राहुरी : वांबोरी येथील प्रसाद शुगर साखर कारखान्याने आगामी गाळप हंगामासाठी जोरदार तयारी केली असताना, तनपुरे कारखान्याचे घोडे मात्र अडलेलेच आहे. सध्या राहुरी तालुक्यात 12 लाख टन ऊस उपलब्ध आहे. पैकी, आठ लाख टन ऊस गाळपाचे प्रसाद कारखान्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे, कमी भावात येथील उसावर डोळा असलेल्या बाहेरील कारखान्यांचे मनसुबे उधळणार आहेत.
दरम्यान, डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना मागील वर्षी ऊसटंचाईमुळे बंद राहिला. परिणामी, जिल्हा बॅंकेच्या कर्जफेडीचा वार्षिक हप्ता थकला. त्यामुळे बॅंक पुन्हा कारखाना ताब्यात घेईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा मुबलक ऊस आहे. व्यवस्थापनाची कारखाना सुरू करण्याची तयारी आहे. कारखान्याने बॅंकेला कर्जपुनर्गठनाचा प्रस्तावही दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा बॅंकेच्या निर्णयावर कारखान्याचे भवितव्य अवलंबून आहे.
राहुरीत 11 हजार हेक्टरवर ऊस
सलग तीन वर्षे दुष्काळामुळे मागील वर्षी ऊसटंचाईचा फटका बसला. तालुक्यातील "तनपुरे' व "प्रसाद शुगर' हे दोन्ही साखर कारखाने बंद राहिले. मागील वर्षी वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. डिसेंबर-2019 पासून ऊसलागवडी वाढल्या. आगामी हंगामासाठी तालुक्यात 11 हजार हेक्टरवर ऊस उभा आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त 102 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मॉन्सूनपूर्व पावसानेही जोरदार हजेरी लावली. यावर्षी चांगला पाऊस झाला, तर उसाचे वजन वाढेल. तालुक्यात बारा लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे.
आसवणी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
येत्या हंगामासाठी "प्रसाद शुगर'चे ऊस नोंदीचे काम सुरू आहे. आतापर्यंत सात हजार हेक्टर उसाच्या नोंदी झाल्या आहेत. कारखान्याची दैनिक गाळप क्षमता चार हजार टन आहे. नवीन मशिनरी असल्याने, साडेचार हजार टन ऊसाचे गाळप होते. 160 दिवसांच्या हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. दैनिक 60 हजार लिटर क्षमतेच्या अत्याधुनिक आसवणी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये प्रकल्प कार्यान्वित होऊन, इथेनॉल व अल्कोहोल उत्पादन सुरू करण्याचे कारखान्याचे नियोजन आहे.
सहवीज निर्मिती प्रकल्पाचे काम बंद
प्रसाद शुगरचा दैनिक 25 मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु, कोरोनामुळे तीन महिन्यांपासून प्रकल्प उभारणीचे काम बंद पडले. आता सप्टेंबर 2021मध्ये प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे.
15 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू
"प्रसाद शुगर'चा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहोत. त्यादृष्टीने ऊसनोंदी व ऊसतोडणी, वाहतूक यंत्रणांचे करार सुरू आहेत. हार्वेस्टरचा वापर वाढणार आहे. हार्वेस्टर मालक व संस्थांनी संपर्क साधावा. नवीन हार्वेस्टर घेणाऱ्यांना बॅंकेसाठी हमीपत्र देण्याचे कारखान्याचे धोरण आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना शेतकरीहित जोपासत आहे.
- सुशीलकुमार देशमुख, कार्यकारी संचालक, प्रसाद शुगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.