Vinayal-Pol
Vinayal-Pol 
अ‍ॅग्रो

दुग्धव्यवसायाला हळद शेतीची जोड

डॉ. रवींद्र भताने

आजकाल सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावतानाच दिसून येतात. लातूर जिल्ह्यातील खंडाळी येथील विनायक पौळ यांनी मात्र ठाणे जिल्ह्यातील शिक्षकपदाची नोकरी सोडून शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. हळदीची शेती व दुग्धव्यवसाय यांचा योग्य मिलाफ घडवून त्यांनी शेतीला चांगला आकार दिला. स्वतःवरील विश्‍वास आणि घेतलेला निर्णय किती योग्य होता हेच त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.

लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील पौळ कुटुंबीय १३ एकरांत पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. छोट्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय सुरू होता. कुटुंबातील विनायक बीए डीएड झाले आहेत. त्यांना ठाणे जिल्ह्यात शिक्षकपदाची नोकरी चालून आली. पण शेतीतच करिअर घडवून मोठे व्हायचे हेच ध्येय त्यांनी ठेवले. शेतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी दुग्ध व्यवसायाला वळण देत डेअरी सुरू केली. 

दुग्धव्यवसायाला सुरवात 
विनायक यांनी २००७ मध्ये दोन म्हशी खरेदी केल्या. ते सुरवातीला गावातील हॉटेलला ४० रुपये प्रतिलिटर दराप्रमाणे विक्री करायचे. मात्र दुधाची विक्री जास्त होत नव्हती. मग २०११ मध्ये शासकीय दूध डेअरी सुरू केली. पुरेशा संकलनाअभावी ती बंद पडली. पण चिकाटी सोडली नाही. तीन एचएफ जातीच्या गायी, तीन मुऱ्हा व दोन गावरान म्हशी घेतल्या. शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. सन २०१७ मध्ये एका प्रसिद्ध कंपनीचे दूध संकलन केंद्राची जबाबदारी स्वीकारली. आज त्यास शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून तब्बल १६० शेतकरी त्यांच्याशी जोडले आहेत.

चारा पिकांसाठी नियोजन 
एक एकरवर डीएचएन- ६ या गवताची लागवड केली आहे. कुट्टीयंत्रही घेतले आहे. सुका चाराही बनवला जातो. बाहेरील पशुखाद्यावर अधिकाधिक बचत केली जाते. मिनरल मिक्शर, द्रव्य स्वरूपातील आहार, कडबा पेंडी, गवत, मका आदींचा वापर केला जातो. सकाळी साडेपाच वाजता दूध काढल्यानंतर खुराक दिला जातो. त्यानंतर जनावरांना एक तास चरायला सोडले जाते.  
बोअर २, बोअर आठ तास, दुसरी दोन तास चालते विहीर-  

हळदीतून पीक बदल 
दुग्धव्यवसायाव्यतिरिक्त शेतीच्या विकासाकडेही चांगले लक्ष दिले आहे. एकूण १३ एकर क्षेत्रांत सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांची अनेक वर्षांपासून लागवड केली जात असे. यातून अपेक्षित उत्पन्न पदरात पडत नसे. मग बाजारातील मागणी, दर, उत्पादन आदींचा अभ्यास करून २०१५ पासून हळदीतून पीक बदल साधला आहे. सुकवलेल्या हळदीचे एकरी १९ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते आहे. भालचंद्र पाटील व बी. बी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळते. मालाचा दर्जा चांगला असल्याने वाळलेल्या हळदीला नांदेड मार्केटमध्ये प्रतिक्विंटल सात हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. तर ४० क्विंटल ओली हळद बेण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे. 

आंतरपिकांतून खर्चात बचत 
हळदीत मुगाचे आंतरपीक घेण्यात येते. दरवर्षी सरासरी साडेतीन क्विंटलपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. यामुळे हळदीचा उत्पादन खर्च कमी झाला आहे. शिवाय मुगाचा जमिनीला फायदा होत आहे. मुगाला यंदा ४५०० ते ४७०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.  

रासायनिक निविष्ठांवरील खर्चात बचत 
विनायक यांनी शेतीतील खर्चात कशी बचत करता येईल याचा अभ्यास केला. यातूनच ते रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. घरच्या जनावरांपासून भरपूर शेणखत मिळते. दरवर्षी सहा ट्रॅक्टर शेणखत एकरभर क्षेत्रात वापरले जाते. निंबोळी अर्क तयार करून त्याचाही वापर केला जातो.  

घरच्यांची साथ 
विनायक यांना पत्नी सौ. छाया, वडील बापूसाहेब, आई सौ. महानंदा यांची शेतीत मोठी साथ मिळते. सर्वजण शेतात काम करीत असल्याने एका सालगड्यासह शेतीचे उत्तम नियोजन केले जात आहे. विनायक दुग्धव्यवसाय सांभाळून शेतीचे व्यवस्थापनही तितक्याच ताकदीने पाहतात. 

ॲग्रोवनने दिली प्रेरणा  
विनायक २००५ पासून ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. दुग्धव्यवसायाची प्रेरणा ॲग्रोवननेच दिल्याचे ते सांगतात. डॉ. सूर्यकांत फड, डॉ. अनिल भिकाने यांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळते. शेतीला जोड व्यवसाय सुरू केला तर ती नफ्यात राहू शकते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कापूस व अन्य पारंपरिक पिकांमधून खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळायचे. मग हळदीचा पर्याय शोधला असून आता समाधानकारक उत्पन्न पदरात पडत असल्याचे विनायक यांनी सांगितले.

दुग्धव्यवसायातील ठळक बाबी 
सुमारे ६० बाय ३३ फूट क्षेत्रफळ- सतरा जनावरे ठेवण्याची क्षमता
सध्या पाच म्हशी, तीन गायी
दररोजचे संकलन- ४५ ते ५० लिटर
हवा खेळती राहावी, पुरेसा सूर्यप्रकाश आत यावा यासाठी चारही बाजूने विशिष्ठ उंचीपर्यंत पत्र्याचे शेड
उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून तीन फॅन्स 
वाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रतिहजार वॅट क्षमतेचे चार फॉगर्स 
गोठ्याशेजारी स्वच्छ पाण्याचा हौद 
गोठ्यातील शेण- मूत्र वाहून नेण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन. एका खड्‌ड्यात त्याचे संकलन 
अन्य शेतकऱ्यांकडील मिळून एकूण दूध संकलन- सुमारे ४०० लिटर
संबंधित कंपनीची गाडी जागेवरून दूध घेऊन जाते
संकलनातून एक रुपया प्रतिलिटर कमिशन मिळते 
प्रत्येक शेतकऱ्याला दुधाच्या दर्जाची नोंद असलेली संगणकीकृत पावती दिली जाते
विनायक यांना घरच्या दुधाला मिळणारा दर- सरासरी ३२ रुपये प्रतिलिटर
खर्च वगळता महिन्याला ४० टक्क्यांपर्यत नफा शिल्लक राहतो. 

विनायक पौळ, ९६८९७२१७२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT