Gudi Padwa in Abroad
Gudi Padwa in Abroad Sakal
संस्कृती

गुढीपाडवा : धार्मिक, पर्यावरणवादी दृष्टीकोन माहितीये? परदेशात असा साजरा केला जातो दिवस

सकाळ वृत्तसेवा

नव वर्षाभिनंदन ! नव्या वर्षाच्या शुभेच्छा! किंवा happy new year! आणि भरभरून दिलेल्या शुभ संदेशाने आपलं अत्यंत प्रिय माध्यम, म्हणजेच आपला अॅन्ड्रोईड मोबाईल आज ओसंडून वाहत असेल.

- ले. डॉ. नयना कासखेडीकर

नव वर्षाभिनंदन ! नव्या वर्षाच्या शुभेच्छा! किंवा happy new year! आणि भरभरून दिलेल्या शुभ संदेशाने आपलं अत्यंत प्रिय माध्यम, म्हणजेच आपला अॅन्ड्रोईड मोबाईल आज ओसंडून वाहत असेल. फक्त आपल्या देशातीलच नाही तर परदेशातील भारतीय सुद्धा गुढी पाडव्याला या नव वर्ष शुभेच्छा देतात.

तसं पाहिलं तर, नविन वर्ष सुरू होतं तेंव्हा जगभरातच त्या त्या कॅलेंडर नुसार शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. ती सगळीकडेच पुरातन चालत आलेली परंपरा आहे.गेल्या वर्षी जगन्नियंत्याने आपले रक्षण केले त्या बद्दल त्याचे मन:पुर्वक आभार मानणे आणि येणारे वर्ष सर्वांना सुखाचे जावे अशी प्रार्थना करून एकमेकांना तशा शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करणे असा उद्देश असतो. त्याचा काळानुसार दिवस व प्रकार बदलत गेला आहे एव्हढच. जेंव्हा सौरमान आणि चांद्रमाना प्रमाणे काल गणना होत असे तेंव्हा वसंतातला पहिला दिवस हाच नव वर्षाचा पहिला दिवस असे. काही ठिकाणी जानेवारी, फेब्रुवारी त नवीन वर्ष साजरे केले जाते.पण आपण मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदाच वर्षारंभ मानतो.

चैत्र शुद्ध प्रतिपदा! याच दिवशी सृष्टीच्या निर्मात्याने, ब्रम्हदेवाने युगारंभ केला, कृतज्ञता म्हणून ‘गुढी’ अर्थात ‘ब्रम्हध्वज’ पूजन करण्याची पद्धत आहे. हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस सुद्धा. आपल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद।

प्राप्तेऽस्मिन्‌ वत्सरे नित्यं मग्द्ऋहे मंगलं कुरु।।

गुढीपाडवा हा ऋतुंवरून प्रचारात आलेला सण आहे. त्याच बरोबर त्याला धार्मिक अधिष्ठान आहे आणि पर्यावरण संदर्भ सुद्धा आहे. चैत्रापासून पुढील चार महीने सर्व प्राणिमात्रांसाठी जलदान करावे, पाणपोई बांधावी. किंवा रोज एकाच्या घरी माठ भरून पाणी नेऊन द्यावे ई ... इथे धार्मिक दृष्ट्या दान म्हटले असले तरी दान म्हणजे समोरच्याला मदत किंवा त्याची सोय करणे असा आहे. इथे हा पर्यावरण वादी दृष्टीकोण दिसतो. हे चार महीने उन्हाळा असतो. जसे मनुष्य प्राण्याला उन्हाचा त्रास होतो, तसे प्राणी आणि पक्ष्यांना पण होतो. झाडांना पण होतो. एरव्ही सुद्धा आपण आपल्याकडे भर उन्हात कोणी आलं, अगदी पोस्टमन, सिलिंडर घेऊन येणारा, कुरीयर वाला, किंवा कुणीही घरी आल्यानंतर त्याला प्रथम पाणी देण्याची पद्धत आहे. उन्हाळा असेल तर द्यायलाच हवे. हाच धर्म आहे म्हणजे कर्तव्य आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला मत्स्य जयंती आहे असे मानतात म्हणून पाण्याचे महत्व आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही हे सर्वांना माहिती आहेच.म्हणून पाण्याचं महत्व आहे.

पाडवा म्हणजे नव निर्मितीचा आरंभ होण्याचा दिवस असतो. पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरुवात करायची असते. यात अनेक गोष्टी येतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेताची मशागत करून ठेवणे, पाऊस यदा कदाचित कमी झालाच तर त्याची सोय म्हणून विहिरी, पाट, तलाव यांची नीट सोय करून ठेवणे, दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन धान्य, चारा यांची साठवण करून ठेवणे. बी बियाणे आणून ठेवणे अशी कामे पावसाळयापूर्वी उरकून ठेवायची असतात. तर नव्या गोष्टींचा आरंभ या दिवशी करतात.

वसंत ऋतु सर्वश्रेष्ठ ऋतु म्हणजेच ऋतूंचा राजा समजला जातो.जल, वायु, धरती, आकाश आणि अग्नी या पांच तत्वांचं मोहक रूप या काळात अनुभवता येतं. शरदानंतरच्या हेमंत आणि शिशिर ऋतुत लोप पावलेलं निसर्गाचं सौंदर्य, वसंतात पुन्हा प्राप्त होतं. वसंताचे आगमन होणार्‍या काळात शरीराला थंडावा देणार्‍या कडुनिंबाचे महत्व चैत्र प्रतिपदेला असतं. आरोग्यास हितवर्धक, पचन क्रिया सुधारणारा, पित्तनाशक, त्वचा रोग बरा करणारा, शिवाय धान्यातील किडिचा नायनाट करणारा कडूनिंब आयुर्वेद दृष्ट्या महत्वाचा आहे. म्हणून त्या दिवशी कडुनिंबाची पाने खायची प्रथा आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याची ही प्रथा उपयोगीच आहे. वसंताचा उत्सव आशावादाचे प्रतिक आहे.

या दिवसाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तो याच दिवशी. म्हणूनच शालिवाहन शक सुरू झाले आणि हा दिवस विजयोत्सव म्हणून लोक साजरा करू लागले. असाच विजयदिवस लंकाधिपती रावण वधानंतर, प्रभू श्रीराम अयोध्येला चौदा वर्षानी परत आले तो विजय आणि आनंदोत्सव म्हणून घरोघरी ब्रम्ह ध्वज /गुढ्या तोरणे उभी केली. ही गुढी /ब्रह्म ध्वज आनंदोत्सवाची द्योतक आहे. कवी योगेश्वर अभ्यंकर यांचं भावगीत तुम्हाला स्मरत असेल. श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या कशी सजली होती, लोकांना किती आनंद झाला होता याचं हे वर्णन खूप बोलकं आहे.

विजयपताका श्रीरामाची,

झळकते अंबरी,

प्रभू आले मंदिरी .

गुलाल उधळून नगर रंगले,

भक्त गणांचे थवे नाचले,

राम भक्तीचा गंध दरवळे,

गुढ्या तोरणे घरोघरी ...

अशा उत्साहात लोकांनी हा आनंदउत्सव साजरा केला असल्याचा उल्लेख रामायणात आहे.

अशी ही उत्सवी काठी किंवा गुढी यांचे पूजन इतिहासात सांगितले आहे. उत्सवी काठीचा उल्लेख एक प्राचीनतम पुजा म्हणून इतिहासात आढळतो.

आपल्या सारखाच इतर देशात काठीपूजा /ब्रम्ह ध्वजपूजन /गुढी पूजन करण्याची परंपरा होती. दक्षिण आफ्रिकेत दामारा जमाती मध्ये ,सायबेरियातील सामोयीड्स मध्ये, इस्रायल मध्ये, युरोप मध्ये ख्रिश्चन पूर्व काळात मेपॉल काठी उत्सव, पॅसिफिक क्षेत्रात, कुक बेटावर आदिवासींचा काठी पुजा उत्सव, तसंच, युनान, व्हिएतनाम, कोरिया, म्यानमार या ठिकाणी काठी उत्सवांची परंपरा होती. भारतीय उपखंडात याला निरनिराळी नावे आहेत. नेपाळमध्ये काठी उत्सव, आसाममध्ये बास पुजा, मणीपुर त्रिपुरा मध्ये काठी पूजा, बलुचिस्तानात, राजस्थान, मध्यप्रदेश सुद्धा काठी पुजा आहे. तसेच, ओरिसामध्ये तर आदिवासींची ‘खंबेश्वरी’ देवीची पूजा ही काठी पूजा असते.

गुढी हे जसे प्रतीक मानले गेले आह तसेच काठी, खांब हे पण एक प्रतीक मानले गेले आहे. ठाणे जिल्ह्यात तिसगाव येथे खांबदेव आहे. आदिवासी बांधव, येणार्‍या संकटापासून हा खांबदेव गावाचे रक्षण करतो असे मानून त्याची पूजा करतात.

नाशिक जिल्ह्यात विरगावात, गुढी पाडवा ते अक्षय्य तृतीया असा काठीकवाडी उत्सव साजरा करतात.

पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना महिती आहे, सोलापूर मध्ये गड्डा यात्रा भरते, यातील काठीला नंदिध्वज म्हणतात. याचा संदर्भ वेगळा असला तरी काठीला देवता मानले आहे. असेच कोकणात चैत्रातील जत्रेत जतरकाठी हा वीस फुटांचा सजवलेला बांबू अर्थात काठी वाजत गाजत देवस्थानात नेऊन विधिवत पूजतात.

आपल्या या प्राचीन परंपरेचे उल्लेख महाराष्ट्राच्या अनेक साहित्यात सुद्धा दिसतात.

ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनीं आनंदाला ॥७॥

राया प्राप्‍ती जाला पट । गुडी उभवी वसिष्‍ठ ॥८॥

येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हण ॥९॥ - संत जनाबाई

फोडा फोडारे भांडारें । आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥

उभवा उभवारे गुढी । सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥

झाडोनियां टाका खडे । घाला केशराचे सडे ॥७॥

नामा ह्मणे भूमंडळा । स्वामि माझा पहा डोळा ॥८॥ - संत नामदेव.

अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।

सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥ - संत ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वरी अध्याय चौथा

माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।

येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥

म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥- संत ज्ञानेश्वर .ज्ञनेश्वर, अध्याय चौदावा

अगदी म्हाइंनभट्ट यांच्या लिळाचरित्र ग्रंथापासून ,संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत तुकाराम,समर्थ रामदास, यांच्या अभंगात गुढीचा उल्लेख सापडतो. गुढी ही आनंदाचे व विजयाचे प्रतीक म्हणून परंपरेने मानले गेले आहे.

या संवत्सर सणाची भारतात विविध प्रांतात, विविध नावे आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात या नव वर्ष संवत्सरास ‘उगादी’ म्हणतात. गोव्यातील कोकणी लोक ‘संवत्सर पडवो’ साजरा करतात, तामिळ मध्ये याला ‘पुथंडू’ म्हणतात. श्रीलंकेत सुद्धा हा सण साजरा होतो. कश्मीर मध्ये हा सण काश्मिरी हिंदू पंडित ‘नवरेह’ म्हणून साजरा कारतात. आसाम मध्ये ‘बिहू’, केरळ मध्ये ‘विशु’, बंगाल मध्ये ‘नोब बोर्ष’ ,पंजाब मध्ये ‘बैसाखी’ तर भारत आणि पाकीस्तानातले सिंधी लोक चैत्रात ‘चेटीचंड उत्सव’ साजरा करतात.

भारतात सगळीकडच्या या परंपरा पाहिल्या की लक्षात येतं आपली संस्कृती ही धर्म, विज्ञान, पर्यावरण, सामाजिक आणि कौटुंबिक सलोखा या धाग्याने बांधली आहे. नव्याचं स्वागत करा. जुने जाउद्या, विसरून जा, एकमेकांशी सौहार्दाने वागा! ही आणि अशी अनेक आदर्श मूल्ये आणि संस्कार अशा सणांमधुन प्रसारित होत असतात.

म्हणून कवयित्री बहिणाबाई त्यांच्या गुढीपाडवा या कवितेत हाच संदेश देतात,

गुढीपाडव्याचा सन,

आतां उभारा रे गुढी |

नव्या वरसाचं देनं,

सोडा मनांतली आढी |

गेलं सालीं गेली आढी,

आतां पाडवा पाडवा |

तुम्ही येरांयेरांवरी,

लोभ वाढवा वाढवा ||

आजच्या सामाजिक व राजकीय सद्य परिस्थितीत हा संदेश खूप महत्वाचा आहे. म्हणूनच,

सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यतु ।

सर्वः कामानवाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु ।।

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT