bird flu
bird flu 
अ‍ॅग्रो

बर्ड फ्लू - खबरदारी आणि जबाबदारी

डॉ. व्यंकटराव घोरपडे

राज्यात २००६ मध्ये नवापूर भागात कोंबड्यांवर बर्ड फ्लू आला होता. त्यावेळी त्याचे यशस्वी नियंत्रण आपण केले आहे. आत्ताही पशुसंवर्धन विभाग, प्रशासन आणि शेतकरी-व्यावसायिक योग्य ती खबरदारी घेत आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूवर आपण यशस्वीरित्या मात करु, अशी खात्री आहे.

मार्च-एप्रिल २०२० पासून देशात  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर झाले. देशातील अनेक उद्योगधंद्याचे कंबरडे मोडले, यामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाचा देखील समावेश आहे. देशात आजमितीला कुक्कुटपालनातील कोंबड्यांची संख्या ही ३८.७ टक्के मांसल कोंबड्या, २९.४ टक्के अंड्यावरील कोंबड्या, २९.८ टक्के परसातील कोंबड्या, बदके ०.६७ टक्के आणि इतर १.४३ टक्के असा विभागलेला आहे. महाराष्ट्रात आजमितीला एकूण ५० ते ६० लाख व्यावसायिक कुक्कुटपालन व्यवसाय करतात. याद्वारे महिन्याला चार कोटी मांसल कोंबड्यांद्वारे साधारण नऊ कोटी किलो मासिक कुक्कुटमांस (चिकन) उत्पादन करतात. १.५ लाख हे देशी कोंबड्या उत्पादन करणारे देखील महिन्याला ८० लाख देशी पक्षी उत्पादन करतात. राज्यातील एकूण अंड्यावरील पक्षाची संख्या ही अंदाजे १.८७५ कोटी आहे. अंड्याचे दैनंदिन उत्पादन हे १.५ कोटी आहे. असा हा कुक्कुटपालन व्यवसाय लॉकडाउननंतर हळूहळू पूर्वपदावर येतानाच बर्ड फ्लूचे संकट त्यावर आले आहे.

सन २००६ मध्ये असेच संकट नवापूर जिल्हा नंदुरबार येथे आले असताना पशुसंवर्धन विभागाने अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळून त्यावर मात देखील केली. जागतिक पातळीवर ‘एफएओ’सारख्या संस्थांनी त्यांचे विशेष कौतुक देखील केले. त्यामुळे प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि खाजगी व्यवसायिक यांना तसा बर्ड फ्लू हा रोग नवीन नाही. बर्ड फ्लूबाबतचे नियंत्रण, काळजी, जबाबदारी, खबरदारी अशी पूर्ण माहिती अवगत असल्याने ते आपापल्या परीने काळजी घेत आहेत. आजकाल विविध माध्यमातून आपल्या सर्वांसमोर वेगवेगळी माहिती येत आहे. त्यातील शास्त्रीय माहितीवर आपण विश्वास ठेवायला हवा आणि ज्याप्रमाणे वागायला हवे. त्यातील नकारात्मक बाबींवर आपण विचार करतो आणि त्यातून या व्यवसायाचे खूप मोठे नुकसान आपण करत आहोत.

पशुसंवर्धन विभागासह सर्व माध्यमातून कुक्कुटपालन तज्ञ वारंवार सांगतात की पूर्णपणे तीस मिनिटे ७० डिग्री सेल्सिअसला शिजवलेले चिकन हे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याप्रमाणे आपल्याला खायला काहीच हरकत नाही. व्यक्तीच्या वजनानुसार ६० किलो च्या व्यक्तीला ६० ग्रॅम प्रोटीन खाल्ले पाहिजे. आज  १०० ग्रॅम चिकनमध्ये २६ ग्रॅम प्रथिने आहेत. तसेच एका अंड्यामध्ये १२ ग्रॅम प्रथिने आहेत. चिकन १६० रुपये प्रति किलो घेतल्यास प्रति ग्रॅम प्रथिनांसाठी ६१ पैसे आणि अंडी पाच रुपयाला घेतल्यास ८३ पैसे असा खर्च येतो. इतक्या स्वस्त प्रमाणात प्रथिने उपलब्ध होतात. आजही कोविडच्या सावटाखाली आपण आहोत. त्यामुळे अशा प्रकारे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा प्रथिनांचा स्त्रोत गमावणं हे फार धोक्याचे ठरेल. त्यामुळे योग्य ती काळजी घेत चिकन आणि अंडी आपल्या खाद्यसंस्कृती प्रमाणे खायला  हरकत नाही. 

देशाचा जगात कुक्कुट मांस उत्पादनात पाचवा क्रमांक आहे. आपण २०१९ मध्ये ५२०० दशलक्ष मेट्रिक टन चिकन चे उत्पादन घेतले आहे पण एकूणच अंडी आणि कुकुट मांस खरेदीकडे, खाण्याकडे दुर्लक्ष केले अथवा भीती बाळगली तर आपले सर्व बाजूने मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. सन २००६ मध्ये साधारण अकरा लाख पक्षी नष्ट केले, त्याची किंमत १३० दशलक्ष होती आणि ८० कोटी रुपये आपण नष्ट केलेल्या पक्षांना अनुदान म्हणून दिले होते. आज मितीला दररोज साधारण ७० कोटी रुपयांचे नुकसान हे कुक्कुटपालन व्यवसायाचे होत आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच याचा विचार करायला हवा. देशात एकूण दहा राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. देशात २००६ पासून २०१५ पर्यंत एकूण २५ वेळा या रोगाचा प्रादुर्भाव कुठे ना कुठे १५ राज्यांमध्ये झालेला आहे. पण आज अखेर राज्यासह देशात कुठेही मानवाला हा रोग झाला नाही, ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी.

या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागासह वन, महसूल, आरोग्य, ग्रामविकास विभागासह गृह खाते देखील प्रयत्नशील आहे. व्यावसायिक कुकुटपालन करणारी मंडळी या रोगाबाबत सजग असल्याने ते जैव सुरक्षेसह सर्व काळजी घेतात. तथापि खेड्यापाड्यातील परसातील कुक्कुटपालन करणाऱ्या मंडळींनी, माता-भगिनीनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या पक्षांशी स्थलांतरित पक्षी व इतर पक्षी जसे की बदके, कबूतर, साळुंकी, मोर, भारद्वाज, चिमण्या, कावळे यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये. पक्षासाठी ठेवलेली पाण्याची खाद्याची भांडी  स्वच्छ ठेवावीत. खुराडी स्वच्छ ठेवावीत. त्याचबरोबर विशेषतः कुक्कुट मांस (चिकन) विक्रेते, अंडी विक्रेत्यांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. नाही म्हटले तरी त्यांच्या व्यवसायावर याचा थेट परिणाम होतो. या मंडळींनी देखील स्वःत आपल्या दुकानांची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित साफसफाई, योग्य सॅनिटायझरचा वापर, मास्क, हॅन्ड ग्लोज चा वापर करायला हवा. 

पक्षी ठेवण्यासाठीचे पिंजरे नियमित स्वच्छ करावेत. पडलेली पिसे पक्ष्यांची विष्ठा व इतर कातडी वगैरे प्लॅस्टिकच्या बॅगेत बंद करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. पक्षी खरेदी करताना देखील आजारी पक्ष्यांची खरेदी व विक्री होणार नाही, याची काळजी घ्यावी. दुकानाची सर्व हत्यारे उपकरणे ही स्वच्छ राहतील, हेही पाहावे. अशा पद्धतीने सर्व यंत्रणांनी काळजी घेतली, सर्व जनतेने त्यास मनापासून साथ दिली, अफवांवर विश्वास नाही ठेवला तर आपण निश्चितपणे या बर्ड फ्ल्यूचे संकट परतवून लावू, यात शंका नाही. सरकारने देखील पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासह नैसर्गिक आपत्ती समजून कुक्कुटपालन व्यवसायिकांना मदत आणि त्यावर अवलंबून असणाऱ्यांची उपासमार होणार नाही, याची काळजी घेणे अपेक्षित आहे.

(लेखक पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT