अगदी सुरवातीला मार्च महिन्यात जेव्हा जनता कर्फ्यू लावण्यात आला, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले होते. टीव्हीवर पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना त्यांनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. अर्थात कोरोना महामारीची ती सुरवात होती. या भाषणादरम्यान मोदी यांनी देशातील एका मुलीने काढलेले चित्र सर्वांना दाखवले. त्यात ‘कोरोना’ या शब्दाचा अर्थ त्या मुलीने ‘कोई रोडपर ना निकले’ असा दाखवून को, रो आणि ना या शब्दांना मोठे केले होते. त्यानंतर कोरोनासुराचा विध्वंस वाढत गेला आणि आज साधारण दोन - सव्वादोन महिन्यांपासून सर्वजण घरात आहेत. नाही म्हणायला, परिस्थितीत काहीशी सुधारणा झालेली आहे. देशभरातून आपले गाव, कुटुंब सोडून पोटापाण्यासाठी दूरवर गेलेले कामगार आता घरी परतले आहेत. पाठीवर बिऱ्हाड घेऊन बायकापोरांसह पायी पायीच निघालेल्या या मजुरांचे खूप हाल झाले.
अगदी हजार-बाराशे मैलांचा पल्ला पायी पायी कापून घरी जाण्याची जिद्द त्यांनी मनात बाळगली होती. अनेकांनी तर हे ‘घर चलो’ मिशन पूर्णही केले. दरम्यान, औरंगाबादजवळ रेल्वे रुळांवरून चालत जाणाऱ्या कामगारांचा अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अनेकांना कायमचेच जग सोडावे लागले. पण या प्रसंगानंतर मात्र कामगारांच्या स्थलांतराचा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर आला. केंद्र, राज्य पातळीवरून लगबगीने पावले उचलून फटाफट निर्णय झाले. रेल्वे, बसच्या माध्यमातून कामगारांना ट्रॅव्हल पास मिळत गेले आणि परिस्थितीही बदलत गेली. परदेशांमध्ये शिक्षण, नोकरीनिमित्त अडकलेले युवक, विद्यार्थ्यांनाही मायदेशी आणण्याचे आव्हान होते. आता हे विद्यार्थीर्ही ‘मॉम-डॅड’च्या जवळ आहेत. या दोन महिन्यांच्या काळात बरेच काही तहसनहस झाले हे मात्र खरे. तर ‘कोई रोडपर ना निकले’ हे चित्र आज आठवण्याला कारणही असेच एक दुसरे चित्र ठरले. व्हॉट्सअॅपवरून आलेले हे चित्र परिणामकारक आणि मर्मभेदी होते. त्याचा आशय असा की, गेल्या दोन महिन्यांत कोणीही रस्त्यावर आलेले नाही हे खरे; पण वास्तवात बरेच जण ‘रस्त्यावर’ आले आहेत. मुंबई-पुण्यासारखेच औरंगाबाद शहरही ‘रेड झोन’मध्ये आहे. त्यामुळे फक्त किराणा सामान, मेडिकल सुरू आहेत.
बाकी सगळे बंद. दोन सव्वादोन महिने एखाद्याचा व्यवसाय, धंदा बंद... घराचे, दुकानाचे भाडे, रोजचा कुटुंबाचा खर्च, कमाई तर कवडीची नाही, मात्र खर्चाचा आलेख चढताच. कसे व्हायचे? आता तर लॉकडाउन ५.० घोषित झाले. मोठमोठ्या उद्योग-व्यवसायांप्रमाणेच रस्त्यावर आला तो हातावर पोट असणारा व्यावसायिक. दिवसभर शहरात फिरून काहीबाही विकणारे फेरीवाले, रस्त्यावरील एखाद्या चौकात हातगाडीवर पसारा मांडून विकणारे हॉकर्स, दररोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंची विक्री, तीही एखाद्या छोट्याशा दुकानातून करणारे होतकरू तरुण, चहा टपरीवाले, टेस्टी वडापाव खाऊ घालणारा भैया, भेळ-पाणीपुरीवाले असे अनेक ‘वाले’ आपल्या व्यवहाराचा दररोजचा भाग झालेले असतात. सध्या मात्र त्यांना कोणीच ‘वाली’ राहिलेला नाही. पुढील काळात परिस्थिती कशी कशी साथ देते, यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. पिग्मी एजंटला दररोज थोडे थोडे पैसे देऊन जी काही शिल्लक होती, तीही आता राहिली असेल याची शाश्वती नाही. छोट्या-मोठ्या बिशांचे हप्ते बोकांडी येऊन बसले आहेत. करावे तर काय करावे, हा मोठा सवाल आहे. पण दोस्तांनो, संकटांशिवाय जीवनात मज्जा नाही. मनातून अजिबात खचायचे नाही. कुठल्याही परिस्थितीला धाडसाने सामोरे जाण्याची हिंमत आपण याआधीही अनेकदा दाखवली आहे. अनंत समस्यांशी दोन हात करूनच आपण इथवर आलो आहोत. त्यामुळे डरने का नहीं... आयुष्यात अनेक संकटे येतात आणि जातात. त्यातून बाहेर पडण्याचे बळही आपसूकच अंगी येत असते. मनात फक्त विश्वास हवा.
खौफ नहीं हमें तुफानोंका,
हौसले बुलंद रखते है
करेंगे मुकाबला डटकर
दिलमें ये जोश रखते है...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.