PM Modi’s First Reaction After Meeting CP Radhakrishnan: एनडीएने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवल्यानंतर, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी प्रथमच दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तत्पूर्वी, दिल्ली विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागतही झाले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, भूपेंद्र यादव, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदीजण त्यांचे स्वागत करण्यासाठी आले होते. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर, रविवारी सीपी राधाकृष्णन यांना एनडीएने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आहे.
पंतप्रधान मोदींनी याबाबत एक्स वर पोस्ट केली आणि म्हटले की, "सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांची प्रदीर्घ जनसेवा आणि विविध क्षेत्रातील अनुभव आपल्या देशाला समृद्ध करेल. ईश्वराच्या कृपेने, त्यांनी नेहमीच दाखवलेल्या समर्पणाने आणि दृढनिश्चयाने ते देशाची सेवा नेहमीच करत राहोत.
सीपी राधाकृष्णन यांची एनडीएचे उपराष्ट्रपतीचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) सांगितले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी नेहमीच उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्यांच्या समर्पणाने, नम्रतेने आणि बुद्धिमत्तेने एक वेगळी ओळख निर्माण केली.
तसेच, राधाकृष्णन यांनी तामिळनाडूमध्ये तळागाळात व्यापक काम केले आहे आणि एनडीए परिवाराने त्यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल त्यांना आनंद आहे. असंही मोदींनी म्हटले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आशा व्यक्त केली की विरोधी पक्ष एनडीए उमेदवाराला पाठिंबा देतील. ते म्हणाले की, पुढील उपराष्ट्रपती एकमताने निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे, ज्यासाठी आम्ही विरोधी नेत्यांशी संपर्क साधला आहे.