wild-plant 
अ‍ॅग्रो

रानवनस्पती, पाने, फुलांतून  आदिवासींना मिळतोय हंगामी रोजगार

मुकुंद पिंगळे

भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण, भाद्रपद महिन्यात धार्मिक पूजाविधींसाठी रानवनस्पतीची फुले,पाने यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ या तालुक्यातील आदिवासी बांधव रानवनस्पतींची पाने, फुलांचे संकलन करून थेट शहरी भागात विक्री करतात. यातून चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. 

अल्प जमिनी, त्यातच जिरायतीपट्टा असल्याने आदिवासी बांधव वर्षभर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अलीकडच्या काळातील पाणी टंचाईमुळे  दुसऱ्या शहरात रोजगारासाठी होणारे अस्थायी स्थलांतर हे आदिवासी बांधवांच्या आयुष्यात नित्याचेच आहे. काहीजण थोड्याफार जमिनीवर भात, वरई, नागली पिकांची लागवड करतात, तर काहीजण रोजगाराच्यादृष्टीने नाशिक सारख्या शहरी भागात रान वनस्पती व फुले विकतात. त्यातून हंगामी रोजगाराचा एक चांगला पर्याय त्यांना उपलब्ध झाला आहे.  

बदलला मागणीचा कल 
पूर्वी धार्मिक कार्यासाठी लागणारी पत्री गोळा करण्याचे काम घरगुतीस्तरावर होत असे. मात्र शहरे वाढत गेली आणि लागणाऱ्या या वनस्पतींची उपलब्धता कठीण झाली. त्यामुळे नागरिक पूजाविधीसाठी बाजारपेठेतून विविध रान वनस्पतींची पाने, फुलांची  खरेदी करतात. ही बाजारपेठ लक्षात घेऊन आदिवासी बांधव शहरात उत्सवांच्या काळात विक्रीसाठी दाखल होतात. आदिवासी बांधवांना जंगल क्षेत्रातील वेगवेगळ्या वनस्पती आणि झाडांची ओळख असते. त्यामुळे त्यांचे औषधी गुणधर्म,महत्त्व व फायदे ग्राहकांना सहजरीत्या सांगतात. याची खात्री ग्राहकांना पटत असल्याने आदिवासी बांधवांकडूनच या वनस्पतींची पाने, फळांची खरेदी केली जाते. 

श्रावण ते भाद्रपद हा मागणीचा काळ 
श्रावण महिन्यात नागपंचमीला नाग, नरसोबा पूजनासाठी आघाड्याची पाने, रंगबिरंगी तेरड्याची फुले आणि हराळी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येते. गौरी-गणपतीच्या दिवसामध्ये  पूजा व नैवेद्यासाठी लागणाऱ्या अनेक रान वनस्पती, फुले व भाज्यांना विशेष महत्त्व असते. यासह हरितालिका, ऋषीपंचमीसाठी पत्री, आघाड्याची पाने आणि काड्या लागतात. ऋषीपंचमीला साधारण २१ भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामध्ये चाईचा मोहोर, उळशीचा मोहोर, करटुलीचे फळे, शिरीचे फुले, कुर्डूचा पाला, माठाची कोवळी पाने या भाज्यांना विशेष महत्त्व असते. या रान भाज्या जंगलातून संकलित करून बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. श्रावण ते  पितृपक्ष दरम्यान रानकेळीची पाने प्रसाद ठेवण्यासाठी वापरतात.

रानवनस्पती,  फुलांचे संकलन 
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी, ब्रम्हगिरी, मेटघर किल्ला, हरसूल, वाघेरा, साप्ते कोणे तर नाशिक तालुक्यातील दरी, मातोरी, गंगापूर धरण परिसर, गोवर्धन आणि पेठ तालुक्यात करंजाळी, गायधोंड, नाचलोंढी, जोगमोडी या भागात रान वनस्पतींची पाने, फुलांचे संकलन करून अनेक आदिवासी बांधव शहरात विक्रीसाठी आणतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे असते नियोजन  
मागणीनुसार जंगली क्षेत्रातून आवश्यक वनस्पती, पाने व फुले यांचा विक्रीपूर्वी शोध.
नियोजित दिवशी सकाळी लवकर जाऊन तोडणी.

ठरवून विक्री करण्यासाठी आदिवासी बांधवांमध्ये वेगवेगळे घटकांचे संकलन. त्यानंतर पाने,फुले ताजी राहण्यासाठी फडक्यात बांधून विक्री.

स्थानिक बाजारपेठेसोबत रेल्वेने रात्रीचा प्रवास करून मुंबई, ठाणे येथेही विक्री.

रोजगाराला कष्टाची जोड 
श्रावण, भाद्रपद महिन्यात धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या वनस्पती, पाने,फुलांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी रोजगाराचा हंगामी पर्याय उभा केला आहे. हा हंगामी रोजगार असल्याने मोठे कष्ट असतात. अनेकदा पाऊस चालू असताना पहाटेपासून रान वनस्पती, फुले व भाज्या शोधून तोडणीचे नियोजन असते. यासाठी ४ ते ५ किलोमीटर पायी फिरावे लागते. जंगली भागात वनस्पती, फुले यांचा शोध घ्यावा लागतो. त्यानंतर मागणीनुसार शहरात आणला जातो.

विक्रीची प्रमुख ठिकाणे
नाशिक शहरामध्ये प्रामुख्याने पंचवटी भाजी बाजार, गाडगेबाबा पूल, मेन रोड, कपालेश्वर मंदिर परिसर, रविवार कारंजा, गणेशवाडी आणि शालिमार भागात अनेक आदिवासी बांधव सकाळीच लवकर विविध पाने, फुले आणि वनस्पती घेऊन दाखल होतात. या ठिकाणी ग्राहक येत असल्याने विक्री सुकर होते.

सणासुदीला विक्रीच्या माध्यमातून रोजगार मिळतो. त्यासाठी जंगलामध्ये फिरून विविध वनस्पतींचा शोध घ्यावा लागतो. यंदा लॉकडाउन असल्याने श्रावणापासून विक्री करता आली नाही, मात्र गणेशोत्सवामध्ये कर्दळीच्या खांबाची विक्री करत आहे. त्यातून २०  हजार रुपयांपर्यंत उलाढाल झाली.
-छबाबाई काळू मोंढे, (देवरगाव, ता.जि.नाशिक)

रान केळीच्या पानांचा वापर प्रसाद आणि भोजन वाढण्यासाठी केला जातो. श्रावण ते नवरात्रापर्यंत रान केळीच्या पानांची विक्री करतो. यामध्ये भरपूर कष्ट आहेत. वनस्पतींच्या शोधासाठी  रानोमाळ, जंगलात भटकावे लागते. कोरडवाहू शेती असल्याने फुले,पानांच्या विक्रीतून काही प्रमाणात आर्थिक आधार मिळतो.
-राजाराम कान्हू मोंढे (देवरगाव, ता.जि नाशिक)

रोजगाराची संधी...
रानात नैसर्गिकपणे  विविध वनस्पती उगवत असल्यामुळे आदिवासी भागात राहणारे लोक  त्यांचा वापर आहारात करतात. तसेच अर्थार्जनाचा भाग म्हणूनही विक्री केली जाते. सण, उत्सवात विविध फुले, वनस्पतींना मागणी असल्याने यामाध्यमातून रोजगार मिळतो. आदिवासी बांधव उपलब्धतेप्रमाणे रानवनस्पती शोधून त्या संकलित करून शहरी भागात विक्री करतात. 
 : प्रा. अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६ (रानवनस्पती अभ्यासक, नाशिक)

पूजापत्रीतील प्रमुख घटक
फुले ः  लाल व पांढरे कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक, तेरड्याची फुले, कुरडूची फुले, कळलावी (गौरीचे हात), रानहळद (शिंदळवाणी)

पत्री : मोगरा, माका, बेलाचे पान, दुर्वा, बोरीचे पान, धोत्र्याचे फुल व पान, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुन सादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मारवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्ती पत्र, रामफळ, सीताफळ, चंदन पाला, आंबा.

इतर : कर्दळीची खांब,  रानकेळीचे खांब आणि पाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student suicide attempt: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT