ahilyadevi holkar
ahilyadevi holkar esakal
Blog | ब्लॉग

Ahilyabai Holkar Jayanti : त्याकाळात अहिल्यादेवींची तुलना इंग्लंड, डेन्मार्क, रशियाच्या महाराणींसोबत केली जायची..

सकाळ वृत्तसेवा

इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी ज्यांची तुलना इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ, रशियाची राणी कॅथरीन आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली अशा मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९८ वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याला दिलेला हा संक्षिप्त उजाळा.

प्रा. डॉ. विजय चव्हाण

मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमी राज्यकर्ती म्हणून परिचित असलेल्या अहिल्यादेवींचा जन्म महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील. जामखेड तालुक्यातील चोंडी गावात ३१ मे १७२५ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे तर आईचे नाव सुशीलाबाई होते.

मानकोजी शिंदे गावचे पाटील होते. ज्या काळात महिलांना घराचा उंबरादेखील ओलांडण्याचा अधिकार नव्हता, त्याकाळी मानकोजींनी अहिल्यादेवीला शिक्षणाचे धडे दिले. अहिल्यादेवी विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या.

बालवयात धैर्य, साहस, प्रेम, करुणा, या गुणांनी परिपूर्ण असलेल्या अहिल्यादेवींना पाहून माळवा प्रांताचे शासक मल्हारराव होळकर प्रभावित झाले आणि त्यांनी त्वरित मानकोजीकडे आपल्या पुत्रासाठी अहिल्यादेवींची मागणी घातली. मानकोजीच्या होकारानंतर वयाच्या आठव्या वर्षी बालवयातच अहिल्यादेवींचा खंडेराव होळकरांसोबत विवाह झाला आणि त्या होळकर कुटुंबाच्या सूनबाई बनल्या.

सुभेदार मल्हारराव होळकरांचा आपल्या सुनेच्या कर्तृत्वावर आणि योग्यतेवर पूर्ण विश्वास होता. म्हणून ते अहिल्यादेवींना राज्यकारभारासोबतच महत्त्वाच्या पत्रव्यवहारांची, सैन्याच्या व्यवस्थेची, रणनीतीची, प्रशासनाची, प्रजापालनाची आणि न्यायदानाची शिकवण देत असत.

अहिल्यादेवीदेखील मल्हाररावांना आपले राजकीय गुरू मानून त्यांच्या सल्ल्यानुसार वागत. अहिल्यादेवींना पती खंडेरावापासून १७४५ साली मालेराव हा मुलगा आणि १७४८ साली मुक्ताई ही कन्या झाली. सुखाचा संसार सुरू असताना अचानक त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

१९ मार्च १७५४ रोजी कुंभेरीच्या लढाईत पती खंडेरावांना वीरमरण आले. त्यामुळे अहिल्यादेवींना अठ्ठाविसाव्या वर्षीच वैधव्याला सामोरे जावे लागले. अहिल्यादेवींनी त्यावेळच्या प्रथेनुसार सती जाण्याचा निर्णय घेतला.

पण, मल्हाररावांनी त्यांना असे करण्यापासून रोखले आणि म्हणाले, ‘तूच माझा खंडू आहेस मला म्हाताऱ्याला टाकून तू कुठे चाललीस? प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये, हे राज्य तुला सांभाळायचे आहे’. सासऱ्यांचा मान राखून आणि विनंतीला मान देऊन सती जाण्याऐवजी अहिल्यादेवी राज्यकारभारात सक्रिय झाल्या.

दौलतीचा कारभार मोठा असलेल्या इंदूर संस्थानाची जहागिरी पेशव्यांनी मल्हाररावांकडे सोपवली होती. पण, दुर्दैवाने १७६६ साली मल्हाररावांचे निधन झाले. त्यामुळे माळवा प्रांताची जबाबदारी अहिल्यादेवींच्या नेतृत्वात त्यांचे चिरंजीव मालेराव होळकर यांच्याकडे सोपविण्यात आली.

पण, १७६७ साली मालेरावांचा देखील मृत्यू झाला आणि अहिल्यादेवींवर आभाळ कोसळले. अखेर माळवा प्रांताची सूत्रे अहिल्यादेवींनी १७६७ आपल्या हाती घेतली. सुधारणावादी विचारांच्या अहिल्यादेवींनी राज्याच्या विकासाकरिता पूर्वीच्या कायद्यामध्ये परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या.

‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांची जाचक कराच्या अटीतून मुक्तता करून त्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून दिले. गावोगावी शाळा काढून ज्ञानप्रसाराचे काम केले. सती प्रथेला विरोध करून अंधश्रद्धेचे निर्मूलन केले. प्रवासादरम्यान उपद्रव्य करणाऱ्या भिल्ल, गोंड आणि अन्य आदिवासी लोकांचे मत परिवर्तन करून त्यांना भिलकवडी कर घेण्याचा हक्क मान्य केला.

महेश्वर दरबाराचा थाट हा त्याकाळी एखाद्या स्वतंत्र राजासारखा होता. म्हणून १७७२ साली अहिल्यादेवींनी राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली. तिथे अनेक वास्तू बांधल्या. नदीला घाट बांधले. मंदिराचा जीर्णोद्वार केला.

पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वर विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. म्हणून त्यांनी वस्त्रोद्योगांना प्रोत्साहन दिले. युद्धासाठी लागणाऱ्या दारूगोळ्याच्या कारखान्याबरोबरच त्यांनी अनेक उद्योगांना राजाश्रय दिला. त्यांची लोककल्याणकारी कीर्ती ऐकून अनेक विद्वान पंडित, त्यांची भेट घेण्यास महेश्वरला येत होते.

अनेक विषयांचे शास्त्री, कीर्तनकार व्याकरणकार, ज्योतिषी, पूजारी, वैद्य, हकीम यांनाही अहिल्यादेवी मुद्दाम बोलावून घेत होत्या. त्यामुळे महेश्वर नगरी ही त्याकाळी संस्कृती, विद्वान व धर्माचे माहेरघर म्हणून ओळखली जायची.

अहिल्यादेवी कर्तृत्ववान आणि पराक्रमी राज्यकर्त्या तर होत्याच; शिवाय त्या दानशूरही होत्या. द्वारका, रामेश्वरम, बद्रिनाथ, सोमनाथ, अयोध्या, जगन्नाथपुरी, काशी, गया, हरिद्वार अशा वेगवेगळ्या ठिकाणांच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. धर्मशाळा बांधल्या, घाट बांधले, रस्त्याची कामे केली. पुणे ते महेश्वर अशी टपाल सेवा सुरू केली.

सरकारी तिजोरीतून एक कवडीही खर्च न करता वरील सर्व कामे आपल्या स्त्रीधनातून करणाऱ्या अहिल्यादेवी या दानशूर आणि उदार शासक होत्या. भल्याभल्यांना लाभली नाही ती दूरदृष्टी त्यांना लाभली होती. कुशल प्रशासक आणि पराक्रमी राज्यकर्ती म्हणून ४१ वर्षे राज्य करणाऱ्या अहिल्यादेवी १३ ऑगस्ट १७९५ रोजी अनंतात विलीन झाल्या.

आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा सामना करून त्यांनी ज्या पद्धतीने, दुर्दम्य आशावादाने स्त्रीशक्तीचा वापर केला तो खूप प्रशंसनीय आहे. महिलांकरिता त्या कायम, अदम्य नारीशक्ती, वीरता, पराक्रम, न्याय आणि राजतंत्रांचा एक अद्वितीय नमुना आहे.

बाणेदार, स्वाभिमानी आणि उत्तम राज्यकर्ती असलेल्या अहिल्यादेवींचे विचार, कार्य आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा ही आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

जिल्हाध्यक्ष, वसंतरावजी नाईक अधिकारी, कर्मचारी संघटना, अकोला

मो. ९५४५२१७१४७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT