सत्यजित तांबे, आमदार
सत्यजित तांबे, आमदार sakal
Blog | ब्लॉग

Drug free Maharashtra : एक भरारी... ‘अमलीपदार्थ मुक्त महाराष्ट्र’च्या दिशेने!

सकाळ वृत्तसेवा

सत्यजित तांबे, आमदार

संगमनेरला आमच्या घराजवळ होणाऱ्या नवरात्रोत्सवातली ही घटना! इथे दांडियाचं आयोजन केलं होतं. एका रात्री एक तरुण तिथे आला. तो धिंगाणा घालायला सुरुवात केली. कारण त्याने अमली पदार्थाची गोळी घेतली होती. आपण काय करत आहोत, याचे भानही त्याला नव्हते. नशेत त्याने त्याच्या आईवडिलांनाही मारहाण केली. दुसऱ्या दिवशी त्याचे आईवडील माझ्याकडे आले. घडल्या प्रकाराने त्यांना ओशाळं व्हायला झालं होतं. ते म्हणाले, ‘आमचा मुलगा आता गेल्यातच जमा आहे. पण अमली पदार्थाच्या विळख्यात इतर मुलांचं वाटोळे होऊ नये, यासाठी काहीतरी करा.’

अशीच आणखी एक घटना. एका तरुण मुलाचा अचानक मृत्यू झाला. रीतसर पंचनामा झाला आणि पोलिसांनी पंचनाम्यात मृत्यूचं कारण ‘हृदयविकाराचा झटका’ असं दिलं. दुसऱ्या दिवशी त्याचेही पालक माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘आम्हाला पंचनाम्यातलं मृत्यूचं कारण बदलून हवं आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही, तर ड्रग्जच्या अतिसेवनाने झाला आहे, असा उल्लेख हवा. साधारण पंचनाम्यातील मृत्यूचं कारण बदलण्यामागे कर्ज किंवा विम्यातील फायदा किंवा इतर गोष्टींमधील फायदा असं असतं.

त्यामुळे मी त्यांना विचारलं की, विम्यासाठी वगैरे त्यांना हा बदल करून हवा आहे का? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून मी हादरलो. ते म्हणाले, ‘त्याच्या मृत्यूची नोंद ड्रग्जमुळे अशी झाली, तर निदान त्यामुळे तरी यंत्रणेला जाग येईल आणि हे विष समाजात भिनू नये, यासाठी उपाययोजना होईल.’ या दोन्ही घटनांनंतर माझे डोळे खाड्कन उघडले. ड्रग्जचा विळखा किती भयानक असतो, याची दाहकता जाणवली. पण आज राज्यात आणि देशातच नाही, तर जगभरात देशभरात या व्यवसायाची पाळंमुळं अगदी खोलवर गेली आहेत.

धोक्याची जाणीव

गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्र पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई करत तब्बल ९५० कोटींपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्याचबरोबर राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उघडलेले ‘एमडी’ड्रग बनवण्याच्या कारखान्यांवर छापे टाकत कारवाई केली गेली. आता हे कारखाने जमीनदोस्त होतील.

वास्तविक याबद्दल महाराष्ट्र पोलीस आणि गृह मंत्रालय यांचं अभिनंदन करायला हवं. पण त्याचवेळी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अमली पदार्थांचा अंमल एवढा खोलवर पोहोचला असून, ती बाब धोक्याची घंटा वाजवणारी आहे. अर्थात हे एका दिवसात झालेलं नाही. यासाठी अनेक वर्षांपासून या प्रकारांकडे व्यवस्थेकडून झालेलं दुर्लक्ष कारणीभूत आहे.

अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला पकडणाऱ्या हाय-प्रोफाईल अधिकाऱ्यांकडून गोरगरिबांपर्यंत पोहोचणाऱ्या ड्रग्जकडे कसं दुर्लक्ष झालं, हा संशोधनाचा विषय आहे. की फक्त हाय-प्रोफाईल लोकांना अटक करून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची आणि सामान्यांच्या मुलांभोवती पडणाऱ्या ड्रग्जच्या विळख्याकडे दुर्लक्ष करायचे,

असा काही प्रकार आहे का, असा संशय माझ्यासारख्या व्यक्तीला येतो. गेल्याच आठवड्यात नाशिक, अहमदनगर, पुणे येथे सापडलेल्या ड्रग्जच्या साठ्याच्या प्रकरणात ललित पाटील याला अटक झाली. त्याच्या चौकशीतून आता अनेक बाबी पुढे येत आहेत. मला इथे या सगळ्या प्रकरणात कोणाचे लागेबांधे आहेत, याची चर्चा करायची नाही. ते काम पोलीस यंत्रणा करेलच. पण या धोक्याची जाणीव आपल्याला व्हायला हवी.

एकत्र येण्याची गरज

महाराष्ट्र सरकारने आता ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ड्रग्जच्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्याशिवाय पोलीसही आता शाळा-कॉलेजांबाहेर भरारी पथकं नेमत आहेत.

या उपाययोजनांबद्दल सरकारचं अभिनंदन! याबाबतची मागणी करणारं पत्र राज्याच्या पोलिस महासंचालकांना पाठवून माझा खारीचा वाटा उचलला. पण तेवढ्यावर थांबून चालणार नाही. अमली पदार्थांविरोधातली ही लढाई लढण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच एकत्र यावं लागणार आहे.

महाराष्ट्रात डॉ. अनिल अवचट आणि डॉ. सुनंदा अवचट यांनी पुण्यात मुक्तांगण व्यसमुक्ती केंद्र सुरू केले आहे. त्याशिवाय डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग हेदेखील व्यसनमुक्तीच्या लढ्यात सक्रीय आहेत. आज डॉ. मुक्ता पुणतांबेकर मुक्तांगण संस्थेची धुरा वाहत आहेत. त्या आजही या क्षेत्रात कार्यरत आहेतच.

या कार्यात आधीपासून कार्यरत असलेल्या अशा लोकांना बरोबर घेऊन शाळा-कॉलेजांनी कार्यक्रम आखले पाहिजेत. त्याशिवाय आपल्याकडे असलेल्या रोटरी, लायन्स, अशा क्लबनी पुढाकार घेऊन ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’साठी उपक्रम राबवणं किंवा जनजागृतीचे कार्यक्रम आखणं गरजेचं आहे. त्यापुढे जाऊन मॉरल पोलिसिंगही महत्त्वाचं आहे.

‘मॉरल पोलिसिंग‘

आम्ही आता राज्यभरात जयहिंद लोकचळवळ संघटनेतर्फे ड्रग्जचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पथनाट्यं, व्याख्यानं किंवा व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या डॉक्टरांकडून माहितीसत्र आयोजित करणार आहोत.

हे असे कार्यक्रम आणखी होण्याची गरज आहे. राज्य सरकारला सहकार्य करणं, ही जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्याशिवाय आपल्या पाल्याच्या जडणघडणीत पालकांनीही थोडं जास्त लक्ष देण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

या सगळ्या लढ्यात आपल्या पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. शाळा-कॉलेज परिसराच्या आसपास असलेल्या पान-तंबाखू-सिगारेट यांच्या टपऱ्यांवर पोलिसांना आणि आपल्यासारख्या सजग नागरिकांना करडी नजर ठेवावी लागेल. म्हणजे इथेही मॉरल पोलिसिंगची आवश्यकता आहेच.

महाराष्ट्र कायमच अनेक सुधारणांमध्ये अग्रेसर राहिला आहे. आपल्या राज्याने संपूर्ण देशाला सामाजिक सुधारणांचा वारसा दिला. शिक्षणापासून उद्योगापर्यंत आणि कलेपासून क्रीडा क्षेत्रापर्यंत महाराष्ट्राने नेहमीच देशाचं नेतृत्व केलं आहे. आता या ड्रगविरोधी लढ्यातही आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन देशासमोरच नाही, तर संपूर्ण जगासमोर एक उदाहरण समोर ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हे महत्त्वाचं पाऊल आत्ताच उचललं नाही, तर देशाची एक पिढी अमली पदार्थाच्या च्या खाईत गेल्याशिवाय राहणार नाही.

बरं झालं ललित पाटील प्रकरण बाहेर आलं! या निमित्ताने राज्यात अमली पदार्थाची पाळंमुळं किती खोलवर पसरली आहेत, हे समोर आलं. आज राज्यातच नाही, तर देशासह परदेशांतही अमली पदार्थांनी थैमान घातलंय. अमली पदार्थाचा विळखा तोडण्यासाठी आता राज्य सरकारने ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा’ची (अमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र) हाक दिली आहे. पण केवळ सरकारने कारवाई करून महाराष्ट्र ‘ड्रग फ्री’ होणार नाही. त्यासाठी लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा ठरेल.

सत्यजित तांबे, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT