अ‍ॅग्रो

ऊस लागवड यंत्र, मल्चिंग यंत्राची केली निर्मिती

अभिजित डाके

शेतकऱ्यामध्ये मोठा संशोधक दडलेला असतो. कुंभारी (जि. सांगली) येथील दाजी पाटील यांनी छोटी यंत्रसाधने विकसित करीत ऊस लागवडीचे, मल्चिंग पेपर अंथरणीचे, सायकलचलित फवारणी आदी गरजेनुरूप यंत्रे विकसित केली. स्वतःच्या ऊसशेतीसह कलिंगड, मिरची आदी पिकांत त्याचा वापर करून वेळ, श्रम, पैसे यात त्यांनी बचत केली आहे.  

सांगली जिल्ह्यातील जत हा दुष्काळी तालुका आहे. जत- कऱ्हाड मार्गावर कुंभारी गाव वसले आहे. या भागात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आले. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. विविध पिकांचा विचार करणे शक्य झाले. मात्र योजनेचे पाणी सातत्याने येत नसल्याने पाणीटंचाई जाणवतेच. 

दाजी पाटील यांच्यातील संशोधक  
कुंभारी गावातील दाजी पाटील हा अवलिया शेतकरी. त्यांची वडिलोपार्जित २० एकर आहे. ऊस, कलिंगड, मिरची आदी पिके ते घेतात. शेती सांभाळत दाजी यांनी लहान वयापासूनच विविध छोटी साधने बनवण्याचा छंद जोपासला. विविध यंत्रे, साधने कशी तयार होतात त्याचा बारकाईने अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती होती. टाकाऊ वस्तू आणून ते विविध साधनांच्या निर्मितीचे प्रयोग करायचे. पुढे या छंदाला अधिक गती मिळाली. घरी ट्रॅक्‍टर असल्याने अनेक अवजारे होतीच. त्यांच्या प्रयत्नांची दखल म्हणून १९९२ मध्ये आकाशवाणीवर मुलाखत झाल्याचे पाटील म्हणाले. 

छंदाची व्याप्ती वाढली
हळूहळू ऊसशेती वाढू लागली. गुऱ्हाळघरही  होतं. दुष्काळाची तीव्रता, मजूरटंचाई या बाबी तीव्र झाल्या होत्या. त्यादृष्टीने दाजी यांनी आपल्या शेतीतील गरजांनुसार यंत्रनिर्मितीवर अधिक भर दिला.घरी असलेले लोखंडी भाग, साधने तसेच काही खरेदी अशा प्रयत्नांमधून ऊस लागवड यंत्र तयार केले.

ही गोष्ट २०१५ ची. मात्र त्यात काही त्रुटी राहिल्या. यंत्रातून उसाची कांडी योग्यरीत्या खाली पडत नव्हती. कधी कांड्यावर माती अधिक पडली जायची. पण याही अडचणींवर मात केली. हे यंत्र विविध अंगाने काम करेल यादृष्टीने त्यात कौशल्यपूर्ण बदल केले.  

खर्चात केलेली बचत
पारंपरिक पद्धतीत मजुरांद्वारे सरी सोडण्यासाठी एकरी खर्च पंधराशे ते दोन हजार रुपये येतो.  ऊस लागवडीचा कालावधी एकरासाठी तीन दिवस  असतो. मजुरांची संख्या १० ते १५ धरली व मजुरीची रक्कम ३०० ते ४०० रुपये धरली तर तीन  दिवसांसाठी हा खर्च किमान १० ते १२ हजार रुपये येतो. त्या तुलनेत यंत्राद्वारे सरी आणि लागवड ही  कामे एकाच वेळी होतात. दोन मजुरात सुमारे तीन तासांत हे काम होते. त्याचा खर्च दीडहजार रुपयांपर्यंत होतो. 

घरच्यांची साथ 
दाजी म्हणाले की, कोणतेही काम प्रामाणिकपणे कर आणि जिद्द कधीच सोडू नकोस असा उपदेश वडिलांनी केला. त्याच वाटेने पुढे चाललो आहे. आई फुलाबाई तसेच पत्नीचीही मोलाची साथ मिळाल्यानेच यंत्रनिर्मिती असो की शेती सुलभ झाली आहे. 

कार्यशाळेतून शिक्षण 
दाजींचं शिक्षण म्हटलं तर केवळ दहावीपर्यंत. पण अभ्यासू, संशोधनवृत्ती, चिकाटी या गुणांमुळेच त्यांना पुढे वाटचाल करणे शक्य झाले. परिसरातील ‘वर्कशॉप’च्या मदतीने त्यांनी यंत्रनिर्मिती, वेल्डिंग आदींचा सरावही केला आहे. गणेशोत्सवाच्या वेळी मंडळांसाठी देखावेनिर्मिती, जिन्यांवरून चालताना लाईट लागणे, गजराच्या घड्याळाचा टायमर आदी विविध साधनांच्या निर्मितीतून दाजींनी आपल्यातील बुद्धिकौशल्याचा प्रत्यय दिला आहे. ऊस लागवड यंत्रासाठी एका कंपनीसोबत करार केला असून त्याचे पेटंटही घेतल्याचे त्यांनी सांगितले.    

पॉली मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्र
दाजी यांची ऊसशेती दरवर्षी सुमारे १० एकर असते. उर्वरित क्षेत्रावरील कलिंगड, मिरची बेडवर असल्याने पॉली मल्चिंग करावे लागे. मजुरांद्वारे मल्चिंगसाठी होणारा खर्च व लागणारा वेळ पाहाता जुन्या साहित्यांचा वापर करुन मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्र तयार केले. त्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला. 

फवारणी यंत्र 
सायकलचलित सात ते आठ नोझल्स असलेले बूम प्रकारातील व बॅटरीचलित फवारणी यंत्र तयार केले आहे. बूमची उंची पिकाच्या गरजेनुसार खालीवर करता येते. नोझल्सदेखील मागे पुढे करता येतात. 

होणारे फायदे 
प्रचलित पद्धतीत मल्चिंग करण्यासाठी सुमारे सहा मजुरांची आवश्‍यकता भासते. या यंत्राद्वारे दीड तासात एकरभर क्षेत्रात हे काम केवळ ट्रॅक्टरचालकाद्वारे सुकर होत असल्याचे दाजी म्हणाले. त्यातून मजूरबळ, पैसे यात चांगली बचत साधली आहे. शिवाय दोन बेडमधील ढेकळेही फोडण्याचे काम या यंत्राद्वारे होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 दाजी आण्णाप्पा पाटील, ९७३०६६६५५७  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT