निसर्ग sakal
संस्कृती

घरकुल अपुले - अनुभव निसर्गाचा

कधी पक्ष्यांच्या थव्यानं शोधलेला शांत तलावाचा विसावा, तर कधी अथांग, अफाट समुद्र

सकाळ वृत्तसेवा

मीनल ठिपसे

कुठंतरी अल्लड, अवखळपणे वाहणारी नदी, साद घालणारे डोंगर, पावसाळ्यात हिरवा शालू ल्यालेली सृष्टी, शेतात पिकलेली कणसं, तर कधी सूर्याचा आभास दाखवणारी सूर्यफुलं! सहस्र रेशमी किरणांची ओंजळ रीती करणारा तो तेजस्वी सूर्य; तर कधी शांत शीतल प्रकाश देणारा आणि सौंदर्याची परिभाषा जपणारा पौर्णिमेचा चंद्र. कधी पक्ष्यांच्या थव्यानं शोधलेला शांत तलावाचा विसावा, तर कधी अथांग, अफाट समुद्र.

पराक्रमाची गाथा सांगणारे गड, किल्ले, उन्हातान्हात शेतात राबणारे शेतकरी, निसर्गाच्या अफाट रूपाची ग्वाही देणाऱ्या दरीखोऱ्या, सावली देणारे मोठाले वृक्ष, डोंगरावरची दाट वनराई, भकास उदासवाणं माळरान, कधी काळे ढग, मातीची पायवाट आणि कौलारू घरं, अंधाराची अनुभूती देणारे बोगदे, कधी पवनचक्क्या. निसर्गात खऱ्या अर्थानं स्वतःला अनुभवता येतं.

पूर्वी आठवतंय, आई-बाबांबरोबर रेल्वेतला प्रवास! फार मजा असायची. चांदोबा पुस्तक तर विकत घ्यायचंच घ्यायचं. सुसाट पळणारी ती रेल्वे... अगदी छोटी छोटी होत जाणारी झाडं आणि गावं. आईनं घरून करून घेतलेली पोळी, बटाट्याची भाजी आणि चटणी, प्रवासात भेटणारी असंख्य माणसं. बसमधल्या प्रवासातील गमतीजमती. कंडक्टरबद्दलचं कुतूहल... पहिल्यांदा केलेला विमानप्रवास... ढगांच्या दुलईतून हळूच डोकावणारी सूर्याची किरणं!

मित्र-मैत्रिणींबरोबर दऱ्याखोऱ्यातून केलेली भटकंती. बेभान होऊन केलेलं गिर्यारोहण. सिंहगडावर खाल्लेली पिठलं भाकरी, पावसाळ्यातल्या सहलीत भजीवर मारलेला ताव, ती भाजलेली कणसं, कटिंग चहा आणि मिसळ या विषयावर रंगलेल्या चर्चा. निसर्गाशी झालेली मैत्री, नवीन ओळखी, स्वतःचीच नव्यानं झालेली ओळख... सगळंच खूप छान असतं. प्रवास म्हणजे जीवनाच्या वाटेवरून रमतगमत केलेली आनंदयात्रा. वळणावळणावर थांबायचं आणि भरभरून आस्वाद घ्यायचा.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून इवलेसे आनंदाचे क्षण ओंजळीत भरून घ्यायचे. सुखाचे क्षण वेचून घ्यायचे आणि हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवायचे. छायाचित्रण करून आठवणींची साठवण करायची. नव्या जागा, नवे देश, नवी माणसं, आयुष्य जागायच्या पद्धती, खाद्यसंस्कृती, आचार विचार सगळं जाणून घेता येतं ते प्रवास करून. अनुभवानं निरीक्षणाची जोड देऊन निसर्ग जाणून घेता आला पाहिजे. अर्थात प्रवासवर्णन हा कथा, कादंबरीसारखा वाङ्‍मय प्रकार नाही. प्रवासातील अनुभवांचं शब्दात केलेलं ललितलेखन. स्मृतिरूपी हा अनुभव आस्वादाला जातो.

अहोंच्या नोकरीनिमित्तानं काही वर्षं बाहेरच्या देशांमध्ये वास्तव्याच्या योग आला. तिथलं राहणीमान, पद्धती, आचारविचार जवळून अनुभवता आले. प्रवासानं वेगळाच आत्मविश्वास येतो. निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्याचं एक वेगळंच रूप पाहता येतं. जाणिवा सजग होतात. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. नवनवीन खाद्यसंस्कृतीची ओळख होते. लोकांना ओळखण्याचं कसब अंगी येतं. खडतर प्रसंगातून निभावून नेण्याचे मार्ग शोधता येतात.

पूर्वी आजोळ, मामाच्या घरी, एखादं देवस्थान किंवा जवळचं एखादं थंड हवेचं ठिकाण एवढंच प्रवासाचं स्वरूप होतं; पण हळूहळू संपूर्ण भारत आणि भारताबाहेर अनेक देशांत फिरायला जायची संधी मिळायला लागली. अगदी एकट्यासाठी, कुटुंबाबरोबर, फक्त स्त्रियांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले. जग जवळ आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT