अ‍ॅग्रो

अस्वस्थ वर्तमान

महारूद्र मंगनाळे

बाजारात फिरताना शेतकरी कोण, व्यापारी कोण, दलाल कोण हे सहज लक्षात येतं. शेतकऱ्याचा चेहरा, देह, कपडेच सांगतात की, तो शेतकरी आहे. शेतीवर राबणाऱ्यांच्या कित्येक पिढ्या कष्टात गेल्या, पण परिस्थिती तीच. दिवसभर तीव्र उन, रात्री थंडी, संरक्षणासाठी कसली तरी पटकूरं, टपऱ्यांवरचा तो भंगार चहा, ते भजे, पुरीभाजी, खिचडी अन् पोहे... स्वच्छतेच्या सगळ्या कल्पनाच बदलून जातात. बाजारात किती फेऱ्या झाल्या, त्या तेच जाणोत. अशाही वातावरणात ही माणसं गप्पा गोष्टी, हास्यविनोद करीत वेळ घालवतात... हे सगळं बघितलं की, पोटात गलबलून येतं. नुस्तं पाहून, त्यांच्या वेदनेच्या कहाण्या ऐकून झोप उडून जायची. शेतकरी स्रियांची स्थिती यापेक्षा कितीतरी बिकट. बस्स.. भोग भोगताहेत हे... `इंडिया`नं हे भोग त्यांच्या वाट्याला दिले आहेत. यातून सुटका करून घेण्याची क्षमता, ताकद त्यांच्यात नाही. दुर्दैवाने दृष्टीही नाही.

नोटाबंदीमुळं उठलेला बाजार जवळपास तीन महिने झाले तरी सुरळीत झालेला नाही, याचा पदोपदी अनुभव येतोय. कोणालाही विचारा. उत्तर ठरलेलं- पैसा नाही, गिऱ्हाईक नाही. बाजारातली मरगळ काही जायला तयार नाही. रविवारी हंडरगुळीचा बैलांचा बाजार असतो. हंडरगुळी हे लातूर जिल्ह्यातील जनावरांच्या बाजाराचे प्रसिद्ध ठिकाण. तिथे गेलो. चार तास उन्हात वणवण फिरलो. शेतकऱ्यांशी, व्यापाऱ्यांशी बोललो. बैल विक्रीचे दोन सौदे होताना बघितले. एक सौदा पाचशे रुपयांवरून मोडला. पैशाचं खरं मोल इथं कळतं.

बाजार बैलांनी फुलून गेलेला. जिकडे नजर जाईल तिकडे बैलंच बैल. लाल, लाल बांडा, हरणा, पिवळा हरणा हे रंग कंधारी जातीच्या बैलात दिसतात. देवणी जातीत वानेरा, काळा बांडा, जांभळा बांडा, जांभळा, लाल मणेरा. जर्सी जातीत मात्र सगळ्याच रंगाचे बैल असतात. बैलांचा हा रंगीबेरंगी बाजार डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. बाजार बैलांनी हाऊसफुल्ल होता. खरेदीदारही आले होते. मात्र पैशाच्या अडचणीमुळे व्यवहार होत नव्हते. खरेदीदार निम्मे पैसे लगेच देतो, राहिलेल्या पैशाला १५ दिवस थांबा म्हटलं की, सौदा फिस्कायचा. मध्यस्थांच्या हमीवर काही व्यवहार होत होते. बहुतांश शेतकरी उधारीच्या व्यवहाराला तयार होत नव्हते. लांजी गावचे मोरे नावाचे शेतकरी म्हणाले, ``आधीच शंभर अडचणी. त्यात उधार देणं म्हणजे, खाजवून आवदान आणल्यासारखं हाय. याय-जायचे पैसे गेलेले परवडले. पण उधारीचा धंदा नको.`` कर्नाटकचा पटेल म्हणून एक व्यापारी आला होता, त्याला विचारलं की, तीन महिना हो गया, अब क्यूं उधार मांग रहे हो? पटेल बोलला, ``अभीभी पैसे की कंडीशन बेकार है साब. नोटबंदीने हमारा बाजार उठाया...`` निकड असूनही सगळेच शांत.

बाजारात एकापेक्षा एक पाहण्यासारख्या बैलजोड्या आलेल्या. धष्टपुष्ट, चमकदार, देखण्या जोड्या. जिवापाड सांभाळलेल्या. बैलांपुढे हिरवीगार मका टाकलेली. मालक पोत्याच्या पटकुरानं बैलांची पाठ घासत असलेला. कातडीची चमकच सांगते, त्याची किती निगा आहे ते! माझ्या सोबत हंडरगुळीचे स्थानिक पत्रकार पप्पू पाटील होते. ते मला सांगत होते, ``या दिवसांत बैल भरलेले १००-१२५ वाहनं बाजारातून हलायची, आता २०-२५ वाहनं चाललीत. नोटाबंदीचा निर्णय शेतकऱ्यांचं वाटोळं करणारा ठरला बघा साहेब...`` वेदनेचा सूर असलेली त्यांची प्रतिक्रिया प्रातिनिधीक म्हणावी लागेल.

शेतकऱ्यांची दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. माझी सहज नजर गेली. अनेक शेतकऱ्यांनी भाकरी सोडल्या होत्या. भाकरी, मोकळी भाजी, पिठलं, ठेचा, आंब्याचं लोणचं असा एकंदर मेन्यू. नकळत मी भूतकाळात गेलो. याच बाजारात मी ही अनेकवेळा असाच जेवलो होतो. तेव्हाही आसपास अशीच धूळ, कचरा, शेण होतं. तेव्हा कधी ते जाणवलं नव्हतं, पण आज प्रकर्षानं ते मनात रूतून बसलं. शेतकरी म्हणायला जगाचा पोशिंदा, पण प्रत्यक्षात व्यवस्थेनं त्याचं जगणं पालापाचोळा करून टाकलं आहे, याची दुखरी जाणीव पुन्हा एकदा मनभर पसरली.

बाजारात फिरताना शेतकरी कोण, व्यापारी कोण, दलाल कोण हे सहज लक्षात येतं. शेतकऱ्याचा चेहरा, देह, कपडेच सांगतात की, तो शेतकरी आहे. शेतीवर राबणाऱ्यांच्या कितीक पिढ्या कष्टात गेल्या पण परिस्थिती तीच. दिवसभर तीव्र उन, रात्री थंडी, संरक्षणासाठी कसली तरी पटकूरं, टपऱ्यांवरचा तो भंगार चहा, ते भजे, पुरीभाजी, खिचडी अन् पोहे... स्वच्छतेच्या सगळ्या कल्पनाच बदलून जातात. बाजारात किती फेऱ्या झाल्या, त्या तेच जाणोत. अशाही वातावरणात ही माणसं गप्पा गोष्टी, हास्यविनोद करीत वेळ घालवतात... हे सगळं बघितलं की, पोटात गलबलून येतं. नुस्तं पाहून, त्यांच्या वेदनेच्या कहाण्या ऐकून झोप उडून जायची. शेतकरी स्रियांची स्थिती यापेक्षा कितीतरी बिकट. बस्स..भोग भोगताहेत हे... `इंडिया`नं हे भोग त्यांच्या वाट्याला दिले आहेत. यातून सुटका करून घेण्याची क्षमता, ताकद त्यांच्यात नाही. दुर्दैवाने दृष्टीही नाही. आमच्या पूर्वजन्मीच्या पापाचे हे भोग आहेत... हे त्यातल्या बहुतेक जणाचं मत. पिढ्यान् पिढ्या तुमच्याच वाट्याला हे भोग का आहेत, याचं उत्तर त्यांच्याकडं नाही. सत्तेत कोणीही येवो, शेतीची लूट अटळ आहे, हेच वास्तव. येताना शेजारच्या भाजी बाजारात जाऊन आलो. तिथेही तेच चित्र. न लिहिण्यासारखं. विषण्ण झालो.

कालपासून माझ्या मनात सारखा एकच विचार येतोय. या देशातील प्रत्येक माणसाला किमान एक वर्ष कोरडवाहू शेतीत उमेदवारी करणं सक्तीचं करायला हवं. मग तो देशाचा पंतप्रधान असो, राज्याचा सचिव असो की, कलेक्टर, एसपी. तरच या `इंडिया`तील लोकांचा `भारता`तील शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. शेतीला बरे दिवस येतील. अन्यथा सगळं अवघड आहे.

निवडणुकांचा आधार
नोटाबंदीमुळं अनेक लघूउद्योग, बांधकाम व्यवसाय डबघाईला आल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी आधीच कमी, त्यात हा नोटाबंदीचा दुष्काळात तेरावा महिना. पैसे नाहीत, त्यामुळं नवीन कामं सुरू नाहीत, त्यामुळं रोजगार नाही असं दुष्टचक्र सुरू झालं. बेकारांची फौज वाढली. काम नसलेले मजूर चोऱ्यांकडे वळाले. नोटाबंदीनंतर ग्रामीण भागात घरफोड्यांचे, भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. पण नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि हे चित्र बदलले. या चोऱ्यांत लक्षणीय घट झाली. लगेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्या. आणि आश्चर्य म्हणजे तेव्हापासून चोऱ्या, घरफोडीच्या बातम्या जवळपास बंद झाल्या आहेत. याचा अर्थ निवडणुकांमुळे नोटाबंदीमुळं रोजगार बुडालेल्यांना तर `काम` मिळालंच शिवाय सराईत चोरटेही निवडणुकीच्या कामाला लागलेले दिसताहेत. देशातील बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचं असेल तर या देशात बारा महिने निवडणुका सुरू असल्या पाहिजेत.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)
९४२२४६९३३९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT