Maya's Lovely Gift To Mahesh In Lockdown.  
Blog | ब्लॉग

शोना... ये ना रे घरी!

संदीप प्रभाकर कुलकर्णी

पाण्याच्या रोजच्या कटकटीला तोही कंटाळला होता आणि त्याची बायकोही. दोन-अडीच वर्षांचा मुलगा, तो आणि ती असे हे त्रिकोणी कुटुंब. टँकरवाल्याने फोनवरूनच वाढलेला भाव सांगितला आणि मनातल्या मनात चार-दोन शिव्या हासडून मन्याने फोन ठेवला. दुपारच्या वेळी त्याच्या सासऱ्याचा फोन आला. प्रगतीला बोलायचे असेल म्हणून तो फोन घेऊन आत गेला तेवढ्यात मामा म्हणाले, ‘‘मी काय म्हणतो जावई... तुमच्याकडं नाही तरी पाण्याची तारांबळ... त्यातच पुन्हा हे कोरोना वाढणार आहे असं म्हणून राह्यले लोकं... तव्हा प्रगती आणि सोहमला द्या की पाठवून इकडं. अव्हं त्यो न्हाईतरी लहानच हाय. आमच्याकडं हिरीला बक्कळ पाणी हाय. मी आन मामीबी शेतातच ऱ्हातोय. तव्हा प्रगतीबी येईल आणि तुमचंबी चार पैसं वाचत्याल...’’ महेशाच्या मनात विचार आला. सासऱ्यानं स्वतःहून विचारलंय. आधीच आपली तारांबळ, त्यात कोरोना. त्यानं ठरवलं. प्रगतीशी बोलून जाण्याचा दिवसही ठरला. सकाळच्या सातच्या गाडीनं जाताना प्रगती मात्र खिडकीतून सारखं ‘नीट जेवत जा... ड्युटीला जात जा...’ असं महेशाला सांगत होती. सोहमही आपल्या बाबाकडं पाहत होता. 
 
असेच काही दिवस गेले. प्रगतीचा फोन येत होता. पुन्हा तिचं आपलं तेच. जेवला का... ड्युटीला गेल्ते का... कोरोनाबद्दल सासऱ्याचं फोरकास्टिंग एवढं कसं भारी, असा विचार महेशाच्या मनात तेव्हा आला जेव्हा मोदीसाहेबांनी कोरोनामुळं लॉकडाउन जाहीर केला. बाकी लोकं मस्त घरी आराम करतात, आपली कंपनी मात्र मेडिकलची. त्यामुळं जाणं भागच आहे... काय कोण जाणे पण महेशाला सुटी भलती आवडायची. 

रविवारची सुटी संपली होती. सोमवार उजाडला. दुपारच्या शिफ्टला जाण्यासाठी महेश तयारी करू लागला. सुनसान रस्त्यानं जात असताना महेशाची नजर समोरच्या पोपटी रंगावर पडली. गळ्यात पर्स, पायात टपोऱ्या टाचेची सँडल आणि कानात हेडफोन लावून एक छानशी सुडौल आकृती भरउन्हात पायी पायी चालली होती. महेशानं गाडी स्लो केली पण थांबवली नाही. थोडं दूर गेल्यावर पुन्हा एकदा मागे वळून पाहत तो भरधाव निघाला. मनातले विचार काही त्याला शांत बसू देत नव्हते. 
 
नंतरचा मंगळवार, बुधवार, गुरुवार... गेले. महेशाच्या साधारण जायच्या वेळेला ही सुडौल आकृती समोर असायची. पोपटी रंग कधी चॉकलेटी व्हायचा तर कधी पिंक. कधी पांढरा. कधी कधी तर खालचा वर आणि वरचा खाली असा दिसायचा. महेशाचं मागं पाहणं थोडं थोडं कमी होऊन आता तो मिररच्या काचेतून रंग न्याहाळत असे. भरउन्हात मागे-पुढे, वर-खाली सरकणारे हे रंगही महेशाला पाहत होते. रस्त्यावर कुठलीही वाहनं नसल्यामुळे महेशाची गाडीही रंगांच्या लक्षात राहू लागली. महेशानं डंपरवर दोन डोळ्यांची आर्ची रेडियमवाल्याकडून काढून घेतली होती. महेशाकडं नजर जाओ की न जाओ, मागच्या माणसाला ही आर्ची दिसायचीच. तशी ही आर्ची रंगांनाही दिसत होती. 
 
आज महेशाचा सुटीचा दिवस. सकाळपासूनच गडी आनंदी होता. घरीच चार-दोन भाज्या एकत्र करून त्यानं चिरून काढल्या. कुकरमध्ये टाकली खिचडी आन तो बाहेर येऊन बसला. प्रगतीचा फोन सकाळीच येऊन गेला होता. आज काय सुटी असल्यामुळं इकडंतिकडं भटकत बसू नका, उगाच पोलिस पकडतील, असा सुका दम तिनं महेशाला फोनवरच दिला होता. लॉकडाउन असल्यानं कुठं जायचा आणि कुणी यायचा काही प्रश्‍नच नव्हता. पण प्रगतीला सांगणार कोण? व्हॉट्सअपवर मित्रांनी टाकलेली चित्रं आणि चलचित्रं पाहत महेशा अधूनमधून कुकरकडं चक्कर मारीत होता. अशातच दररोज रस्त्यावर दिसणाऱ्या पोपटी, चॉकलेटी पिंक रंगांच्या त्या आकृतीचा विचारही त्याच्या मनात आला. आज तर ड्युटीला जायचे नाही... हेही महेशाला कुकर उतरवीत असताना ध्यानात आलं. पुन्हा त्याच्या आतला महेशा म्हणाला... काय रे त्या रंगांचं काय? त्यांना काय माहीत तुझी सुटी? तसा बाहेरचा महेशा पुन्हा खुलला. भराभर खिचडी खाऊन चकाचक दाढी करून महेशा पुन्हा रस्त्यावर. गळ्यात अडकवली बॅग... गाडीला मारली किक आणि भुर्र... 
 
रस्त्याच्या त्या वळणावर किंवा थोडं अलीकडंच हे रंग आज बदलले होते. खालचा व्हाईट झाला होता आणि वर होता चेरी रेड. महेशानं मनात ठरवलं, आज थोडं थांबू आणि विचारू तरी... असं मनाशी बोलत असतानाच मिररमधून चोरून रंग न्याहाळणंही सुरू होतं. त्या रंगांतून एक नाजूकसा हात वर आलेला त्यानं पाहिला. गाडी स्लो केली. तो नाजूक हात ‘थांबा’ असं म्हणत होता. महेशा थांबला. ‘‘सर, मला पुढच्या चौकात सोडता का...’’ रंग गोड आवाजात बोलू लागले होते. महेशानं चेहऱ्यावर कुठलेही भाव न येऊ देता रंगांना गाडीवर बसवलं. महेशानं गाडीची स्पीड तीस-चाळीसच्या पुढं जाऊ दिली नाही. थोडं अंतर गेल्यावर ‘‘सर, थांबा ना... मला इथंच उतरायचंय’’ असा आवाज आला आणि गाडी थांबली. 
 
आज सुटी असूनही आपला गडी भलीमोठी चक्कर मारून आला. करता काय, रंगांची जादूच तशी असती भो... दुसऱ्या दिवशी ड्युटीवर निघताना मात्र महेशाच्या मनात वेगवेगळ्या कल्पना अक्षरशः नाचत होत्या. घरून थोडे पुढे जाऊन तो रस्त्याला लागला. आजही रंग बदलले होते. रंगांच्या जवळ जाऊन महेशा थांबला. डोळ्यांच्या कोनातून अलगद बाहेर आलेलं बारीकसं हास्य महेशानं टिपलं. आन्‌ भुर्र... महेशा हुशार गडी होता. त्यानं नाजूकसा हात पाहत असतानाच त्यावर दिलच्या आकारातला टॅटू पाहिला होता. ‘एम’ अक्षराला कलाकारानं फारच सुरेख कोरलं होतं. त्यातच नाजूक हातावरच्या त्या ‘एम’ला धरून महेशानं विचारलं, ‘‘मॅडम, तुम्ही कुठं जॉब करता का...’’ रंगांचा हळुवार आवाज ‘‘हो, मी हॉस्पिटलला आहे...’’ 
‘‘मॅडम, नाव काय तुमचं?’’ महेशा म्हणाला. ‘‘नाही, नाही. आधी तुम्ही सांगा...’’ अशा प्रश्‍नोत्तरांत नावांची देवाणघेवाणही झाली आणि फोन नंबरांचीही. या रंगीत आणि छानशा आकृतीचं नाव होतं माया. 
 
नवीन नंबरवर काहीतरी टाकावं म्हणून महेशानं हाय टाकलं. त्याला रिप्लाय केव्हा येतो, या विचारात त्याचे दोन-तीन तास गेले... पण नंतर मात्र ‘हाय’ला उत्तर म्हणून एक सुंदरसा सुविचारही आला आणि गुलाबाची दोन फुलंही. आपला गडी खूश. असेच काही दिवस गेले. व्हॉटसॲपच्या मेसेजची गर्दीही खूप झाली. ड्युटीला जाताना महेशा वेगळ्याच खुशीत असायचा. दिवसभरही जाता - येता मोबाईलवर काही ‘टुंग’ वाजलं की गडी हरखून पाहायचा. एकदा रात्री मित्रांनी पाठविलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून थकलेल्या महेशानं पलंगावर अंग टाकलं. रात्रीचा दीड वाजला असेल. मोबाईलवर टुंग आवाज आला. मायाचा मेसेज... ‘‘काय करताय...’’ महेशानं लगेच टाईप करून टाकलं... ‘‘झोपलोय...’’ 
‘‘एवढ्या लवकर झोपता की काय तुम्ही...’’ माया. अशा बऱ्याच गप्पा झाल्या. अशा रोजच्याच गप्पांमध्ये काही दिवसांनंतर ‘आम्ही-तुम्ही’चे अरे-तुरे झाले. मायानं मात्र महेशाचं नावच बदलून टाकलं होतं. ती त्याला ‘शोना’ म्हणायची. यालाही तिचं ‘शोना’ ऐकल्यावर मनातून अलगद मोरपीस फिरल्यासारखं वाटायचं. या पंधरा-वीस दिवसांच्या काळात महेशा जाम खूश होता. मायाचं आणि त्याचं चांगलं जमतंय असा विचार त्याच्या मनात यायचा. सोबतच इतरही अनेक विचारांसह मनमें लड्डू फुटत होते. असाच त्याचा दिवस कसातरी संपायचा. दरम्यान, महेशाच्या गाडीवरून जाताना सुरवातीच्या काळात जाणून-बुजून ठेवण्यात आलेलं अंतरही हळूहळू कमी कमी होत गेलं. सोशल डिस्टन्सिंगचा सगळीकडे गाजावाजा सुरू असताना गाडीवरचं यांचं डिस्टन्सिंग मात्र महेशाला गोंधळात टाकून गेलं. 
 
नुसतं गाडीवर जाताना आणि फोनवर फारसं काही बोलता येत नाही, हा मुद्दा एव्हाना दोघांच्याही लक्षात आला होता. त्यामुळं घरी निवांत भेटण्याचा योग कधी जुळून येतो, असा विचार महेशाच्या मनात घोळत होता. असाच एकदा घरी असताना मोबाईल पाहता पाहता मायानं टाकलेला मेसेज त्यानं पाहिला. ‘‘उद्या मी सुटी घेतली आहे... शोना... ये ना घरी...’’ महेशाच्या सुटीच्या दिवशीच तिनंही सुटी घेण्याचं कारण महेशाला काही कळालं नाही. पुन्हा एकदा मनमें लड्डू. त्या दिवशी त्याची ती रात्र तळमळ आणि विचारांचं ओझं घेऊन केव्हा संपली हे त्याचं त्यालाच समजलं नाही. सारखं लक्ष जायचं ते मेसेजकडं --- ‘‘शोना... ये ना रे घरी...’’ दुसऱ्या दिवशी घरीच पोहेबिहे खाऊन महेशा डिओबिओ लावून तिच्याकडं निघाला. सकाळी तिनंही एक-दोनदा फोनवरून केव्हा येशील, हे शोनाला विचारलं होतं. त्यामुळं महेशा खूश होता. रोजच्या त्या रोडवरून जाताना महेशाचा आजचा जोश तुफान होता. मायाचं घर समोर दिसलं. ती दारातच उभी होती. पिंक कलरच्या टॉपवर ती आज आणखीच खुलून दिसत होती. थोडंबहुत बोलणं झालं. ‘‘मी आत्ता आले हं...’’ असं म्हणून माया नजरेआड गेली. इकडे महेशाच्या मनातले विचार एकमेकांशी कुस्ती खेळत होते. दहा-पंधरा मिनिटांनी माया आली. येताना तिनं एक रजिस्टर, दोन-तीन रंगीबेरंगी ब्रोशर्स आणि डाव्या हातात काही पाँपलेट्स आणले होते. ‘‘शोना... मला किनई तुला काही दाखवायचंय...’’ माया. समोरचं एकंदरीत दृश्‍य पाहून मनातल्या विचारांनीही त्यांची कुस्ती थांबवली होती. ‘‘काय गं... कशाचे हे पेपर... काय आणलंस तू...’’ महेशा. माया सांगू लागली. मी फावल्या वेळेत ‘एमएलएम’चंही काम करते. एमएलएम म्हणजे मल्टिलेव्हल मार्केटिंग. महेशाच्या हातात ब्रोशर देऊन माया पुढं म्हणाली. पॉवरबँक, टॅबची चित्रं पाहून महेशा गोंधळला. ‘‘बघ या टॅबची किंमत आहे ७९९९. आणि पॉवरबँक येते दीड हजारात. पण हीच कॉम्बो ऑफर आणखी तिघांना देऊन तू विकशील तर हा टॅब तुला फक्त आणि फक्त २९९९ ला पडेल... काय, आहे की नाही गंमत...’’ मायाचं मार्केटिंगचं अगाध ज्ञान आणि तिचा तो एमएलएमचा पसारा पाहून महेशाच्या मनातले विचार नुसते एकमेकांसमोर स्तब्ध बसले होते. कशीबशी दीड हजाराची पॉवरबँक घेऊन महेशानं घरखर्चाला ठेवलेले दीड हजार मायाला ट्रान्सफर केले आणि तो तिला निरोपाच्या ‘सेशन’मध्ये घेऊन येण्याची पुरेपूर तयारी करू लागला. चहाबिहा घेतल्यानंतर महेशा ‘‘चल येऊ का मी आता...’’ असं म्हणून गाडीकडे निघू लागला. महेशाच्या मनातले लड्डू आणि लड्डू बनविणारेही दूर पळून गेले होते. इकडे माया मात्र एमएलएम, टॅबमध्येच अडकून पडली होती. आता महेशासोबत डाव्या हातात फारशी काही गरजेची नसलेली पॉवरबँकही होतीच! लॉकडाउन आन् कोरोनानं दिलेलं हे गिफ्टच!!! 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT