share market
share market sakal media
अर्थविश्व

उंच माझा झोका... पण पुढे काय?

सकाळ वृत्तसेवा

अवघ्या २८ दिवसांत ‘निफ्टी’ने १६,००० अंशांवरून १७,००० अंशांवर मजल मारली आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य गुंतवणूकदार पूर्णपणे गोंधळला. गेले सहा महिने १५ ते १६ हजार असा सरपटत प्रवास करणारा ‘निफ्टी’ अंगात संचार झाल्यासारखा हजार अंशांनी का वाढावा व आता आपण काय करावे, असा तो गोंधळ आहे. साध्या गुंतवणूकदारापासून कित्येक तज्ज्ञदेखील बाजार खाली आल्यावर गुंतवणूक करू, असे ‘निफ्टी’ १४,००० असल्यापासून म्हणत आहेत. बाजार महाग तर आहेच व तो अधिकाधिक महाग होत चालला आहे. मग करावे तरी काय? ‘निफ्टी’ १७,१३२ अंशांवर पोचल्यावर अजूनही मान वर करून तेजी करायला सांगणे मोठे हिमतीचे काम आहे.

शेअर बाजाराने उंच झोका घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर, पुढील मुद्द्यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरेल.

  • पुढील पाच वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतील, तर ५० टक्के पैसे आज गुंतवावेत. उरलेले राखीव ठेऊन आपल्या अपेक्षेप्रमाणे बाजार १० टक्के खाली आलाच तर टाकावेत.

  • ‘निफ्टी’ची चालू वर्षाची मिळकत ७५० रुपये असेल, असा अंदाज आहे व २०२२-२३ मध्ये किमान ८५० रुपये असेल. या मिळकतीवर पी/ई रेशो २० येतो. म्हणजेच वाटतो तेवढा बाजार महाग नाही.

  • बरेच जण बाजारात घसरण किंवा ‘करेक्शन’ येण्याची वाट बघत आहेत. पण आपल्या नकळत बाजारात वेगवेगळ्या ‘मार्केट कॅप’मधे घसरण (करेक्शन) येऊन गेल्याचे निरीक्षण आहे.

  • पाच फेब्रुवारी रोजी ‘निफ्टी’ने प्रथम १५,००० अंशांची लक्ष्मणरेषा ओलांडली आणि १६,००० अंश पार करायला दोन ऑगस्ट उजाडला. म्हणजेच ‘निफ्टी’ या काळात ‘कन्सॉलिडेट’ होत होता आणि मिड व स्मॉल कॅप शेअर वाढत होते.

  • ‘कोविड’ची दुसरी लाट आली; पण ‘निफ्टी’ १५,००० अंशांच्या खाली आला नाही. साथ आटोक्यात आली, मिड कॅप व स्मॉल कॅपने नवे उच्चांक केले आणि त्यांनी पुढील चालीचे ‘बॅटन’ लार्ज कॅपच्या हाती दिले. मिड कॅप निर्देशांक वाढून चार ऑगस्ट २०२१ रोजी २८,३७७ वर पोचला, तो २३ ऑगस्ट रोजी २६,८९२ वर बंद झाला. आपल्या नकळत झालेली ही १४८५ अंशांची मंदी होती. हीच या निर्देशांकाची आधार पातळीही होती. त्यामुळे तिथूनच तो पुन्हा उसळला. तीच गत स्मॉल कॅपची. म्हणजेच निर्देशांक खाली येऊन गेले, पण ते आपल्याला कळले नाहीत.

  • जगभरचे बाजार अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल काय बोलतात, याकडे डोळे लावून बसले होते. पण त्यांनी अत्यंत मिळमिळीतपणे निवेदन केले, की आम्ही बाँड खरेदी कमी करणारच आहोत, किंबहुना करावीच लागेल, महागाई कदाचित कमी होऊ शकते, न झाल्यास आमचा बडगा तयार आहे वगैरे वगैरे. या सारख्या निवेदनांमुळे जगाला कळायचे ते कळले आणि जगभरचे बाजार उसळले. आपलाही बाजार त्याला अपवाद ठरला नाही.

  • सर्व उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय बाजार नेत्रदीपक उसळी दाखवीत आहेत. या उलट, चालू वर्षात चीनच्या नियामकांनी घातलेल्या कठोर निर्बंधांमुळे तेथील बाजार चार टक्क्यांनी खाली आले आहेत. ‘एमएससीआय’ निर्देशांकाची पुनर्बांधणी नोव्हेंबरमधे होईल, त्यावेळी भारतीय बाजाराचा हिस्सा ८.८ टक्क्यांवरून वाढेल, अशी अपेक्षा आहे. त्याला धरूनही काही खरेदी होत आहे.

  • बाजार इतक्या वेगाने वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे ‘शॉर्ट कव्हरिंग’. बाजार खाली येणार, यावर काही मोठ्या दिग्गजांचे एकमत होते. बाजाराच्या प्रत्येक पातळीवर त्यांची मंदी वाढतच होती. त्यातील मंदी काही प्रमाणात कापली जाऊन बाजार वाढले.

  • मोठे पेन्शन फंड भारतात पैसे गुंतवण्यासाठी तयार आहेत. कल्पना करा, जर अशा मार्गाने नव्याने ३५ ते ४० हजार कोटी रुपये भारतीय बाजारात आले तर ‘निफ्टी’ कोठे जाईल? तसे होईलच, असे नाही, पण होऊदेखील शकते.

  • ‘बँक निफ्टी’ने अजूनही जुना उच्चांक मोडलेला नाही. नुकतीच तिथे तेजी सुरु झाली आहे.

    रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला क्रेडिट कार्ड विकायला आता परवानगी दिली आहे आणि ‘बँक निफ्टी’ उसळला.

  • क्षेत्रबदल हा प्रत्येक तेजीचा महत्त्वाचा घटक आहे. आतापर्यंत आयटी क्षेत्र तेजीत होते, कदाचित ती आघाडी आता खासगी बँका घेतील, आयटी थोडा विसावा घेईल.

थोडक्यात काय, तर चोखंदळपणे प्रत्येक क्षेत्रात वा ‘मार्केट कॅप’मधे होणारी घसरण ओळखून व तिचा फायदा घेऊन खरेदी करणे, हे सूत्र सांभाळले, तर मनात गोंधळ राहणार नाही. आपल्या मदतीला शेवटी ‘स्टॉपलॉस’ असतोच.

- भूषण महाजन (शेअर बाजार विश्लेषक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT