Shirdi Lok Sabha 2024
Shirdi Lok Sabha 2024 Esakal
अहमदनगर

Shirdi Lok Sabha 2024: ‘वंचित’च्या एन्ट्रीने शिर्डीची लढत तिरंगी! महाविकास आघाडीची मते विभागणार?

सकाळ वृत्तसेवा

एरवी शांत आणि निवांत भासणारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक काल वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदारसंघातील दोन लाखांहून अधिक असलेल्या नवबौध्द मतदारांतील नाराजीवर फुंकर घालत आणि आपण जिंकण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याची घोषणा करत रूपवते यांनी या मतदारसंघातील लढत दुरंगी नव्हे, तर तिरंगी होण्याचे संकेत दिले.

गेल्या दोन निवडणुकांत मोदी लाटेचा प्रभाव होता. त्यामुळे या राखीव मतदारसंघातून महायुती व शिवसेनेच उमेदवार सदाशिव लोखंडे विनासायास लोकसभेत गेले. या निवडणुकीत मात्र मोदी लाटेचा प्रत्यक्ष प्रभाव जाणवत नाही. लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे या दोन्ही उमेदवारांकडे संस्थात्मक ताकद आणि त्यातून उभी राहणारी स्वतःची यंत्रणा नाही. त्यामुळे वातावरणनिर्मिती फारशी झालेली नाही.

आधी उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभांमुळे या दुरंगी निवडणुकीची थोडीफार तरी चर्चा सुरू झाली. त्यातच काल रूपवते यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काल परवापर्यंत दुरंगी असलेली ही लढत तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कॉँग्रेस पक्षात सक्रिय असलेल्या रूपवते यांच्या संघटनात्मक कामाच्या निमित्ताने उत्तर नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या वर्तुळात मोठा संपर्क होता. अकोले हे त्यांचे होमग्राऊंड आणि संगमनेरात त्या सर्वदूर परिचित. या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची परंपरागत मतपेढी मोठी असल्याने ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी त्यांनी पक्षाचे ज्येष्ठनेते आमदार बाळासाहेब थोरात आणि इतर काही नेत्यांना साकडे घातले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत संपर्क होता.

त्यातून त्यांनी ही मागणी दिल्लीतील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापर्यत पोहोचवली. मात्र, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मागील तीन निवडणुकांच्या आधारे या जागेवर हक्क सांगितला. ठाकरेंना दुखवायचे नाही. हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचे धोरण होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळविता आली नाही. मात्र, त्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले हे कॉँग्रेसचे तत्कालिन नेते व सध्याचे भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते.

रूपवते यांच्याकडे असलेली हक्काची मतपेढी आणि त्यांचा सर्वसमावेश चेहरा यामुळे त्या स्पर्धेत देखील येऊ शकतात. यापूर्वी या मतदारसंघात माजी खासदार कै. शंकरराव काळे यांच्या विरोधात भाजपचे भीमराव बडदे हे तुलनेत स्पर्धेत नसलेले उमेदवार मतदारांनी विजयी केले होते. हे लक्षात घेतले, तर ही लढत तिरंगी आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीची मते विभागणार

काँग्रेसकडून संधी मिळत नसल्याने रूपवते यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांना साकडे घालून उमेदवारी मिळविली. मात्र, या सर्व घडामोडी घडत असताना रूपवते यांनी फारसा गाजावाजा न करता उत्तरेतील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत सातत्याने संपर्क ठेवला होता. महाविकास आघाडीची मते विभागली जाणार असल्याने, महायुतीच्या दृष्टीने त्यांची उमेदवारी उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळे त्या गोटातून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT