aricle.jpg
aricle.jpg 
Blog | ब्लॉग

#MokleVha : ज्याचं त्याला अन्‌ गाढव ओझ्याला 

रेश्‍मा दास

"अरे काय रे हे? गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाहतेय या दोन्ही कुंड्यांतील रोपट्यांना. खतपाणी घालतेय. मुळांजवळची माती उकरून भुसभुशीत करतेय. इतके जपतेय तरीही पाने तेवढीच. ना नवी पालवी फुटतेय ना ते सुकून जाताहेत.'' मी गॅलरीतून पेपर वाचत बसलेल्या नवऱ्याशी बोलत होते.
तो म्हणाला, "थांब जरा आठ-दहा दिवस. एकदा का पाऊस सुरू झाला, की फुटेल त्याला नवी पालवी.'' 

मीही आशा ठेवून आठ-दहा दिवस पाऊस येण्याची वाट पाहत थांबले. पाऊस आला... बरसला... साऱ्या सृष्टीला लोभस वाटणारा पाऊस मनसोक्त बरसला. आठवडाभरातच या रोपट्यांना सुंदर, नाजूक लुसलुशीत पालवी फुटली आणि त्या पालवीतून गोंडस कळ्या डोकावू लागल्या. माझी आजी म्हणायची "ज्याचं त्याला अन्‌ गाढव ओझ्याला...' खरेच असे असते? समाजात असंख्य नाती असतात. रक्ताची, मानलेली, जुळलेली, मिळालेली... कोणी जपतो, कोणी नाही. शेवटी नात्यांची व्याख्याच विचित्र. "ना' आवडणारं ना पडणारं "ते.' काहीही असो, मला रुचले रोपट्याचे पावसाशी जुळलेले ओलाव्याचे नाते... पालवी आणि कळ्या त्यांच्यातील दुवा बनल्या. बाबा जाऊन दोन महिने उलटून गेले होते. त्या कुंड्यांतील रोपट्यांप्रमाणेच सुप्तावस्था माझीही गेल्या दोन महिन्यांत झाली होती. बाहेर पाऊसधारा बरसत होत्या. पालवाने तग धरला होता. कळ्या पावसात भिजत पाकळ्यांवरून गुपचूप निथळत होत्या. 

अचानक बेल वाजली. पोस्टमन पत्र घेऊन आला होता, हो पत्रच!! 
आशय असा होता, 
ना उरतं ना सरतं 
असं काही 
ना असतं तरी दिसतं 
असं काही 
ते असणं तरी नसणं 
असं काही 
अमाप तरी सीमित 
असं काही 
ना पूर्ण ना अपूर्ण 
असं काही 
डोळे पूस आधी. तुला काय वाटलं पावसासोबत रडणारी तू मला दिसणार नाही? हो, थोरली ना तू घरामध्ये. सामंजस्य ओतप्रोत भरलेलं आहे. बाबा गेल्याचं कळलं तेव्हा मी कॅनडाला होते. 
तू धीट आहेस. तुझ्या बाबांसारखी खूप संयमी आहेस. आपलं दुःख मनात ठेवून दुसऱ्याचेच डोळे पुसण्याची कला अवगत आहे तुला. सगळे सगळे गुण बाबांचे अचूक उचललेस. पण एक सांगू...मनातच रडतेस, नकळत डोळे पुसतेस. कधी स्वयंपाक करताना गॅससमोरील भिंतीशी कित्येक गोष्टी बोलली असशील. ती भिंतही तुझ्या अबोल बोलक्‍या भावनांना ऐकून पाझरली असेल. 
डबे पुसताना, घासताना "आंदण' बाबांकडून मिळालेलं स्त्रीधन, सासर-माहेरचं धन म्हणून मायेचा हात फिरवताना भरून आलेले डोळे सर्वांच्या नकळत पुसलेही असतील. 
तुला आवडतात ना झाडं जपायला, वाढवायला. त्या रोपट्यांना भरगच्च आठवणी सांगताना ती शेवटी तुझ्यासारखीच निथळली असतील पानापानांतून... 
तुझ्या हाताच्या सुग्रास जेवणाची बाबांना भारीच आवड. त्या चिंच-गुळाच्या आमटीला झणझणीत ठसका लागला असेल... 
तुझ्या एकटेपणात सख्खी भावंडं, नवरा, मुलं, मैत्रिणी सगळेच साथ देऊन तो दूर करण्याचा प्रयत्न करताहेत. पण, तरीही या पत्रातून तुझ्यातील मी, दुःख तर कमी करू शकत नाही. पण, त्याची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करतेय. पुन्हा नव्यानं उभी राहा. भक्कम - तू जशी आहेस तशीच आम्हाला पुन्हा हवी आहेस. 

...पत्र वाचतावाचता डोळ्यांतून असंख्य धारा वाहून गेल्या. जुने ऋणानुबंध जपणारी माझी जिवलग मैत्रीण माझ्याशी पत्रातून बोलत होती. शब्दांची मोहिनी घालणारी शब्दमैत्रीण सांत्वनाचे तुषार बरसवून गेली. आतापर्यंत मनात साठलेलं नकळत हलके करून गेली. त्या रोपट्यांना कशा पाऊसधारा टवटवी देऊन गेल्या तसे मैत्रिणीचे हे पत्र शब्द बसवून पुन्हा नवे जगणे सांगून गेले. आजीच्या ओळी पुन्हा आठवल्या "ज्याचं त्याला अन्‌ गाढव ओझ्याला.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT