कर्जत येथील युवक हल्ला प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
कर्जत - येथील युवक हल्ला प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
सोहेल शौकत पठाण (वय २८), अरबाज कासम पठाण (वय २५, दोघे रा. लोहार गल्ली) यांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. ५) अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी जुनेद जावेद पठाण (वय १९), एक अल्पवयीन (दोघे रा. लोहार गल्ली, कर्जत) यांना पिंपरी- चिंचवडहून ताब्यात घेतले. त्यांना मदत करणारे हुसेन कासम शेख (वय ४०, रा. पिंपळे गुरव, पिंपरी- चिंचवड), अरबाज अजित शेख (वय २४, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे) या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
सामाजिक सलोखा भंग करू नये - आमदार रोहित पवार
सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या कर्जतच्या भूमीत धार्मिक द्वेषाच्या घटना कधी घडल्या नाहीत. पुढेही घडणार नाहीत. कारण, संतशिकवणीनुसार वागणारी माणसे इथे आहेत. त्यामुळे या भूमीबाबत प्रत्येकाने योग्य माहिती घेऊनच बोलावे. आमच्या भागातील सामाजिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. कर्जत येथील तरुणावर हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपाला पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
पवार म्हणाले, की भंडाऱ्यात अत्याचार झालेली महिला आज मृत्यूशी झुंज देतेय, परंतु याबाबत आवाज उठवायला ‘आमचं हिंदुत्व’ कधी जागृत होत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमचा तिसरा डोळा कधी उघडत नाही. मात्र, राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आमचे हिंदुत्व जागृत होते, हीच खरी शोकांतिका आहे. या घटनेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
जातीय सलोखा बैठक
कर्जतमध्ये जातीय सलोखा आणि धार्मिक ऐक्य असून, संत गोदड महाराज यांची ती पवित्र भूमी आहे. यामुळे कर्जतची जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात वेगळी ओळख आहे. ती कायम अशीच अबाधित राहावी यासाठी शहरातील सर्व क्षेत्रांतील नागरिकांनी एकत्र येत शनिवारी सायंकाळी नगरपंचायत प्रांगणात जातीय सलोखा बैठक घेतली. गावकरी, प्रशासन आणि संबंधित या सर्वांनी एकत्र येत सर्वमान्य तोडगा काढीत, भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यावर उचित कार्यवाही करण्याचा निर्णय झाला. घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जत शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. आज शहरातील सर्व दुकाने उघडून व्यवहार पूर्ववत सुरळीत झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.