नेवासे / शेवगाव : देशी दारूने भरलेल्या आणि बेदरकार मद्यधुंद चालकाच्या ताब्यातील सुसाट ट्रकच्या भरधाव वेगाचा थरार अखेर शेवगाव येथील क्रांती चौकातील दुकानात शिरून थांबला. मंगळवारी काल रात्री तेच्या सुमारास टाकळीभान ते शेवगाव अशा 50 ते 60 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील अनेकांनी अनुभवलेला साक्षात यमदुताचा प्रवास सोशल मिडीयावरील जागरूक तरुणांमुळे आणि शेवगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे कुठल्याही जीवितहानी शिवाय थांबला.
अधिक माहिती अशी, की कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथील साखर कारखान्यातून 900 ते एक हजार देशी दारुचे खोके घेऊन नांदेड येथे निघालेला ट्रक घेऊन चालक बाळू विक्रम खुपसे (रा. लुका मसला ता.गेवराई) टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे आला असता एकास जोरदार हुलकावणी दिली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे घाबरलेल्या चालकाने अधिक सुसाट वेगाने ट्रक चालवत नेवासा येथील रस्त्यावर पोलिसांनी आडव्या लावलेल्या बॅंरिकेटस तोडून लक्झरी बस, ट्रकला धडक देऊन शेवगावकडे निघाला. त्यात ट्रकचालक रिजवान शेख जबर जखमी झाला. रस्त्यात आडव्या आलेल्या पाच ते सहा दुचाक्यांनाही हुलकावणी दिली.
आवश्य वाचा नगर जिल्ह्यात या मंडळात मुसळधार पाऊस....
याबाबतची माहिती आणि व्हीडिओ युवकांनी सोशल मिडीयावर टाकून पुढे रस्त्यावरील नागरिकांना सतर्क केले. पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांनाही माहिती मिळताच त्यांनी शेवगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान गोरे, सुजित ठाकरे, राजू चव्हाण यांच्यासह पोलिसांनी क्रांती चौकात फौजफाटा तैनात करून बॅंरिकेटस लावले. दरम्यान, जोहरापूरनजीक ढोरा नदीच्या पुलाजवळ ट्रकचे चालकाच्या बाजूचे दोन्ही टायर फुटले. तरीही ट्रक सुसाट असल्याने शेवगाव शहरात पोलिस व ग्रामस्थांनी आरडाओरडा करत त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने बॅंरिकेटस तोडून जाण्याचा प्रयत्न केला. चौकातील वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून तो समोरील आशिया मोबाईल गॅंलरी या दुकानात शिरला. या जोरदार धडकेमुळे दुकानामागील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेची संरक्षक भिंत ही पडली. जखमी अवस्थेतील चालकास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरे यांनी ट्रकमधून बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ट्रकमधील दारूचे खोके रात्री उशिरा नेवासा येथे नेण्यात आले. ट्रकही क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरून हटविण्यात आला.
पोलिसांसह नागरिकांनी केला पाठलाग
बॅंरिकेट्स तोडून आणि वाहनांना धडकावून नेवासा येथून सुसाट निघालेल्या या ट्रकचा पाठलाग नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित डेरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल संभाजी गर्जे, मोहन गायकवाड, अंबादास गिते, जयवंत तोडमल, अशोक कुदळे यांच्यासह नेवासा, भेंडा व कुकाणा येथील नागरिकांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या चालकाने गाडी थांबवली नाही. ट्रकचे टायर फुटल्याने व शेवगाव पोलिसांच्या दक्षतेमुळे तो तब्बल 60 किलोमीटरच्या प्रवासानंतर शेवगाव येथे थांबला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.