Mask of restraint, social distance with anxiety ... 
Blog | ब्लॉग

संयमाचा मास्क, चिंतेशी सोशल डिस्टन्सिंग...

- रामचंद्र कुलकर्णी, नाशिक

बिरबलानं एकदा बादशहाला त्याच्या राज्यात डोळसांपेक्षा आंधळ्यांची संख्या जास्त असल्याचं दाखवून दिलं होत. लॉकडाउनच्या या काळात मला त्याची आठवण झाली. निमित्तं तसं साधं घरगुतीच होतं. घरातलं फर्निचर स्वच्छतेचं काम मी माझ्याकडं स्वेच्छेनं घेतलंय. शिवाय ते इमानेइतबारे करतोय. जवळपास रोज! एकदा असाच आरसा पुसत होतो फडक्‍यानं. गुणगुणतही होतो. काही माझं लक्ष सहजच आरशातल्या माझ्याकडं गेलं... अनं फडकं थांबलं क्षणभर. महाकवी गालिबचा एक शेर आठवला. 

गालिब जिंदगीभर यही यही भूल करते रहे। 
धूल चेहरेपर जमी थी... आईना साफ करते रहे। 

आता त्या आरशापुढं आलो की नजर आपोआप खाली झुकते माझी. आरसा साफ होतो पण चेहरा मात्र तसाच राहतो! मात्र आपल्या चेहऱ्यावर धूळ आहे, हे तरी दिसत असल्याचं समाधान या लॉकडाउनमध्ये मिळतंय मला. केवढा हा सत्संग! या काळातल्या माझ्या मन:स्वास्थ्याचंही काहीसं असंच आहे. एकदा शांतपणानं मी लॉकडाउनची वस्तुस्थिती नीट समजावून घेतली.. अन्‌ ती स्वीकारली. वस्तुस्थितीचा हा स्वीकार किंवा अस्वीकार महत्त्वाचा आहे. हे संकट जागतिक आहे, ते तेवढंच वैयक्तिक आहे... हे नाकारण्यात कोणताही शहाणपणा नाही, हे आधी मान्य केलं. त्याचा मुकाबला आपल्यालाच करायचा आहे, हेही स्वत:ला सांगितलं. बजावून. लढायचं आहे पण ते शहाणपणानं. नुसता अविर्भाव, आक्रमकता उपयोगाची नाही, हे जाणलं. कारण वस्तुस्थिती नाकारून काय मिळणार होतं? आता पुढचं नियोजन केलं. रणनीती म्हणतात, तशी. लढायचं आहे तर त्या अदृश्‍य शत्रूला समजावून घेतलं. त्याचा हल्ला शरीरावर तसा मनावरसुद्धा होईल, हे जाणलं. शरीरावरील उपचारासाठी किमान यंत्रणा तरी दिसतेय.. पण मनासाठी? 

मन:स्वास्थ्य नावाचा पदार्थ आता टिकवून ठेवला पाहिजे, हे कळलं मग दोन भागात विभागल्या गोष्टी. मनाला आनंद, उत्साह, उभारी, सकारात्मकता देणाऱ्या गोष्टी आणि त्याच मनाला दु:खी, अस्वस्थ, भयभीत करणाऱ्या नकारात्मक गोष्टी दोन्ही असतातच स्वभावात प्रत्येकाच्या. पण प्रशासनाचा अनुभव असल्यानं हे निरीक्षण करणं जमलं बऱ्यापैकी मला. सगळ्यात मोठं म्हणजे आपल्याला घरी राहायला मिळतंय, बायको/मुलींना कधी नव्हे तो वेळ देता येतोय, याचा फार आनंद झाला मला. न मागता किती सुट्या मिळाल्या! हा आनंद आम्ही अगदी छोट्या छोट्या गमतीतून घेतोय. स्वत:ची कामं स्वत: करून घरकामात लुडबूड, साफसूफ, हलके-फुलके टीव्हीवरचे शोज, शब्दकोडं, थोडं वाचन/लेखन, जुने अल्बम (गेले ते दिन गेले .. इ.इ.) थोडा प्राणायाम, बागकाम, एक-दोनदा घरीच केलेली कटिंग, नातेवाईक/मित्रांशी फोनवरून बातचीत, थोडा वॉक, जुनी/नवी गाणी जमेल तशी ठोकून देणे, विसरलेली.. ही यादी मोठ्ठी आहे. रोज बदलते थोडी. मुली रोज नवीन रेसिपी शिकून खिलवताहेत.. हंसी मजाक करतात. वाद नाहीत असं नाही.. पण ते आताच हवेत का? मधे झुंबा डान्ससुद्धा करून पाहिला. मला जमला नाही.. पण मजा आली. तर ही.. हिरवी यादी.. ग्रीन कार्ड! 


लॉकडाउनमध्ये नकारात्मकता टाळायचा प्रयत्न करतो मी, पण दरवेळी जमेलच असं नाही. वेळ असल्यानं जुन्या आठवणी, असं केलं असतं तर? नामक पिशाच्च, कोरोनाची नाही म्हटलं तरी वाटणारी भीती.. हेही आहे सोबत! याच काळात माझ्या सासूबाईचं निधन झालं. दु:ख मोठं की वेळ मोठी.. ते कळेना. महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहायच्या प्रयत्नातून (अट्टहासातून?) नकळत येणारी निराशा, चिडचिड, जीवन व्यवहार ठप्प झाल्याने पुढची अनिश्‍चितता, तुंबलेली कामं, वाढलेले केस, सुटलेलं पोट ही यादीसुद्धा छोटी नाही. रेड कार्ड! सतत सावध राहण्याचा कंटाळा येतो कधी कधी. खरं तर ही परीक्षाच आहे आपली. तयारी तर केलीय, पण प्रश्‍नपत्रिका रोज वेगळीच येतेय समोर! चिंतेची जागा कधी भीती घेते. वाढत्या प्रादुर्भावाच्या बातम्या येतात आणि मग वाटू लागते भीती! जीवापेक्षा मोठं काय आहे? 
पण तरीही आपण स्थिर असलं पाहिजे. तीच माझी शक्ती आहे. भीतीनं पांगळं केलं तर मग संकट समोर उभं ठाकल्यावरही उठता येणार नाही. म्हणून मग मी पुन्हा माझं ग्रीन कार्ड काढतो. संयमाचा मास्क लावतो... चिंतेशी सोशल डिस्टन्सिंग पाळतो... निश्‍चयाच्या साबणानं वारंवार स्वच्छ करतो मनाला... वीस सेकंदात ! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT