नवी दिल्ली : चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताने सौर ऊर्जेच्या माध्यमातून सुमारे चार अब्ज २० लाख डॉलरचे इंधन वाचविले. त्याचप्रमाणे, एक कोटी ९४ लाख टन कोळशाचीही बचत झाली, असे ऊर्जा क्षेत्रातील ‘एम्बेर’ या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतासह आशियातील इतर देशांच्या गेल्या दशकभरातील सौर ऊर्जेच्या वापराचे ऊर्जा व स्वच्छ हवा संशोधन केंद्र, ऊर्जा अर्थशास्त्र आणि आर्थिक विश्लेषण संस्थेने विश्लेषण केले. यात सौरक्षमता असलेल्या आघाडीच्या जागतिक अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी पाच देश आशियाई असल्याचे आढळले. यात भारतासह चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.
या देशांसह फिलिपाईन्स, थायलंड या आशियातील सात देशांच्या सौर ऊर्जेतील योगदानामुळे यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान ३४ अब्ज डॉलर जीवाश्म इंधनाची बचत झाली. याच काळातील एकूण जीवाश्म इंधनाच्या खर्चाच्या तुलनेत ही रक्कम नऊ टक्के आहे, असेही अहवालात नमूद केले आहे. यातील इंधनाची मोठी बचत चीनमध्ये झाली असून चीनने कोळसा व वायूची अतिरिक्त आयात टाळून सुमारे २१ अब्ज डॉलरचे जीवाश्म इंधन वाचविले. चीनमध्ये एकूण ऊर्जेपैकी पाच टक्के गरज सौरऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. चीननंतर जपानने ५.६ अब्ज डॉलरची बचत केली. यात भारताचा वाटा ४.२ अब्ज डॉलरचा आहे. त्याचप्रमाणे, या सहा महिन्यांत भारताने सौरऊर्जेमुळे एक कोटी ९४ लाख टन कोळशाचा वापरही टाळला.
सौरऊर्जा वापरात व्हिएतनामनेही उल्लेखनीय प्रगती केली असून या देशाने १.७ अब्ज डॉलरचे जिवाश्म इंधन वाचविले आहे. व्हिएतनाममध्ये २०१८ मध्ये जवळपास शून्य टेरावॅट असलेले सौर ऊर्जेचे उत्पादन २०२२ मधील पहिल्या सहामाहीत १४ टेरावॅटवर पोचले. व्हिएतनाममध्ये एकूण ऊर्जेपैकी ११ टक्के गरज सौरऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. एकूण ऊर्जेपैकी पाच टक्के गरज सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविणाऱ्या दक्षिण कोरियाने दीड अब्ज डॉलरचे जीवाश्म इंधन वाचविले. त्याचप्रमाणे, सौरऊर्जेची नगण्य निर्मिती असलेल्या फिलिपाइन्स व थायलंडनेही यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. थायलंडने २० कोटी तर फिलिपाइन्सने आठ कोटी डॉलरच्या इंधनाची बचत केली.
ऊर्जा व स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या आग्नेय आशिया विभागाच्या संशोधक इसाबेल सुआरेझ म्हणाल्या, की महागड्या आणि अधिक प्रदूषण करणाऱ्या जीवाश्म इंधनापासून वेगाने दूर जाण्यासाठी आशियाई देशांनी आपल्या प्रचंड सौरक्षमतेचा जास्त वापर करणे आवश्यक आहे. सौरऊर्जेतून होणारी बचत तर प्रचंड आहेच, शिवाय या प्रदेशातील ऊर्जा सुरक्षेसाठी पवनऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जास्रोतावरही अधिक भर द्यायला हवा.
अलीकडील काही वर्षांत भारताने सौरऊर्जेच्या माध्यमातून केवळ आपली ऊर्जा सुरक्षाच वाढविली नाही तर देशाने सौर क्रांतीच्या दिशेनेही पाऊल टाकले आहे. नव्या राष्ट्रीय ऊर्जा योजनेनुसार येत्या दहा वर्षातही भारतात सौरऊर्जेचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
-आदित्य लोल्ला, वरिष्ठ ऊर्जा धोरण विश्लेषक, एम्बेर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.