Profitable Airline in India government update presented in Parliament : मागील काही दिवसांमध्ये देशातील आघाडीची एअर लाइन कंपनी असणाऱ्या इंडिगोमधील ऑपरेशनल संकटाने अनेक प्रश्न निर्माण केले असून, संपूर्ण प्रणालीला धक्का दिला आहे. आधीच स्पर्धक विमान कंपन्या आर्थिक संकटांचा सामना करत असताना, इंडिगोच्या सेवेतही मोठा अडथळा निर्माण झाल्याने देशभरातील लाखो विमान प्रवाशांना प्रवासासाठी मर्यादित पर्याय समोर दिसत आहेत. परिणामी विमानतळांवर गर्दी वाढत आहे आणि विमान प्रवासाचे भाडे देखील गगनाला भिडत आहेत, याचा परिणाम प्रवाशांच्या असंतोषातून दिसत आहे.
नुकतीच लोकसभेत सादर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीवरून भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचे चिंताजनक चित्र समोर आलय. मागणीत सातत्याने वाढ होत असूनही, उद्योग सध्या मोठ्या प्रमाणात तोट्यात दिसत आहे.
खरंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या लेखी उत्तरानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात नफा मिळवणारी इंडिगो ही एकमेव मोठी विमान कंपनी होती. या काळात कंपनीने ७,२५३ कोटींचा नफा नोंदवला होता. याउलट, सरकारी मालकीच्या विमान कंपन्यांना एअर इंडियाला ३,९७६ कोटी, एअर इंडिया एक्सप्रेसला ५,८३२ कोटी, अकासा एअरला १,९८६ कोटी आणि अलायन्स एअरला ६९१ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. एवढंच नाहीतर स्पाइसजेट देखील तोट्यात राहिली, तिने ५६ कोटींचा तोटा नोंदवला. मात्र स्टार एअर कॅरियर ही छोटी कंपनी यास अपवाद होती, ज्यांनी ६८ कोटींचा नफा नोंदवला.
याआधी म्हणजेच २०२२-२३ आर्थिक वर्षात, भारतीय विमान कंपन्यांना १८ हजार ६०० कोटींपेक्षा जास्त सामूहिक तोटा सहन करावा लागला होता. यामध्ये एकट्या एअर इंडियाला ११ हजार ३८७ कोटींचा तोटा झाला, तर इंडिगोलाही ३१६ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता.
मात्र यानंतर पुढील आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्येच इंडिगोने जोरदार पुनरागमन केले आणि ८ हजार १६७ कोटींचा नफा नोंदवला, परंतु इतर विमान कंपन्या तोट्याच्या दलदलीतून बाहेर पडू शकल्या नाहीत.