टाळेबंदीनंतर लोक दुकानांसमोर; देशातील २५ राज्यांभोवती विळखा
नवी दिल्ली - देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आज देशभरातील संसर्गाने ५६२ चा टप्पा गाठला. मरण पावलेल्यांची संख्या ११वर पोचली असून यामध्ये येत्या काही दिवसांत वाढ होऊ शकते. या विषाणूच्या संसर्गाने आतापर्यंत देशातील २५ राज्यांत हातपाय पसरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर देशाच्या सर्वच भागांत आज जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांनी दुकानांबाहेर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील आज विलगीकरण पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी आणि मंत्रीमंडळातील सदस्य ठराविक अंतर राखूनच स्थानापन्न झाले होते. देशातील संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पुस्तिकेची (एनपीआर) अमलबजावणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. सध्या देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली असल्याने संपूर्ण सरकारी यंत्रणा ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सरकारने याची अमलबजावणी पुढे ढकलल्याचे बोलले जाते. कोरोनाचा विषाणू आता ईशान्य भारतात पोचला असून मिझोराममधील एका व्यक्तीला याचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. ही व्यक्ती नुकतीच नेदरलँडमधून आली होती.
तामिळनाडूत पहिला मृत्यू..
तमिळनाडूत आज एका बाधित वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.कोरोनामुळे झालेला हा राज्यातील पहिला मृत्यू असल्याचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांनी सांगितले. मरण पावलेला वृद्ध अनेक दिवसांपासून आजारी होता तसेच त्याला मधुमेहाचा देखील आजार होता अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. येथील राजाजी रुग्णालयात या वृध्दावर उपचार सुरु होते.
तर गोळ्या घालाव्या लागतील: राव
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी आज कायद्याचे उल्लंघन करत रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांना वेळ येताच गोळी घालू असे विधान केले आहे. अमेरिका आणि अन्य देशांत परिस्थिती नियंत्रणात आणता यावी म्हणून लष्कराला बोलवले जात असेल तर आपल्याकडे देखील तशी वेळ येऊ शकते असे म्हटले आहे.
कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
.. गरिबांना मदत
या संसर्गाच्या संकटाची तीव्रता लक्षात घेऊन विविध राज्यांनी सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य पुरवठा सुरू केला आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना अन्नधान्य मोफत दिले जात आहे. छत्तीसगडमध्ये गरीब कुटुंबांना एप्रिल आणि मे महिन्यासाठी मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे.
दरम्यान इराणमधील भारतीयांना घेऊन येणारे विशेष विमान आज सकाळी जोधपूर विमानतळावर उतरले. महान एअरलाइन्स या विमान कंपनीच्या विमानाने २७७ भारतीयांना मायदेशी आणले आहे . या सर्व भारतीयांना जोधपूरमधील विलगीकरण केंद्रांमध्ये ठेवले जाणार आहे. गुजरातमध्ये नियमांचे उल्लंघन करत रस्त्यांवर येणाऱ्या लोकांवर आज तेथील प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. तब्बल १४७ लोकांविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.