Blog | ब्लॉग

जगण्यातील दिवाळी!

हर्षल राजेशिर्के, सातारा

दीपावली या शब्दातच जणू चैतन्याचा वास आहे. ‘दीपज्योती नमोस्तुते’ हा संस्कार असलेले आपण दिव्याची महती जाणतो. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ अर्थातच मातीच्या पणत्यांमध्ये तेवणाऱ्या ज्योतींची घरीदारी, अंगणामध्ये केलेली आरास आणि हो मनामनांमध्येही उजळलेला सकारात्मकतेचा प्रकाश. दिवाळी खरोखरच उत्साह, प्रसन्नतेची आभ लेऊन येते, नक्षत्रांचा साज लेऊन येते. मनाचं अवकाश उजळून टाकणाऱ्या दिवाळीचं प्रयोजनही आपल्या पूर्वजांनी मोठ्या अभ्यासूपणे केलेले आढळते. समाजाचे मानसशास्त्र ओळखून मोठ्या दूरदृष्टीने योजलेले हे सणवार आनंदाने जगण्याची कला शिकवतात, एकात्मता जपतात. दिवाळी हा तर प्रकाशाचा सण, दिव्यांचे तेजोमयी अस्तित्वच माणसाच्या मनामध्ये आशेचा प्रकाशकिरण तेवत ठेवते.

कृषीच्या जीवनशैलीशी निगडित असणारे आपले सणवार, आपल्या परंपरा यावर आजही बाजारपेठेची गणितं ठरतात. ऋतुचक्रातील बदलही मनावर आरोग्यदायी परिणाम घडवतात. हिवाळ्याची चाहूल लागलेली असते, शेतांमध्ये पिकांची मळणी होऊन शेतकरी राजा थोडा सुखावलेला असतो. धन-धान्याची रास म्हणजे समृद्धीचं प्रतीक, लक्ष्मीचं आगमन. मग उत्सव हवाच आणि कृतज्ञताही हवी, नात्यांची जपणूकही हवी. आरोग्य, विज्ञान, मनोरचना यांचा मेळ घालून समाजमनाला एकत्र गुंफणारा हा सण.

आता दिवाळी जवळ आली, की चाळीस ते पन्नास आणि बुजुर्ग वयोगटांमध्ये लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणींची हटकून चर्चा होते. नव्या कपड्यांची नवलाई आणि दिवाळी फराळाची अपूर्वाई वाटणारे ते दिवस होते. फटाके, रांगोळ्या, किल्ला आणि आकाशकंदील बनवणे, उटणे, साबण, तेलाचा सुगंध आणि फराळाचा सुवास यामध्ये न्हाऊन निघालेले दीपावलीचे दिवस सात्त्विक समाधानाचा प्रकाश मनात रेंगाळत ठेवायचे. आता सण साजरा होत नाही तर त्याचं सेलिब्रेशन होतं. गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये घडून आलेल्या बदलाचा वेग स्वीकारणं आणि परंपरांचा मेळ घालणं यामध्ये ‘काय हरवले, काय गवसले’ हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो.

दिवाळीला नवीन कपडे, मोजकेच मिळणारे तरीही चार दिवस पुरणारे फटाके, चिवडा, लाडू, चकली, करंजीचा गोड-तिखटपणा, ओवाळणीदाखल मिळणारी भेटवस्तू अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा अप्रूप होतं, आनंदासोबत संयमाची शिकवणी होती. सुखाची चव घेण्याचा संस्कार होता. मनातलं मांगल्य जपून तिमिराच्या असूरांचे निर्दालन करण्यासाठी चांगली वर्तणूक, सौजन्य, समाधान, श्रद्धा, माणुसकी या मूल्यांसोबतच चराचराशी असलेलं नातं वृद्धिंगत व्हावे ही शिकवण देण्यासाठी सगळेच सण अनेक कथांशी जोडलेले आढळतात. सर्व स्तरांतील मनाला समजेल, उमजेल, पटेल असा प्रतिकात्मक सगुण विचार आणि आणि त्यातून समाजरचनेचा बंध टिकवण्यासाठीचे ते नियमन होतं, त्यामुळेच संत साहित्यामध्ये सुद्धा दिवाळीचे उल्लेख आवर्जून आढळतात. अंधार दूर करणारी इवलीशी दिवळी, शुभ चिन्हांची रंगावली, दरवाजाबाहेर किल्ला बांधून चांगल्या विचारांचे संरक्षण, स्वराज्याची ठेव अशा अनेक प्रतीकांमधून दिवाळी या सणाचे महत्त्व संत साहित्यामधे प्रतिबिंबीत झालेले आढळते. 
संत ज्ञानेश्वर म्हणतात ,
मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेक दीप उजळी
ते योगिया पाहे दिवाळी
निरंतर...
सर्व दुःखाला कारणीभूत असणाऱ्या अविवेकाची काजळी दूर करून तेवत राहणारा विवेकाचा नंदादीप निश्‍चितच शाश्वत प्रकाश देईल.
साधू संत येती घरा
तोची दिवाळी दसरा
तिथीप्रमाणे वर्षातून पाच दिवस येणारी दिवाळी आनंद देणारी आहेच, मात्र तुकाराम महाराज म्हणतात, की ज्या दिवशी साधू संत आपल्या घरी येतील, ती तिथी कोणतीही असली तरी सद्विचारांची संगत हिच आयुष्यात प्रकाश देणारी खरी दिवाळी आहे.

आता बदलत्या जीवनशैलीसोबत बदललेले सणांचं स्वरूप याकडे आपणही सकारात्मकतेने पाहायला शिकूया. शेवटी सणांचं प्रयोजन काय तर ‘सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी’ या तुकारामांच्या अभंगाप्रमाणे अंतरंगामध्ये तेजाचा दीप उजळला, की अपार सुखाचं निधान गवसते. शेवटी मन:शांती महत्त्वाची, मनाच्या आरोग्यावरच तर शरीराचे स्वास्थ्य आणि एकूणच समाजाचं स्वास्थ्य टिकून राहते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सणाच्या निमित्ताने मिळालेले चार दिवस कोणी कसलाही आटापिटा न करता शांततेत घालवेल तर कोणी मोजकेच दोन पदार्थ घरी करेल तर कोण शब्दांच्या दीपासमवेत साहित्य शारदेची पूजा करेल, तर कोणी पहाटे भावगीताच्या आनंदात न्हाऊन निघेल. मन:चक्षू प्रकाशमान होणं हीच तर जगण्यातील दिवाळी आहे.

तेजाकडे नेणारा हा सण स्वतःसोबतच इतरजनांच्या आयुष्यामध्येही उमेदीची, आशेची पणती तेवत ठेवेल अशा कल्याणदायी शुभेच्छांसह नवविचारांची दिवाळी आपण साजरी करूया. सीमेवर प्राण पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांची, शांतता सुव्यवस्था जपणाऱ्या पोलिसांची, वंचितांच्या आयुष्यात दीप उजळवणाऱ्या अज्ञात हातांची, प्रकाशवाट दाखवणाऱ्या धुरीणांची विचारज्योत आपण मनामध्ये जपूया.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT