Vishal Kadam Dialogue writer Devmanus marathi Serial esakal
Blog | ब्लॉग

Devmanus Marathi Serial : 'देवमाणसा'ला संवादातून जिवंत केलेल्या सातारच्या लेखक माणसाची गोष्ट

आजवरच्या मालिकांच्या इतिहासातली सर्वांत प्रसिद्ध मालिका म्हणून झीची ‘देवमाणूस’ (Devmanus Serial) ही मालिका ओळखली जाते.

नीलेश महिगावकर nileshbhosale511@gmail.com

मालिका विश्वातलं दमदार आणि लय भारी नाव म्हणजे विशाल कदम. देवमाणसाला संवादातून जिवंत केलेल्या लेखक माणसाची गोष्ट आजच्या भागात.

आजवरच्या मालिकांच्या इतिहासातली सर्वांत प्रसिद्ध मालिका म्हणून झीची ‘देवमाणूस’ (Devmanus Serial) ही मालिका ओळखली जाते. सत्य घटनेवर आधारित असलेली ही मालिका झी टीव्हीवरून प्रसारित झाली आणि तिने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्डस्‌ मोडले. ज्या मालिकेतल्या इरसाल आंधळ्या सरूआज्जी नावाच्या अस्सल सातारी शिव्या फेमस झाल्या, ज्याच्यावर झीने छोटेखानी पुस्तक काढले, ज्या मालिकेच्या संवादांची डूडल झाली आणि चक्क तिचा दुसरा भाग काढावा लागला, त्या सुप्रसिद्ध मालिकेचा संवाद लेखक आपल्या साताऱ्याचा आहे.

मालिका विश्वातलं दमदार आणि लय भारी नाव म्हणजे विशाल कदम. देवमाणसाला संवादातून जिवंत केलेल्या लेखक माणसाची गोष्ट आजच्या भागात. साताऱ्याला लेखकांची प्रदीर्घ परंपरा आहे. प्रताप गंगावणे, सचिन मोटे, नितीन दीक्षित या परंपरेतलं, या पिढीतलं दमदार तरीही आजवर अपरिचित असलेलं नाव म्हणजे विशाल कदम (Vishal Kadam). लेखक हा खरे तर पडद्यामागे राहून कलाकृती उभ्या करतो मांडवात लेकीच लग्न लागताना दूरवर अक्षता घेऊन उभे राहणाऱ्या बापासारखा. कधी कधी हीच उपेक्षा घेऊन त्याला आजन्म पडद्यामागे राहावं लागतं.

ज्याच्या लेखणीतून हे प्रतिविश्व उभं राहतं तोच दुर्लक्षित असतो. आजवर पन्नासहून अधिक एकांकिका, तितकेच पुरस्कार, अनेक व्यावसायिक नाटकं, झीची ‘देवमाणूस’ झी युवाची ‘लव लग्न लोच्या’ ही मालिका ‘जाडूबाई जोरात’ ‘हम तो तेरे आशिक है’ ‘साता जन्माच्या गाठी’ ‘शेतकरीच नवरा हवा’ ‘कारभारी लय भारी’ ‘मन झालं बाजींद’ अशा एकाहून एक सरस मालिका देणारा हा लेखक चक्क साताऱ्याचा आहे, हे अनेकांना माहीत नाही.

लौकिक अर्थाने कुठल्याही लेखकाची जशी सुरुवात व्हावी, तशीच सुरुवात विशाल यांची झाली. गावात जीव अडकलेल्या या पोराला पहिली ते सातवी मुंबईला काळाचौकीला शिकावं लागलं. विशाल जिथे राहायचा त्या बिल्डिंगखाली एकांकिका स्पर्धा व्हायच्या. चित्रपट क्षेत्रातील आजच्या घडीचे दिग्गज तेथे अभिनय करून गेले. त्याचा प्रचंड प्रभाव या लहानग्या विशालवर पडला. एकदा एकांकिका सुरू असताना एका आदिवासी पात्रानं बेअरिंग घेत लहानग्या विशालकडे बोट दाखवून ‘तूच त्याला मारलंस’ असं म्हणून संवाद फेक केली. ते संवाद इतके जिवंत होते की विशाल घाबरून घरी गेले. नंतर वडिलांनी हा ‘अभिनय’ आहे. हे ‘नाटक’ आहे, हे असंच करावं लागतं, अशी समजूत काढली. नाटकाचं पहिले इम्प्रेशन आणि रचना लेखकाच्या अशी गमतीदारपणे मनात रुजली.

विशालचं गाव पुसेसावळी. मात्र, आठवी ते दहावीचे शिक्षण औंधशेजारच्या वरूड या मावशीच्या गावात झालं. तिथले गावाकडची भटकंती, रानोमाळ फिरणं, टायर फिरवणं, मधाची पोळी काढणे, एवढंच नाही, तर शिळ्या बातम्या नावाची पूर्वीची धमाल आणि चक्क कीर्तनं हरिपाठ करणं, या सगळ्यातून खोलवर आत गाव आणि तिथली माणसं भिनली जी पुढं बजाबापू, नाम्या, सरूआज्जी, टोण्या या पात्रांच्या रूपाने लेखणीतून जगापुढं आली.

शहरात माघारी गेल्यानंतर मुंबईच्या गजबजाटात जीव रमेनासा झाला. किरकोळ देहयष्टी, भाषा, रंगरूप, उच्चार या गोष्टींनी कॉम्प्लेक्स दिला. या न्यूनगंडातून बाहेर पडण्यासाठी प्रचंड वाचन केलं. लहानपणी चंपक चांदोबा अमृत वाचलं होतं. पुढे दलित साहित्य वाचलं. संत साहित्य, तुकाराम, कबीर, महावीर, आंबेडकर असं चौफेर आणि अफाट वाचन झाले. भोवतालच्या पसाऱ्यात आपलं स्थान काय, याचा आत्मशोध सुरू झाला आणि त्या आत्मशोधातून एका खोलीतला वेडा, ओनामा, माणूस अशा एकांकिकेचं लेखन झालं.

विशालला लेखक म्हणून ओळख मिळवून दिली ती ‘टिक टिक’ या एकांकिकेने. कासव आणि सशाच्या रूपातून लिहिलेली ही गोष्ट आयुष्यातल्या अनावश्यक वेगावर आणि आयुष्याचा आनंद घेत होणाऱ्या सावकाश आणि ठाम प्रवासावर ही एकांकिका लिहिली गेली. अनेक स्पर्धांमधून तिला बेस्ट रायटरचे पुरस्कार मिळाले. पुढे खेळ मांडियेलासारखी एकांकिका ज्यात ओंकार भोजनेसारख्या दिग्गजानेही काम केले. पुढे त्या एकांकिकाला अनेक पुरस्कार मिळाले आणि मग हा प्रवास थांबलाच नाही. सेकंड हॅण्ड, लव फोरेवर, आर यू ब्लाइंड, हाऊस गूल, लेखकाचा कुत्रा, अशा एका मागून एक एकांकिकेचा धडाका लागला.

‘ह्यांचं करायचं काय’ या समीर चौगुले, पॅडी, विशाखा सुभेदार या दिग्गजांनी काम केलेल्या नाटकांना व्यावसायिक नाट्य लेखक म्हणून ओळख मिळवून दिली. हे सगळं करत असताना अर्धा जीव स्टेजवर आणि अर्धा जीव उपजीविकेसाठी लिहिल्या गेलेल्या टीव्ही मालिकांमध्ये अडकला होता. पुरुषोत्तम बेर्डे यांची ‘ग साजणी’ ही मालिका पहिली मालिका. मात्र ‘लव लग्न लोच्या’ या झी युवावरील मालिकेच्या संवादांनी विशालला छोट्या पडद्यावरचा दमदार लेखक म्हणून ओळख मिळवून दिली आणि मग हा ग्राफ उंचावतच गेला.

दरम्यान, साताऱ्याच्या निर्मात्या श्‍वेता शिंदे आणि संजय खंबे यांनी देव माणूसचा प्रस्ताव विशाल यांच्यासमोर ठेवला. देव माणूस मालिकेची पार्श्वभूमी पाहता सुरुवातीला नकार दिल्यानंतर विशाल यांनी संवादाचे आव्हान स्वीकारले आणि बाकी सर्व इतिहास आहे. ‘जाडूबाई जोरात, हम तो तेरे आशिक है, तसेच साता जन्माच्या गाठी, शेतकरीच नवरा हवा, कारभारी लय भारी, मन झालं बाजींद’ या सातारी मालिकांचे संवाद विशालने लिहिले.

इतक्या मालिका लिहूनही या माणसाचा जीव आजही रंगमंचात अडकला आहे. गावच्या मातीत गुंतला आहे. विशाल हा व्यावसायिक लेखक नाहीच मुळी. याच्या रक्तात गाव भिनला आहे. याच्या लेखनात एक सणसणीत सामाजिक जाणीव आहे. भवतालाचे समग्र भान आहे. ते तितक्याच ताकदीने अभिव्यक्त करण्याची हातोटी आणि समकाळातली गुंतागुंत उलगडण्याची आणि त्यावर भाष्य करण्याची स्वतंत्र क्षमता आहे. हा दिग्गज लेखक आजवर अपरिचित कसा? हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र, विशाल केवळ मोठा आवाका असलेला लेखक नाही, तर तो मनानंही तितकाच विशाल आहे. आजही तो सातारशी नाळ जोडून आहे.

या सगळ्या प्रवासात त्याला लिहिते ठेवण्याचे श्रेय तो आशिष पाथरे या दिग्गज आणि तितक्याच प्रतिभावान लेखकास देतो. मुंबईच्या प्राथमिक शाळेत लेखनाची प्रेरणा देणाऱ्या विचारे मॅडम यांविषयी त्याला ममत्व आहे. मला जमिनीवर ठेवण्याचे महत्त्वाचे काम अभिनेते विजय निकम यांनी केल्याचे विशाल नमूद करतो. त्यांचा विशालवर प्रभाव आहे. या सर्व लेखनासाठी मोकळीक आणि भक्कम आधार देणारी ‘विषयच भारी’ची टीम यांच्याविषयी तो कृतज्ञता व्यक्त करतो.

कधीकाळी पहाटे चार वाजता तीन तास प्रवास करून रात्री दोन वाजता माघारी येऊन झोप लागते न लागते तोच दुसऱ्या दिवसाच्या लढाईसाठी सज्ज होणारा हा कष्टाळू लेखक एक रुपयाही न घेता काम करत होता. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. माणसं उगाच मोठी होत नसतात आणि विशाल हा कुणी साधासुधा माणूस नव्हेच! चक्क देवमाणसाला ज्यानं लेखणीतून जिवंत केलं तो हा सातारचा ‘लेखक माणूस’ आहे आणि सातारकर म्हणून याचा सार्थ अभिमानही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पतीच्या हत्येप्रकरणी न्याय मिळत नसल्याने पत्नीची टोकाची कृती; बीडमध्ये खळबळ

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT