख रुपयांचा नफा मिळतो.  यातून लाभांश व अन्य सुविधा शेतकऱ्यांना दिल्या जातात. बाजारपेठेच्या मागणीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून संस्थेने शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे.
 : एम. एस. जाधव, ७५८८०६४४०९, व्यवस्थापक, ‘दीपक’ सोसायटी

सध्या बाजारपेठ झपाट्याने बदलत आहे, त्याची कल्पना शेतकऱ्यांना द्यायला हवी. आम्ही सहकारी तत्त्वावर कार्यरत असल्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन बाजारपेठेतील मागणीनुसार त्यांच्याकडून गुळाचे उत्पादन करवून घेऊ शकलो. शेतकऱ्यांनीही याला प्रतिसाद दिला. भविष्यात हा व्यवसाय टिकण्यासाठीच असे प्रयत्न सर्वच स्तरांवरून होणे आवश्‍यक आहे.  
- श्रीमती सुजाता जाधव, अध्यक्षा, ‘दीपक’ गूळ सोसायटी 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT