Balanced Investment
Balanced Investment Sakal
अर्थविश्व

अर्थभान : समतोल गुंतवणुकीचे तंत्र

अरविंद परांजपे

पत्ते खेळत असताना जेव्हा उतारी करायची असते, तेव्हा आपला हात होण्याच्या दृष्टीने सुरवातीला एक्का टाकला जातो. तसेच गुंतवणुकीची सुरवात ‘बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंड’ (बॅफ) किंवा ‘डायनॅमिक अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ करणाऱ्या योजनांपासून केली तर लाभ होण्याची शक्यता जास्त आणि तोटा होण्याची कमी असते. शेअर बाजार अस्थिर असणारच आहे, हे ज्यांना मान्य आहे, त्यांच्या फायद्यासाठी या योजनांची रचना केलेली असते. या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराच्या चंचलतेचा फायदा घेऊन जेव्हा बाजार वर असतो, तेव्हा शेअरची विक्री आणि खाली आला की खरेदी, असे सूत्र राबविण्यात येते. म्हणजेच ‘बाय लो अँड सेल हाय’ हे सूत्र वापरले जाते. गुंतवणुकीचे यश हे ‘अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ कसे आहे, यावर अवलंबून असते. ‘बॅफ’ प्रकारातील गुंतवणुकीने ‘ॲ‍सेट अ‍ॅलोकेशन’ आणि त्याचे सतत ‘रि-बॅलन्सिंग’ या दोन्ही बाबी एकाच योजनेतून होऊ शकतात. या योजनेत इक्विटी या अ‍ॅसेट वर्गातील (इक्विटी शेअर + इक्विटी आर्बिट्राज) आणि निश्‍चित ठेव प्रकार असे दोन अ‍ॅसेट वर्ग एकत्रित असतात. आता ‘रिट्स’चाही यात समावेश केला जात आहे. पण यांचे प्रमाण हे स्थिर नसते, तर ० टक्के ते १०० टक्के या पट्ट्यामध्ये ते बाजाराच्या मूल्यांकनानुसार बदलते राहते. त्यामुळे यांना ‘डायनॅमिक अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ म्हणतात.

इक्विटी हा अ‍ॅसेट प्रकार चंचल असल्याने जास्त जोखमीचा समजला जातो. पण ही जोखीम आहे याचा अर्थ योजनेत गुंतवलेली रक्कम कमी होऊ शकेल; परंतु अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक असल्याने रक्कम बुडाली, असे होत नाही. तसेच यातील कंपन्यांची निवड करताना मुख्यत्वे मिडकॅप/स्मॉलकॅप कंपन्यांच्या तुलनेने अधिक स्थिरभाव असणाऱ्या आणि कमी जोखीम असणाऱ्या लार्ज कॅप कंपन्यांची निवड केली जाते. इक्विटी आणि डेट प्रकाराचे प्रमाण ठरविण्याचे सूत्र म्युच्युअल फंड कंपनीनुसार वेगवेगळे असते. यामध्ये शेअर बाजाराचे मूल्यांकन दर्शविणारे प्राईस अर्निंग- पी/ई रेशो, प्राईस-बुक व्हॅल्यु- पी/बी रेशो हे घटक असतात. याशिवाय शेअर बाजाराचा कल चढा आहे, का उतरता आहे; तसेच अन्य टेक्निकल पॅरामीटरही विचारात घेऊन इक्विटी/डेट प्रकाराचे प्रमाण ठरविले जाते.

सध्या शेअर बाजार सर्वोच्च पातळीवर असताना, ‘बॅफ’ प्रकारच्या योजनांमध्ये साधारणपणे ३५ ते ४० टक्के एवढे इक्विटी शेअरचे प्रमाण आहे. आर्बिट्राज धरून एकूण ६५ टक्क्यांपेक्षा जास्त इक्विटी प्रकार असल्याने ‘बॅफ’ योजनांना १० टक्के सवलतीचा भांडवली कर आकारला जातो. यातील डेट प्रकारातील रोखे निवडतानाही फक्त ‘एएए’ असे पतमानांकन (रेटिंग) असलेल्या म्हणजेच सर्वोच्च सुरक्षा असलेल्या रोख्यांना प्राधान्य दिले जाते. इक्विटी आणि डेट प्रकारातील प्रमाणांचे पुनर्संतुलन रोज/आठवड्याने/महिन्याला ठराविक सूत्राचा अवलंब करून केले जाते.

प्राप्तिकर सवलती

पोर्टफोलिओ रि-बॅलन्सिंगसाठी गुंतवणूकदाराने जर स्वत: इक्विटी आणि डेट प्रकारातील योजनांची खरेदी/विक्री केली, तर प्रत्येक वेळी भांडवली लाभ कर आणि योजनेला लागू असलेले १ टक्का ‘एक्झिट लोड’ही द्यायला लागते. पण या योजनांमध्ये फंड व्यवस्थापकच हे काम करीत असल्याने हा भार गुंतवणूकदारावर पडत नाही, हा सुद्धा फायदा आहे. या योजनेचा उपयोग दोन प्रकारे होऊ शकतो.

एसडब्लूपी (सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन) - म्हणजे नियमितपणे बॅंकेपेक्षा अधिक दराने परतावा मिळण्यासाठी. मागील तीन वर्षांत या प्रकारच्या योजनांनी सरासरी ९.५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. त्यामुळे ७ टक्के वार्षिक दराने तुम्हाला यातून रक्कम काढता येणे शक्य आहे. तसेच ही योजना इक्विटी प्रकारातील असल्याने प्रत्येक व्यक्तीला एक लाख रुपयांपर्यंत भांडवली लाभ दरवर्षी करमुक्त आहे.

एक उदाहरणाद्वारे हे अधिक स्पष्ट करता येईल. महिन्याला एक लाख म्हणजे एका वर्षात १२ लाख रुपये जर तुम्ही ‘बॅफ’ योजनेतून काढले, आणि ७ टक्के परतावा मिळाला, तर ही पूर्ण रक्कम म्हणजे १४ लाख करमुक्त मिळतील. कारण ०.९८ लाख एवढा भांडवली लाभ करमुक्त होईल. त्यापेक्षा जास्त काढले तरी त्यावरील लाभावर फक्त १० टक्के कर लागेल. बँकेच्या ठेवींवर मात्र तुमच्या करपात्रतेनुसार (जो ३० टक्क्यांपेक्षाही जास्त असू शकतो!) कर आकारला जातो. म्हणजे ‘बॅफ’मधील ७ टक्के करमुक्त परतावा हा ३० टक्के कर लागू असणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने बघितला, तर १० टक्के करपात्र एवढा होईल. पति आणि पत्नी या दोघांच्याही नावावर जर ‘एसडब्लूपी’ केले तर एका आर्थिक वर्षात एकूण २८ लाख एवढी रक्कम करमुक्त स्वरूपात (७ टक्के परतावा धरून) मिळू शकेल. या प्रकारातील योजनांवर तुम्ही गुंतविलेल्या रकमेच्या १० टक्के रक्कम ‘एक्झिट लोड’शिवाय पहिल्या वर्षात सुद्धा काढता येते.

पोर्टफोलिओला स्थिरता - म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला स्थिरता देण्याचे काम ‘बॅफ’ योजना करतात. सध्या डेट योजनांवरील परतावा कमी झाल्याने इक्विटीचा समावेश असलेल्या या ‘बॅफ’ प्रकारांचा पोर्टफोलिओत समावेश असणे फायदेशीर झाले आहे. त्याने एकूण जोखीम कमी होते.

बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंड अशा रितीने तुम्हाला दुहेरी फायदा करून देतील, पण त्यासाठी गुंतवणूक कालावधी किमान तीन वर्षे तरी असावा. बहुतेक सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांनी त्यांची मॉडेल तयार केल्याने फंड मॅनेजरचा हस्तक्षेप कमी होऊन भावनात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता कमी झाली आहे.

किती परतावा मिळू शकतो?

‘बॅफ’ प्रकारातील सर्वांत पहिली योजना असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ‘बॅफ’ने मागील पाच वर्षांच्या कालावधीत किमान ६.५ टक्के वार्षिक दराने, तर कमाल १३ टक्के एवढे तीन वर्षांचे ‘रोलिंग रिटर्न’ दिले आहेत, जे परताव्यातील सातत्य दाखवते. इक्विटीचे प्रमाण कमी करून जोखीम कमी करायची असेल, त्यांनी ‘बॅफ’ सारखीच रचना असलेल्या इक्विटी सेव्हिंग्ज प्रकारातील योजनांचाही विचार करायला हरकत नाही.

(लेखक म्युच्युअल फंड क्षेत्रातील अनुभवी सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT