प्रत्यक्षं हि अल्पम् अनल्पम् अप्रत्यक्षम्। म्हणजे जे इंद्रियांनी ज्ञात करून घेता येतं ते अल्प असतं, पण जे अप्रत्यक्ष असतं ते प्रचंड असतं. आयुर्वेदातील या सूत्राचा श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे अनेकदा संदर्भ घेत. भौतिक शरीराच्या तसेच दृश्य सृष्टीपलीकडे असणाऱ्या अज्ञात शक्तीचा, सूक्ष्म तरंगांचा आपल्यावर परिणाम होत असतो. आरोग्यसंरक्षणासाठी, आत्मोन्नतीसाठी यांचा उपयोग व्हावा या दृष्टीने श्रीगुरुजींनी १९७१-७२च्या सुमाराला ‘कॉसमॉलॉजी’ची सुरुवात केली.
साधारण एक तासाच्या या सेशनमध्ये ज्योतिष, हस्तसामुद्रिक, व्यवहार, चेहरा, नाडी वगैरे सर्व बाजूंनी श्रीगुरुजी मार्गदर्शन करत. ब्लू-डायमंड या पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये श्रीगुरुजी ‘कॉसमॉलॉजी कन्सल्टंट’ म्हणून जात, जर्मनीतही कॉसमॉलॉजीचे सेशन्स घेत. व्यक्तीनुसार कोणते मंत्र-स्तोत्र म्हणावे, योग्य स्पंदने मिळावीत, सकारात्मकता वाढावी यासाठी काय उपासना करावी, कर्मशुद्धीसाठी कोणते अनुशासन अंगी बाणवावे याप्रमाणे ‘वैयक्तिक’ मार्गदर्शन ते करत.
श्रीगुरुजी सांगत, ‘सूर्याकडून ऊर्जा मिळतेच, परंतु इतर ग्रहनक्षत्रांकडून, खरं तर विश्र्वातील प्रत्येक गोष्टीतून आपल्यापर्यंत शक्तिप्रवाह पोचत असतात. भौतिक देहाव्यतिरिक्त मनोमय, तेजोमय व कारण असे वेगवेगळे देहप्रकार असतात. शक्तिप्रवाहाचा परिणाम या सूक्ष्म देहांवर होत असतो. भारतीय शास्त्रांनी हे जाणून या शक्तीप्रवाहांचा उपयोग होण्यासाठी वेगवेगळे मार्ग सुचवले.’ कॉसमॉलॉजी-सेशनमध्ये श्रीगुरुजी उपाय सुचवत, त्यात कधी कधी ‘लाइट अँड साउंड थेरपी’चाही समावेश असे. यात रंगीत काचेच्या हंड्यांमधून निघणाऱ्या रंगीत प्रकाशाच्या आणि संगीताच्या माध्यमातून उपचार केले जात. याचेही उत्तम परिणाम मिळत.
शक्तीचे आकर्षण होण्यासाठी विशिष्ट आकाराची योजना करण्याची पद्धत सर्व संस्कृतींमध्ये असते. पिरॅमिड हा असाच एक आकार. पिरॅमिडच्या आत बसून ध्यान करता यावे व विशेष शक्तितरंगांचा अनुभव घेता यावा यासाठी श्रीगुरुजींनी पिरॅमिड बनवले. मौनात राहून पूर्ण वेळ उपासना करण्यासाठी आत्मसंतुलनमध्ये ‘मीराकुटी’ उभारली. त्याकाळी कॉसमॉलॉजी सेशन घेतलेल्या बऱ्याच व्यक्ती आज संतुलन परिवाराच्या अविभाज्य घटक आहेत, यावरून याच्या प्रभावाची, उपयुक्ततेची साक्ष पटते.
कॉसमॉलॉजीची वाढती मागणी, परंतु प्रत्येकाला तास-दीड तास देण्याची मर्यादा लक्षात आली तेव्हा श्रीगुरुजींनी एकाच वेळी अनेकांना लाभ होऊ शकेल अशा योजना आखल्या. उदा. १२ राशींचे १२ धूप बनवले. सर्व चक्रांच्या, त्या त्या देवतेला अर्पण करायच्या हवनद्रव्यांपासून वेगवेगळ्या उदबत्त्या बनवल्या. आजचा दिवस, नक्षत्र काय आहे, आपल्यासाठी अनुकूल आहे की नाही, महत्त्वाच्या कामाची सुरुवात करावी की नाही, अशा मूलभूत गोष्टी प्रत्येकाला समजण्यासाठी ‘संतुलन वेद ॲस्ट्रॉलॉजी’ या छोट्या पुस्तिकेची रचना केली. स्वास्थ्यसंगीत, ॐकार उपासना, सोम ध्यान, संतुलन क्रियायोग (SKY) या गोष्टी जगासमोर आणल्या. Chaos to Cosmos असं म्हटलं जातं. जीवन सर्वार्थांनी समृद्ध व्हावं यासाठी श्रीगुरुजींनी केलेलं कार्य सध्याच्या या Chaos मध्ये Cosmos चा अनुभव देण्यास सक्षम आहे.
जनजागृती जलाची
‘जल हेच जीवन’. श्रीगुरुजी म्हणत, ‘पाणी म्हणजे सर्व प्राणिमात्रांसाठी परमेश्र्वराचा ओलावा आहे. प्रेमाचा ओलावा नसला तर जीवन चालणार नाही, तसेच पाणी नसलं तरी जीवन चालणार नाही.’
पाण्याला संपत्ती समजून त्याचे रक्षण करणे आवश्यक आहे. जलसंवर्धनातील दोन अडथळे म्हणजे पाण्याची उधळपट्टी आणि पाण्याचे प्रदूषण. वास्तुशास्त्रात घरातील नळ गळणे, नीट बंद न होणे, भिंतीला ओल असणे निषिद्ध मानलं आहे, यामागे पाणी वाया जाऊ नये हाही उद्देश असतो. श्रीगुरुजी म्हणत, ‘भारतीय संस्कृतीत नदीकडे केवळ पाण्याचा स्रोत म्हणून नाही, तर व्यक्ती किंवा देवता म्हणून पाहिलं जातं. गंगा, नर्मदा, कृष्णा अशी नद्यांची नावे व त्यांच्यावरची स्तुतीपर स्तोत्रे हे त्याचेच द्योतक आहे. नद्यांमध्ये सांडपाणी सोडणे, कारखान्यातील दूषित द्रव्य सोडणे हे थांबायलाच हवं.’
शुद्ध पाणी जीवन देतं, तर अशुद्ध पाणी रोगाचं कारण ठरतं. शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया योजल्या तरी पाण्याची सर्वांत चांगली शुद्धी होते ती अग्निसंस्कारातून. ‘सुवर्णसिद्ध जल’ या संकल्पनेचा श्रीगुरुजींनी खूप प्रसार केला. सुवर्णामध्ये शक्ती आकर्षित करण्याचे, नुसत्या संपर्कामुळे वस्तूची ताकद वाढवण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे पाणी उकळताना शुद्घ सोनं टाकलं तर ते रोग दूर होण्यासाठी, प्रतिकारशक्तीसाठी, बुद्धी-स्मृतीवर्धनासाठी उत्तम असतं.
श्रीगुरुजी सांगत, ‘पाण्याला समज असते. पाण्यावर विचारांचे, स्पर्शाचे, वातावरणाचे संस्कार होतात. पाणी मंदिरात ठेवलं तर ‘तीर्थ’, मक्केत असले तर ‘झमझम’, चर्चमध्ये ‘होली वॉटर’ म्हणवले जाते, कारण तेथील प्रार्थनेचा, वातावरणाचा त्या पाण्यावर परिणाम झालेला असतो. त्यामुळे आपणही पाणी पिण्यापूर्वी त्यावर मनातील चांगल्या विचारांचा संस्कार करावा. ’
देव-दानवांनी समुद्रमंथन केलं व त्यातून १४ रत्ने निघाली. श्रीगुरुजी म्हणत, ‘समुद्र संपत्तीचं, ज्ञानाचं आगार आहे. सर्व ज्ञान, सर्व माहिती पाण्यात दडलेली आहे.’ नदीत, समुद्रात पाय बुडवून येतो असं कोणी म्हटलेलं त्यांना चालत नसे. ते म्हणत, ‘ज्या पाण्याचे दर्शन घ्यायचे, त्या पाण्याला पाय कसे लावणार? ’ पाण्यात जाण्यापूर्वी श्रीगुरुजी पाण्याला नेहमी नमस्कार करत.
श्रीगुरुजी एक आठवण सांगत,‘आत्मसंतुलनमध्ये पाण्यासाठी बोअरिंग करतेवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतला तेव्हा त्यांनी या जागेच्या खाली संपूर्ण स्फटिक आहेत व त्याखाली पाण्याचा मोठा साठा आहे, असं सांगितलं होतं’. त्यानंतर एकदा बोअरिंग करताना खरोखरच स्फटिकाचे तुकडे बाहेर आले होते. कर्मभूमी म्हणून आत्मसंतुलनची जागा निवडताना श्रीगुरुजींना ज्या शक्तीचा प्रत्यय आला त्यामागे हे एक कारण असावे.
श्रीगुरुजी म्हणत, ‘शरीराचीच नाही तर मनाची, आत्म्याचीही तृषा शमविणारे ते जल. परमेश्र्वरी आशीर्वाद, संकल्पना आपल्यापर्यंत आणणारे ते जल, सर्व समृद्धीचे कारक असणारं ते जल. अशा जलाबद्दल प्रत्येक क्षणी जागरूक राहणं, जलदेवतेचा सन्मान राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे’.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.