अ‍ॅग्रो

सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’

रमेश चिल्ले

प्रत्येकात कुठले ना कुठले कसब दडलेले असते. गरज असते त्याला योग्य संधी देण्याची.  जिद्द, आत्मविश्‍वास अन्‌ झपाटलेपण या बाबी अंगात असतील तर वेळ, पैसा व ठिकाण अशा कशाचीही अडचण येऊनही त्याला दूर करण्याची ताकद त्या व्यक्तीत येते. लातूर जिल्ह्यात मुरूड नावाचे गाव आहे. तेथे वास्तव्यास असणाऱ्या देशमुख कुटुंबाबाबत असेच म्हणता येते. कुटुंबातील साधना या धडाडीच्या सदस्य आहेत. आपल्या पतीच्या साथीने त्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगात उल्लेखनीय आघाडी घेतली आहे. सन २०१२ मध्ये सुरू झालेल्या या उद्योगात त्यांनी आपली अोळख तयार केली आहे. 

कुटुंबाची वाटचाल
प्रतिकूल परिस्थितीत साधना यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गोदेगाव येथील दीपक देशमुख यांच्याशी त्यांचे लग्न झाले. एमएस्सी झालेले दीपक मुरूड येथे इलेक्‍ट्रीक उत्पादनांचा व्यवसाय चालवत. शेतीही होती. त्या वेळी मुरूड येथे हे दांपत्य भाडेतत्वावरील घरात राहायचे. पुढे संसारात मुले, त्यांचे शिक्षण व अन्य खर्च वाढला. दीपक यांनी घरीच लहान मुलांसाठी गणित विषयाची शिकवणी घेण्यास सुरवात केली. दरम्यान स्वयंशिक्षण प्रयोगाच्या महिला प्रशिक्षणाविषयी साधना यांना माहिती झाली. घराला हातभार लागावा म्हणून त्यांनी त्यात भाग घेतला. त्यात सौर ऊर्जा शेगडी, सिमेंटचे तयार शौचालय, ग्रामस्वच्छता, सोयाबीनच्या उपपदार्थांची निर्मिती यांची माहिती मिळाली. त्यातील सोयाबीन उत्पादनांनी मनात घर केले.

सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची सुरवात 
दीपक व साधना यांनी मग या विषयातील तज्ज्ञ तसेच इंटरनेटद्वारे माहिती घेण्यास सुरवात केली. लातूर नजीक असलेल्या मांजरा कृषी विज्ञान केंद्रात साधना यांनी प्रशिक्षण घेतले. सोयावर आधारित दूध, दही, श्रीखंड, पनीर, चक्का, बिस्किट, कॉफी, चिवडा, पीठ हे पदार्थ बनवून पाहिले. त्यात गोडी वाढत गेली. हा व्यवसाय केव्हाही व कुठेही करता येणारा, कच्चा माल वर्षभर उपलब्ध असा होता. यातच प्रावीण्य मिळवण्यासाठी कोणतेही कष्ट उपसायला साधना यांची तयारी होती. मूल्यवृद्धीला खूप वाव होता.

अडचणी वाढल्या पण मार्गही शोधला 
घर भाडेतत्वावरचे. दिवसा घरची कामे, सौर कुकर, सोलर बंब रेडीमेंड शौचालय वाटप, महिला बचत गटाचे काम करून रात्री मिक्‍सरद्वारे भिजवलेले सोयाबीन छिलके काढून ते वाटून घेणे, दूध काढणे, दही लावणे अशी कामे सुरू व्हायची. रात्रीच्या या कामांमुळे घरमालक त्रस्त व्हायचे. अडचणी वाढत गेल्या. तिथूनच स्वतःचे घर असावे म्हणून विचार बळावत गेला. जागेची शोधाशोध, कर्ज काढून लांबच्या कॉलनीत प्लॉट घेतला. पैशांची जमवाजमव करून छोटेखानी घर बांधून दोन-तीन वर्षांत व्यवसाय सुरू झाला. सुरवातीला ‘साधना सोया प्रॉडक्‍ट'' या नावाने पापड, चिवडा, बिस्किट, कॉफी, पीठ विकणे सुरू केले.

मालाचे मार्केटिंग 
साधना यांनी आपल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनाही उद्योगात सामील करून घेतले. मुरूड येथील प्रदर्शनात स्टॉल उभारून विक्री सुरू केली. दीपक यांनीही आपल्या इलेक्‍ट्रीक उत्पादने विक्री केंद्रात तसेच ओळखीच्या ठिकाणी पदार्थ विक्रीस ठेवणे सुरू केले. एकमेकांच्या अनुभवातून, चर्चेतून मालाचा उठाव होऊ लागला. दर्जा ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने विक्री वाढली. घरी येणाऱ्या पाहुण्याला सोया कॉफीची चव आवडू लागली. कुठेही बाहेर जाताना देशमुख दांपत्य आपल्या सोबत सोया कॉफीचे पाऊच ठेवीत. दोघांच्या एकत्रित प्रयत्नांतून पुणे, मुंबई, उस्मानाबाद, लातूर इथंपर्यंत उत्पादनांची विक्री वाढली.

सोया श्रीखंडाचा रंजक अनुभव
 लातूर येथे एका कंपनीचे प्रशिक्षण होते. तिथे जेवणात गोड काय द्यावे अशी चर्चा झाली. त्या वेळी सोया श्रीखंडाचा विषय समोर आला. दीडशे लोकांंसाठी ही मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी साधना यांच्यावर आली. चाकूर तालुक्‍यातील म्हाळंगी येथे एकाकडे यंत्रसामग्री होती. शंभर किलोमीटर अंतरावर जाऊन तेथे एक क्विंटल सोयाबीनपासून दूध वेगळे केले. दुधाचे दही बनवायला मात्र जमेना. गारपीट झालेली. अनेक प्रयत्नांतून श्रीखंड तयार झाले. प्रशिक्षणात सर्वांनाच ते आवडले. हा अनुभव फार शिकवून गेला. मात्र कसोटीवर देशमुख पतीपत्नी खरे उतरले. दोघांचीही जिद्द कामी आली.

मार्केटिंगची जबाबदारी दीपक यांनी पेलली 
 लातूर येथे कृषी महोत्सवात स्टॉल उभारला. तिथेही सोयाबीन उत्पादने हातोहात संपली. कामाचा व्याप वाढला. दीपक यांनी मग आपले इलेक्‍ट्रीक उत्पादने केंद्र बंद करून सोया उत्पादनांच्या मार्केटिंगची व विक्रीची जबाबदारी स्वीकारली. प्रयत्नांना अजून बळ मिळाले. उन्नती ग्लोबल फोरमच्या माध्यमातून साधना यांना एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. दांपत्य पूर्णवेळ झोकून कामाला लागले. आज परिसरात दहा महिला स्वयंसहायता बचत गटांची निर्मिती होण्यात साधना यांचाही वाटा आहे. सुमारे ४०० ते ५०० महिलांचे ‘नेटवर्क’ त्यांनी उभारले आहे.

उत्पादनांच्या प्रसाराची जिद्द 
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे तीनशे महिलांसाठी सोया प्रक्रियाबाबत प्रशिक्षणासाठी बोलावणे आले. ही संधी सोडता कामा नये म्हणून पावसाळ्याचे दिवस असूनही देशमुख दांपत्य मोटारसायकलवरून विविध उत्पादने सोबत घेऊन निघाले. अंतराचा नेमका अंदाज नव्हता. सुमारे चार तासांनी ते माढ्याला पोचले. तेथेही हातोहात उत्पादनांची विक्री झाली. शिवाय वेगळे मानधनही मिळाले.

उद्योगाचा विस्तार 
सोयाबीन उत्पादनांविषयी ग्राहकांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली नाही. त्यामुळे बाजारपेठ मर्यादित असल्याचे साधना सांगतात. मात्र विविध मेळावे, धान्य महोत्सव, प्रदर्शने आदींच्या माध्यमातून बाजारपेठ वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे साधना सांगतात. लातूर येथे सुपरमार्केटमध्ये उत्पादने ठेवली आहेत. नाबार्डतर्फे तसेच मांजरा कृषि विज्ञान केंद्राचे पुरस्कार साधना यांना मिळाले आहेत. मांजरा कृषी विज्ञान केंद्रासह विविध ठिकाणी साधना यांना मार्गदर्शक म्हणून बोलावण्यात येते. 

  : साधना देशमुख, ८८५५९३२६२२ 
(लेखक लातूर येथील निवृत्त कृषी अधिकारी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT