india flag
india flag 
Blog | ब्लॉग

स्वातंत्र्योत्तर भारताचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण: एक चिंतन

सकाऴ वृत्तसेवा

- पी. विठ्ठल

आपला आज देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाला उधाण आले आहे आणि ते स्वाभाविकही आहे. लाल किल्ल्यापासून ते गाव खेड्यापर्यंत देशभक्तीचा महापूर नेहमीप्रमाणेच ओसंडून वाहत आहे. 'भारत माता की जय' असे नारे दिले जात आहेत. देश किंवा मातृभूमीविषयीची ही विलक्षण आस्था खूप महत्त्वाची आहे. म्हणजे या दिवशी आपण किमान 'भारतीय' म्हणून एक होत असतो. 'एकतेचं' यापेक्षा वेगळे दर्शन एरवी आपल्याला पाहायला मिळत नाही. पिढी दरपिढी ही ऐक्य भावना आपण वारसाहक्काने हस्तांतरित करत राहतो.

आपल्या देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्यापुढे उभा आहे. सुमारे दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक संघर्ष आपण सगळेजण जाणून आहोत. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत'. ही सर्वव्यापी प्रतिज्ञा आणि संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे. 'सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य' असल्याचा आपल्याला अभिमान आहे.

साडेसात दशकाचं स्वातंत्र्य आपण उपभोगलं आहे. ज्ञान, विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण इ.असंख्य क्षेत्रातले आपले यश लक्षणीय आहे. शिवाय 'सामाजिक समता' (?) ही आपल्या समाज निर्मितीची एक विलक्षण बाजू आहे. सर्वार्थाने संपन्न, सुसज्ज आणि सुसंस्कृत देश अशी आपली जगात ओळख आहे. आपला देश सामर्थ्यशाली आहे. आधुनिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात लोकशाही आहे. 'लोकशाही' हे जगण्याचं एक सर्वोच्च मूल्य आहे. आपण लोकशाही भारताचे नागरिक आहोत. लोकशाही या शब्दाचा दुसरा अर्थ 'स्वातंत्र्य'.

तर हे स्वातंत्र्य आपण सुमारे साडेसात दशके उपभोगत आहोत. आणखी पंचवीसेक वर्षानंतर आपला देश स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल. म्हणजे काळ पुढे पुढे सरकत जातो, तसतसा देशाचा इतिहास अधिक प्राचीन होत जातो. 'अमृत महोत्सवी वर्ष' हा काळाचा एक मोठा टप्पा आहे. आणि या टप्प्यात दोन शतकांचा अतिभव्य इतिहास सामावलेला आहे. हा इतिहास ब्रिटिशांच्या वर्चस्वातून मुक्त होण्याचा जसा आहे, तसाच नव्या भारताच्या उभारणीचा रस्ता अधिक प्रशस्त करणाराही आहे. भारताच्या इतिहासात एकविसावे शतक हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. या शतकाने आपल्याला राष्ट्रवाद शिकवला. या शतकाने स्वातंत्र्याची चळवळ गतिमान केली. आणि याच शतकाने परिवर्तनाची प्रेरणा देखील दिली. अर्थात या सगळ्या गोष्टी सहज घडल्या नाहीत. यामागे एक व्यापक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. याच पार्श्वभूमीमुळे आपल्याला आपल्या परंपरागत स्थितिशीलतेचा भंग करून नव्या बदलाचा स्वीकार करता आला.

आज आपला देश अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, ही घटना अनेकार्थाने महत्त्वाची आहे; पण या काळाचं परिशीलन करायचं तरी कसं? या काळाचं मूल्यमापन करायचं तरी कसं? या काळाचा लेखाजोखा मांडला तर हाती काय लागतं ? म्हणजे भौतिकदृष्ट्या संपन्न होत असताना आणि एकविसाव्या शतकाची दोन दशकं पार करून झाल्यावरही आपण आपल्या समाजव्यवस्थेचे निकोप विश्लेषण करू शकतो काय? धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे आपण धर्माचे प्राबल्य दूर ठेवून जगू शकतो काय? विशेष म्हणजे ज्या देशाला एक मोठी वैचारिक परंपरा आहे. विचारांचा समृद्ध वारसा आहे. त्या परंपरेचे आपण खरोखरच 'वाहक' आहोत काय? आपल्या ऐक्यभावनेचे सांस्कृतिक धागे एवढे तकलादू कसे काय झाले? गटातटाच्या समकालीन छावण्या कशा काय प्रभावी ठरल्या? 'माझा देश, माझं व्हिजन' या विषयावरच्या वांझ चर्चा आपण किती दिवस ऐकणार आहोत? या चर्चेतून नेमका कोणता 'आशय' प्रकट होतो?

उद्योग, कृषी, शिक्षणासह आपली झालेली भरभराट विलक्षण आनंददायी असली तरी आपण रोजगाराच्या पुरेशा संधी खरोखरच निर्माण करू शकलो आहोत का? भ्रमनिराशेच्या दलदलीत सापडलेल्या सुशिक्षित तरुणाईचा उद्रेक झाला तर आपण त्यांना कसं समजावून घेणार आहोत? प्रगतीशील कृषीराष्ट्र ही आपली ओळख असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं काय? एकमेकांकडे बघण्याचा आपला पारंपरिक दृष्टीकोन खरंच बदलला आहे का? की तो अधिक प्रदूषित झाला आहे? पुरोगामी विचारधारेचे स्मरण करणारे आपण आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात खरंच 'आधुनिक' झालो आहोत काय?

जगाला कवेत घेण्याची क्षमता आमच्याकडे आली. आम्ही वैश्विक बनण्याचा निर्धार केला. आम्ही सृजनाच्या, नवनिर्माणाच्या नव्या दिशांचा शोध घेतला. आम्ही आमच्या संस्कृतीचा उद्घोष केला. समृद्धीची शिखरे चढलो. सर्वांगीण विकासाचे प्रारूप तयार केले. एकात्मतेची गाणी लिहिली. नव्या मूल्यांचा उद्घोष केला. इतिहासाची पुनर्मांडणी केली. जगातल्या सगळ्या क्षेत्रावर हुकूमत गाजवण्याचे सामर्थ्य बाळगले. म्हणजे एकीकडे अशी वैश्विक घोडदौड होत असताना आपण सलोख्याचे, सौहार्दाचे प्रदेश निर्माण करू शकलो आहोत काय?

जात, धर्म आणि विविध अस्मितांच्या पोकळ गप्पा आपल्याला प्रिय आहेत. राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात असलेली मक्तेदारी मोडीत काढणे म्हणजे प्रगती नसते, तर त्या क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर नैतिकतेने वागणे महत्त्वाचे असते. पण ही नैतिकता आम्ही जपली नाही. आम्ही स्वैराचारी झालो. मनमानी झालो.

स्वातंत्र्योत्तर साडेसात दशकात आपण नेमकं काय मिळवलं? आणि काय गमावलं? याचा विचार करायला हवा. देश आणि राज्यात अनेकदा सत्तांतरे झाली. विविध विचारधारांचे पक्ष आणि संघटना उदयाला आल्या. मूल्यात्मक राजकारण हळूहळू बाद होत गेले आणि हितसंबंधाच्या विध्वंसक 'खेळा'लाच आपण राजकारण म्हणायला शिकलो. नेहरू ते मोदी हा स्वातंत्र्योत्तर भारताचा प्रदीर्घ प्रवास आहे. हा प्रवास विविध वाटा आणि वळणांचा आहे. संघर्षाचा आहे. वर्तमान भारताचा एक्स-रे काढला तर आपल्याला नेमकं काय दिसतं? मतांसाठी जात, धर्म, प्रदेश आणि महापुरुषांना वेठीस धरण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात रूढ झाला आहे. विचारांच्या, तत्वज्ञानाच्या नव्या संहिता निर्माण होत आहेत. सत्य आणि सौंदर्याची नवी लिपी लिहिली जात आहे. आमच्यात एकमेकांविषयी द्वेष भिणत चालला आहे. द्वेषापोटी आम्ही एकमेकांवर गोळ्या झाडल्या. नेत्यांना, विचारवंताना ठार केलं. हिंदू, मुस्लिम, शीख वगैरे तिरस्काराचे शब्द झाले आहेत. प्रादेशिक स्तरावर ब्राह्मण, मराठा, दलित, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी अशा परस्परविरोधी लढाया सुरू झाल्या आहेत.

म्हणजे एकीकडे भौतिक समृद्धीच्या महाकाय इमारती रचल्या जात असतानाच आमच्या आत्मीय संबंधाच्या विटा मात्र आम्ही विस्कटून टाकत आहोत. आज आपल्या समाज जीवनाची प्रत्येक क्षेत्रे दुर्दैवाने बाधीत झाली आहेत. निर्भयपणे, तटस्थपणे आपल्याला 'लिहिता' येत नाही. 'सत्य' बोलता येत नाही. स्वातंत्र्याचा संकोच करणारा हा काळ आहे. पण त्याविषयी 'उच्चार' करण्याचे धैर्यही गोठून गेले आहे.

टागोर, टिळक, गांधी, नेहरू, आंबेडकर (इ.) ही आपल्या संस्कृतीतील देदीप्यमान 'पानं' आहेत. सर्वार्थानं पराभूत करणाऱ्या काळात या महामानवांनी इंग्रजी सत्तेच्या बेमुर्वतपणाला प्रत्युत्तर दिले आणि स्वातंत्र्याची गुढी उभारली. याच महापुरुषांची आता झालेली 'जातनिहाय' विभागणी अस्वस्थ करणारी आणि आपल्यातील भेद स्पष्ट करणारी आहे. आपला देश पुष्कळच संपन्न वगैरे असला तरी तो अजूनही 'परिपूर्ण' नाही. गाव, खेड्याचे वर्तमान अत्यंत बकाल झाले आहे. शाळा, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यासारख्या किमान सुविधाही अजून आपण निर्माण करू शकलेलो नाहीत. गोरगरिबांना, श्रमिकांना पोटभर अन्न देऊ शकलेलो नाहीत. आदिवासींचे कुपोषण थांबू शकलेलो नाहीत. सध्याचा काळ तर अनेक अरिष्ठांचा भयावह काळ आहे. या काळाने आपल्याला सर्वार्थाने 'क्षुद्र' ठरवले आहे.

भ्रष्ट राजकारण आणि भ्रष्ट नोकरशाही या दोन गोष्टींना सामाजिक मान्यता मिळत असेल तर ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. शिवाय सर्वसमावेशक व विधायक दृष्टी असलेल्या नेत्यांचा अभाव ही आपली मोठी समस्या आहे. अशा नेत्यांना जाब विचारण्याची क्षमता नागरिक म्हणून आपण गमावून बसणे हेही धोकादायक आहे. कधीकाळी चळवळींचा, कार्यकर्त्यांचा नैतिक धाक असायचा. आता तोही दिसत नाही. कारण 'सामाजिक बांधिलकी' म्हणून काम करण्याची वृत्तीच संपुष्टात आली आहे. असे का झाले? याचे कोणतेच तार्किक उत्तर आपल्याला देता येत नाही.

भय, असुरक्षितता, हिंसा, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार या गोष्टी जर आपल्या 'समाजरचने'तून वजा होत नसतील तर मग नव्या समाजाची पुनर्रचना करायची तरी कशी? नवी मूल्य रुजवायची कशी? 'धर्मनिरपेक्ष समतावादी लोकशाही' हे बोलायला छान वाटतं; पण आम्हाला अजूनही 'जुने' त्यागता आलेले नाही.

अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण ही घटना अत्यंत आनंददायी असली तरी हा 'आनंदोत्सव' साजरा करताना या वास्तवाची जाणीवही ठेवायला हवी. किमान पुढच्या वर्षभरात तरी काही बदल घडोत अशी अपेक्षा बाळगून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जयहिंद. जय भारत.

(लेखक नांदेडच्या स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT