Story about Backbenchers In School by Sandeep Prabhakar Kulkarni 
Blog | ब्लॉग

थ्री डी बॅकबेंचर्स

संदीप प्रभाकर कुलकर्णी

सूनबाई आणि नातीसाठी काकू बांगड्या आणि कानातले घेत होत्या. तिथेच कुठेतरी आपल्या मोठ्या पर्समधली छोटी पैशांची पर्स हरवली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सर पुढे चालत होते. ‘अगं चल भरभर’ असं ते अधूनमधून म्हणत. काकूही लगबगीनं सरांच्या मागून येत होत्या. आता या तीर्थक्षेत्राहून त्यांना रत्नागिरी आणि पुढे पुणे व औरंगाबादला जायचं होतं. तीन-चार दिवस कोकणातल्या विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन वयाच्या साठाव्या दशकापर्यंत पोहचलेलं हे जोडपं जोडीनं प्रवास करीत होतं. रत्नागिरीपर्यंत सोडणाऱ्या बसमध्ये बसण्यापूर्वी नाश्‍ता करून घ्यावा, या विचारानं दोघेही हॉटेलात गेले. चहा-नाश्‍ता झाला. ७८ रुपयांचं बिल देत असताना सरांनी वेटरला आणखी एक पाणी बॉटल आणायचं सांगून शंभरची नोट वेटरच्या हातावर ठेवली. दरम्यान, काकूंची अस्वस्थता पाहून सरांनी शेवटी विचारलं, ‘‘काय गं काय झालं...’’ काकू भीत भीतच सरांना म्हणाल्या, ‘‘अहो, ती पैशांची छोटी पर्स होती ना...’’ ‘‘हो... तर मग... तिचं काय...’’ सर. ‘‘अहो, ती रस्त्यात कुठेतरी पडली वाटतं...’’ हातातल्या बॅगा एसटीत वरच्या कप्प्यात ठेवत असताना सरांना काकूंचा खूप राग आला होता. पण ते शांत होते. ‘‘आता कसं व्हायचं गं...’’ असं म्हणून सर शांतपणे बसच्या खिडकीतून बाहेर पाहत होते. 
 
आता मात्र सरांसमोर खूप मोठा प्रश्‍न उभा राहिला होता. ‘दोन फुल रत्नागिरी...’ असं म्हणून जवळची पाचशेची नोट सरांनी कंडक्टरला दिली. पैशांची विभागणी झालेली असावी म्हणून आपल्याकडील सगळ्या मोठ्या नोटा सरांनी काकूंकडे आधीच देऊन ठेवल्या होत्या. प्रत्येक प्रवासापूर्वी एक-एक नोट या हिशेबानं ते काकूंकडून पैसे घेत. थोड्या वेळानं ‘‘काका... रत्नागिरी...’ असा कंडक्टरचा आवाज ऐकून ते उतरले. रत्नागिरीच्या बसस्‍टँडमध्ये पोहचल्यावर आता काय करावं, हे सरांना सुचत नव्हतं. मुलाला फोन करावा तर तो पैसे अकाउंटला ट्रान्सफर करेलही... पण आपल्याकडे एटीएम कुठाय... ‘जुनं ते सोनं’ हा सरांचा विचार इथं सरांना धोका देऊन गेला होता. उगाच कटकट कशाला, या विचारानं त्यांनी बॅंकेला एटीएमबाबत नकार कळवला होता. मुलाचा फोन येऊनही त्यांनी याविषयी त्याला कुठलीही कल्पना दिली नाही. दुसरं म्हणजे, रत्नागिरीसारख्या कोकणातील भागात कुणी ओळखीचंही नव्हतं. नातेसंबंधही कुठपर्यंत तर बीड, लातूर, गेवराई, जालना, उस्मानाबाद... फार फार तर नगर आणि पुण्यापर्यंत. औरंगाबादला जाईपर्यंत पैशांची सोय होईल, असा कुठलाच मार्ग सध्या तरी सरांसमोर नव्हता. असं असतानाही शांतपणे ‘‘चल, चहा घेऊन येऊ...’’ असं काकूंना म्हणून सरांनी बॅगा हाती घेतल्या. सोबत रोख पैसे नसल्यानं एसटी बसचा विचार त्यांनी केव्हाच सोडून दिला होता. शेजारील हॉटेलात चहा घेत घेत ते हॉटेलमालकाशी बोलत होते. ‘‘आधी पुण्याला जावा... मग तिथून औरंगाबाद... ’’ असा सल्ला त्यांना मिळाला. माहीत असलेली माहिती सरांनीही चुपचाप स्वीकारली. 
 
रत्नागिरी बसस्टँडच्या बाहेर ट्रॅव्हल्सवाल्यांनी आपापली दुकाने मांडलेली होती. लहान-सहान दुकानवजा आॅफिसात एखादा कुणीतरी कारभार हाकत होता. बाहेर मुंबई, पुणे, चिपळूण, सातारा, कोल्हापूर अशी शहरांची नावं मोठाल्या अक्षरांत लिहिलेली होती. सर तिथून पुढे निघाले. मात्र काही अंतरावर त्यांना ट्रॅव्हल्सचं पण एक मोठं आॅफिस दिसलं. बाहेरून काचा लावलेल्या या आॅफिसात आतही दोन-चार जण कामाला होते. समोर उभारलेल्या मोठ्या शेडमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी बेंचेस टाकलेले होते. गावी जाणारी मंडळी आपापल्या बॅगा पायाशी ठेवून बसच्या प्रतीक्षेत बसली होती. समोर एका चहावाल्यानंही आपला कोपरा धरून ठेवला होता. आॅफिसवर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं... दिलावर टूर्स अँड ट्रॅव्हल्स. समोर उभ्या असणाऱ्या काही बसवरही हेच नाव होतं. सरांनी काकूंना खुणेनं बोलावलं आणि ते दोघेही त्या शेडमध्ये बेंचवर जाऊन बसले. ‘‘आता काय करायचं हो...’’ काकू. ‘‘अगं बस थोडा वेळ. पाहू काय होतंय ते... घटकाभर आराम कर इथं... मी विचारतो कुणाला तरी...’’ सर. या मोठ्या आॅफिसात विचारून तर पाहावं असा विचार सरांच्या मनात घोळत होता. 
 
दिलावर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं मुख्य आॅफिस होतं पुण्यात. मालकीहक्क होते दिलावर सिद्दीकी या माणसाकडं. लहानपणापासून ऐषारामात राहिलेला हा गडी. दिलावर शाळेत फार काही शिकला नाही. अभ्यासातही तो सो सो असायचा. फारसा हुशार नसल्यानं त्याची रवानगी मात्र वर्गात शेवटच्या बेंचवर झालेली होती. उनाड पोरांपैकी त्याच्या सोबतीला होते दिनेश ऊर्फ दिन्या आणि दिलीप. शाळेत असताना समोरच्या लाइनीत बसणारी पोरं हुशार, स्कॉलर असायची. या स्कॉलर विद्यार्थ्यांच्या प्रतिभेनं मागच्या बेंचवर बसणारी विद्यार्थ्यांची ही टीम नेहमीच झाकोळली जाते. या बॅकबेंचर्स मंडळींना शिक्षण व्यवस्थेत खूप काही विशेषणं आहेत. या बॅकबेंचर्सच्या भविष्याचा अंदाज वर्तविणारेही अनेक गुरुजी तुम्ही-आम्ही सर्वांनीच पाहिले आहेत. आपले सरही त्यातलेच. शाळेतल्या या उनाड पोरांना सरांनीच नाव दिलं होतं --- थ्री डी. तसा दिलावर अभ्यासात फारसा हुशार नसला तरी दुनियादारीच्या शाळेत मात्र त्यानं मेरिटपर्यंत मजल मारली होती. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा त्याचा बिझनेस जोरात होता. इतर ठिकाणचं कामकाज कसं चाललंय हे पाहण्यासाठी त्यानं प्रत्येक ब्रँचला सीसीटीव्ही बसविलेले होते. पुण्याच्या आॅफिसात बसून हे सारं काही दिलावर पाहायचा. रत्नागिरीच्या आॅफिसचे फुटेज पाहत असताना त्याची नजर सरांवर पडली. समोरच्या शेडमध्ये बसलेले सर त्रस्त दिसत होते. सरांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून दिलावरनं तातडीनं फोनाफोनी सुरू केली. 
 
‘‘हॅलो प्रशांत... काय करतोयस...’’ असा रत्नागिरीच्या आॅफिसला फोन लावून दिलावरनं प्रशांतला समजावून सांगितलं. ‘‘सरांची भेट घेऊन त्यांची समस्या काय, हे आधी विचार. आणि तुझ्या लेव्हलवर त्यांचा प्रॉब्लेम सोडव... ते आमचे सर आहेत... बादमें इधर कॉल कर...’’ असं म्हणून दिलावरनं फोन ठेवला. शेडमध्ये बसलेल्या सरांना नमस्कार करून प्रशांतनं कुठे जायचे आहे, असे विचारले. सरांनी आपली समस्या प्रशांतला सांगितली. तो सरांना म्हणाला, ‘‘काका, आत या. बसून बोलू आपण.’’ सुरवातीला प्रशांतनं दिलासा दिला. चहापाण्याची व्यवस्था केली. काकांनी स्वतःवर ओढवलेला प्रसंग प्रशांतला सांगितला. त्यानं थोडे आढेवेढे घेण्याचे नाटक केले; पण नंतर तो सरांना म्हणाला ‘‘सर, पाहतो काही जमतं का ते माझ्या लेव्हलवर...’’ काही वेळाने प्रशांत वरच्या फ्लोअरवर गेला. तिथून त्यानं आपल्या मालकाला फोन लावून सारं काही सांगितलं. खाली आल्यानंतर प्रवासाच्या या तिकिटाचे पैसे औरंगाबादला गेल्यानंतर प्रशांतच्या अकाउंटवर पाठवायचे असं ठरलं. प्रशांत सरांना म्हणाला, ‘‘काका, पुण्यालाही आमचं आॅफिस आहे. तिथल्या माणसाशी मी बोलतो. त्याला फक्त मी शिक्का मारून दिलेलं हे कार्ड दाखवा...’’ सरांनी प्रशांतच्या बँकेच्या खात्याचा तपशील एका कोऱ्या कागदावर लिहून घेतला. आणि प्रशांतचे आभार व्यक्त केले. 
 
प्रशांतशी बोलून सर ज्या बेंचवर काकू बसल्या होत्या तिथे गेले. झालेला सगळा प्रकार त्यांनी काकूंना सांगितला. काकूंनाही बरं वाटलं. ‘‘अहो, मी किती वेळापासून नामस्मरण करीत होते. पाहा बरं देवानं आपल्याला संकटात टाकलं का...’’ काकू म्हणाल्या. दोघेही खूश होते. आता दिलावर ट्रॅव्हल्सच्या पुण्याच्या दिशेनं निघणाऱ्या बसची प्रतीक्षा होती. प्रशांतही आपल्या पुढच्या कामाला लागला. पुण्याहून दिलावरचे फोन सुरू होते. ‘‘देखो प्रशांत... रास्ते में कोई भी तकलीफ नही होनी चाहिये... और एक बात, मेरे नाम का जिकर भी उनके सामने मत करना. अरे बाबा, शाळेत असताना सरांनी आम्हाला खूप काही शिकवलंय. त्यांचे संस्कार आजही आम्ही विसरलेलो नाहीत...’’ वगैरे... वगैरे... 
 
पुढे रत्नागिरी ते पुणे आणि तिथून औरंगाबाद हा सरांचा प्रवास सुखरूपपणे पार पडला. रस्त्यात कुठलीही अडचण येण्याचा काही प्रश्‍नच नव्हता. घरी आल्यानंतर सुनेने स्वागत केले. मुलानेही प्रवासाविषयी विचारपूस केली. रात्री थोडेसे खाऊन अंथरुणावर जात असताना साधारण दहा-साडेदहाला सरांचा फोन वाजला. चष्म्यातून बारीक डोळे करून पाहिलं तर नुसता नंबर दिसत होता. एवढ्या रात्री कुणाचा फोन असेल, या विचारात सरांनी फोन उचलला. तिकडून आवाज आला... ‘‘सर नमस्कार, ओळखलंत का मला...’’ सरही चक्रावून गेले. ‘‘अहो सर, मी दिलावर सिद्दीकी बोलतोय... तुमच्या वर्गातला थ्री डी...’’ एवढ्या मोठ्या कालखंडानंतर आपल्या विद्यार्थ्याला आठवताना सरांनाही भूतकाळात जावं लागलं. ‘‘अरे बोल दिलावर... तू तो बॅकबेंचर ना... काय रे कसा आहेस... माझी आठवण कशी झाली रे तुला...’’ सर. नंतर फोनवर खूप गप्पा झाल्या. दिलावरने सरांना रत्नागिरी ते पुणे आणि पुढे औरंगाबादच्या प्रवासाबद्दल सांगितलं. प्रशांतला सगळं काही सांगणारा मीच होतो, असेही तो सरांना म्हणाला. ‘‘केवळ सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे हे सगळं शक्य झालं सर... आणि हो, प्रशांत बोलला तसं पैसे वगैरे पाठवायची काही गरज नाही बरं का सर... तुमच्या आशीर्वादानं खूप काही मिळालंय...’’ असं म्हणून त्यानं पुण्याला आल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेतो, असं सरांना सांगितलं. दिलावरशी बोलत असताना सरांना भरभरून आलं होतं. आणि इकडे पुण्यात दिलावरच्या डोळ्यांतही एक वेगळा आनंद चमकत होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT