Balasaheb Vikhe Patil book released by Prime Minister Narendra Modi
Balasaheb Vikhe Patil book released by Prime Minister Narendra Modi 
अहमदनगर

विखे घराण्याचे चौथ्या पिढीचे "ब्रॅंडिंग' केंद्रातील सत्ताधारी भाजप परिवारात

सतीश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) : दिवंगत केंद्रिय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले. यानिमित्त विखे घराण्याच्या तिसऱ्या- चौथ्या पिढीचे "ब्रॅंडिंग' केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजप परिवारात अगदी व्यवस्थित झाले.

त्याच वेळी या शेतकरी नेत्याच्या आत्मचरित्राच्या प्रकाशानानिमित्त केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या बाजूचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेतमालाचे हमीभाव आम्हीच वाढवून दिले, हा मुद्दा राज्यातील शेतकऱ्यांपुढे जोरकसपणे मांडण्याची संधी पंतप्रधान मोदी यांनी साधली.

एका अर्थाने संयोजक व प्रमुख पाहुणे, या दोघांच्याही दृष्टीने आजचा कार्यक्रम फारच उपयुक्त ठरला. केंद्राचा सुधारित कृषि कायदा शेतकरीहिताचा नाही, अशी भूमिका घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्याच्या अंमलबजावणीस कडाडून विरोध केला आहे. त्यास शेतकरी संघटनांची एकमुखी साथ मिळाली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांत या कायद्याबाबत आणि मोदी सरकारबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानिमित्त मोदी यांनी आपल्या भाषणातील सर्वाधिक वेळ शेतकऱ्यांसाठी दिला. भाजप सरकार हमीभाव वाढविण्याच्या बाजूचे आहे. यापूर्वी अन्नधान्य टंचाई दूर करण्यासाठी केवळ उत्पादनवाढीचा विचार झाला. आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने योजना आखल्या. अर्धवट सिंचन योजनांना निधी दिला. पश्‍चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचे काम सुरू केले. शेतकऱ्यांच्या खिशात थेट पैसे टाकले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतमालाच्या हमीभावात वाढ केली.

‘आत्मनिर्भर भारत' योजनाही शेतीशी निगडीत आहे. इथेनॉलच्या सुधारित धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतील. हे प्रमुख मुद्दे त्यांनी सोप्या भाषेत समजावून दिले. आम्ही शेतकरी विरोधी नाही, तर शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी झाला, हा भाग वेगळा; मात्र शेतकऱ्यांसमोर आपली भूमिका मांडण्याची संधी मोदी यांनी साधली. 

एकेकाळी कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे व आता भाजपवासी झालेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यक्रमाचे फार धोरणीपणाने आयोजन केले. राज्य भाजपात दबदबा असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा योग घडवून आणला. प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. केडर बेस असलेल्या भाजप परिवारात त्यातून योग्य तो संदेश आपोआप गेला. त्यातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे झकास "ब्रॅंडिग' झाले. 
सत्तेच्या सारीपाटावरील डाव जिंकण्यासाठी "इलेक्‍टिव्ह मेरीट' असणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांसाठी दारे उघडण्याची रणनीती भाजपने फार पूर्वीपासून आखली. त्याचा कुठे फायदा, तर कुठे तोटा झाला. मागील निवडणुकीत राज्यात हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास ऐनवेळी तयार झालेल्या महाआघाडीने हिरावला. मात्र, भाजपचे संख्याबळ आणखी वाढले.

"इलेक्‍टीव्ह मेरीट' असलेल्या मंडळींत विखे घराण्याचा समावेश आहे. ते भाजपात आले आणि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पडझड झाली. त्यातून नाराजीचे सूर उमटले. ते थेट दिल्लीपर्यंत गेले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी विखे कुटुंबाच्या चारही पिढ्यांबाबत व्यक्त केलेल्या भावना, हे कार्यक्रमाचे दृश्‍य स्वरूपातील यश म्हणावे लागेल. राजकारण प्रवाही असते. सतत बदलत असते. तथापी भविष्यात काही फायदे दिसले, तर त्याची ही सुरवात होती, असे म्हणता येईल. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT