Discussion will be done today with constituent parties and MLAs in panji goa
Discussion will be done today with constituent parties and MLAs in panji goa  
देश

गोव्यातील राजकारण गतिमान; खातेवाटपाचा तिढा, घटक पक्ष व आमदारांशी आज होणार चर्चा 

सकाळवृत्तसेवा

पणजी - रविवार आणि गणेशोत्सवाचे दिवस असूनही गोव्याची राजधानी पणजी शहर आज गजबजलेले आहे. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाती अन्य मंत्र्यांकडे कशी द्यावीत किंवा मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी कसा निवडावा यासाठी शहरात सकाळपासून राजकीय नेते, कार्यकर्ते यांची ये जा सुरु झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये यासंदर्भात बैठका सुरू झालेल्या आहेत.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पोटाच्या विकारावर उपचार करण्यासाठी दिल्लीतील एम्समध्ये काल दाखल झाले. त्यांच्यावर पोट विकार तज्ज्ञ प्रमोद गर्ग यांनी उपचार सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडील खाती इतर मंत्र्यांकडे देण्यापूर्वी सरकारमधील घटक पक्ष, भाजपचे आमदार आणि प्रदेश गाभा समिती यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज दुपारनंतर भाजपचे केंद्रीय संघटन सचिव रामलाल, बी. एल. संतोष आणि प्रदेश संघटन सचिव पुराणिक गोव्यात येणार आहेत. 

मुख्यमंत्री यापूर्वी स्वादुपिंडावरील आजारावर उपचारासाठी ते गेल्या फेब्रुवारीपासून आजवर तीन वेळा अमेरीकेत उपचार घेऊन आले आहेत. त्यांना सध्या पचनासंबंधी त्रास जाणवत आहे. त्यांचे शरीर केवळ द्रवरूप अन्नच स्वीकारत आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी एम्समध्ये ते दाखल झाले आहेत. ते परवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी आपल्या प्रकृतीविषयी बोलले त्यावेळी झालेल्या चर्चेच्यावेळीच एम्समधील उपचाराचा विषय पुढे आला. त्यासाठी केंद्र सरकारने काल विशेष विमानाचीही व्यवस्था केली. त्या विमानातून पर्रीकर काल दिल्लीत दाखल झाले. 

मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृह, वित्त, खाण, शिक्षण,उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, वन, पर्यावरण, सहकार, कार्मिक, सर्वसाधारण प्रशासन अशी महत्वाची 21 खाती असून त्याशिवाय गेले तीन महिने इस्पितळात असलेले पांडुरंग मडकईकर आणि गेले महिनाभर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेणारे ऍड फ्रांसिस डिसोझा यांच्या खात्यांचा ताबाही मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घेतला होता. त्यामुळे अर्थसंकल्पाचा 80 वाटा असलेली खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत. 

ही खाती कोणाकडे सोपवावीत यावरून आता वाद सुरु झाला आहे. भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने ज्येष्ठ मंत्र्याकडे ही खाती सोपवावीत अशी मागणी करणे सुरु केले आहे. या पक्षाचे सुदिन ढवळीकर मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री आहेत. मात्र ढवळीकर यांचे मंत्रिमंडळातील महत्त्व वाढवू देण्यास सरकारमधील दुसरा घटक पक्ष गोवा फॉरवर्डने आक्षेप घेतला आहे. या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई कृषीमंत्री आहेत. तिसरीकडे दोन आजारी मंत्र्यांच्या जागी आमची वर्णी लावा यासाठी भाजपच्याच काही आमदारांनी प्रयत्न सुरु केले आहेत. चौथीकडे सरकारमध्ये सहभागी अपक्ष रोहन खंवटे (महसूलमंत्री), गोविंद गावडे (आदिवासी कल्याणमंत्री) यांनी पर्रीकर यांच्यावरच विश्‍वास व्यक्त केला आहे. 

या साऱ्यामुळे सरकार चालविण्यासाठी खातेवाटप करणे आवश्‍यक असले तरी ते करणे तेवढे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे आज दुपारनंतर भाजपचे निरीक्षक राज्यात येतील. त्यातूनही गुंता सुटला नाही तर सोमवारनंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्यात येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, दिल्लीला मुख्यमंत्री जाण्यापूर्वी काल त्यांची सभापती डॉ. प्रमोद सावंत आणि उपसभापती मायकल लोबो यांनी भेट घेतली. 

  • फ्रांसिस डिसोझा 10 नंतर गोव्यात -

सध्या न्युयॉर्कमधील इस्पितळातच उपचार घेत असलेले नगरविकासमंत्री ऍड फ्रांसिस डिसोझा येत्या 10 ऑक्‍टोबरनंतर गोव्यात परतण्याची शक्‍यता आहे. त्यांच्यावरील उपचाराचा पहिला टप्पा पूर्ण होऊनही प्रवासाचा शरीरावर ताण येऊ नये यासाठी त्यांनी अमेरीकेतच दुसऱ्या टप्प्याच्या उपचारापर्यंत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनेही राज्यात सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. 40 सदस्यीय राज्य विधानसभेत भाजपचे 13, काँग्रेसचे 17, मगोपचे 3, गोवा फॉरवर्डचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि उर्वरित अपक्ष आमदार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले, की राजकीय परिस्थितीवर कॉंग्रेसची नजर आहे. सध्याचा प्रश्‍न हा भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांमधील आहे. 

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला भेटीसाठी बोलावले आहे. अर्थातच मी त्यांना भेटणार आहे. - सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाममंत्री 

मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच हवेत. त्यांनी भाजपच्या अन्य मंत्र्यांकडे आपल्या खात्यांचा तात्पुरता ताबा द्यावा. मंत्रिमंडळात भाजपच्या आणखीन दोन आमदारांना संधी दिल्यास त्यांना यासाठी आणखीन पर्याय उपलब्ध होईल. - नीलेश काब्राल, आमदार 

मुख्यमंत्र्यांकडील खाती मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकाऱ्याकडेच सोपवणे योग्य ठरेल. त्यासाठी मगोचे भाजपमध्ये विलीनीकरण केले जाणार नाही. 
- दीपक ढवळीकर, मगोचे अध्यक्ष 

मुख्यमंत्र्यांकडील खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्र्यांना तूर्त विश्रांतीची गरज आहे. - मायकल लोबो, उपसभापती 

मुख्यमंत्र्यांकडील खाती ज्येष्ठतेनुसार नव्हे तर कार्यक्षमतेनुसार मंत्र्यांकडे सोपवावीत. मंत्रिमंडळ ही सामूहिक जबाबदारी असते, तेथे ज्येष्ठ, कनिष्ठ असा भेद नसतो. - गोविंद गावडे, आदिवासी कल्याणमंत्री 

सध्या भाजपने काहीही कळवले नाही. कळवल्यावर योग्यवेळी योग्य तो निर्णय आम्ही घेऊ. आता निर्णय हा भाजपने घ्यायचा आहे. - विजय सरदेसाई, नगर नियोजनमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT