नवी दिल्ली - कोरोना संकटाचे संधीमध्ये रुपांतर करून स्वावलंबी भारत साकारण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केली. या पॅकेजचा तपशील येत्या काही दिवसांत अर्थमंत्र्यांकडून जाहीर केला जाईल. स्वावलंबनासोबतच स्वदेशीच्या वापराचेही मोदींनी आवाहन केले असून १८ मे पासून लाॅकडाउन वाढणार असल्याचेही आज जाहीर केले. अर्थातच चौथ्या टप्प्यातील लाॅकडाउन नव्या रंगरुपात असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
कोरोना संकटाच्या मुकाबल्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर लाॅकडाउनच्या भवितव्याबाबत पंतप्रधान मोदींच्या संदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यापार्श्वभूमीवर मोदींनी आज सुमारे ३३ मिनिटांच्या भाषणात लाॅकडाउन वाढविण्याबरोबरच २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेजही जाहीर करताना त्यात धाडसी सुधारणा (बोल्ड रिफाॅर्म्स) असतील, असे स्पष्ट सूतोवाच केले. उद्योग क्षेत्रासाठी विशेषतः लघु, मध्यम उद्योगांच्या (एमएसएईसाठी) मदतीसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी होती. मात्र, या प्रस्तावित पॅकेजमध्येच आता एमएसएमईचाही अंतर्भाव असेल, असे पंतप्रधानांकडून सांगण्यात आले. त्यासोबतच भूमीसुधार, आर्थिक सुधारणा, प्रशासकीय व्यवस्थाकडेही मोदींनी अंगुलीनिर्देश केला.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
स्वावलंबी भारत मोहिमेची घोषणा करताना मोदी म्हणाले, की मोठी झेप घेणारी अर्थव्यवस्था, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत प्रशासकीय व्यवस्था, प्रगतीची आस असलेली लोकसंख्या आणि मागणी-पुरवठ्याचे चक्र गतीमान करण्याची रणनिती या पाच स्तंभांवर स्वावलंबी भारताची इमारत, आधारीत असेल. २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज २०२० मध्ये ‘स्वावलंबी भारत’ मोहिमेला गती देईल, असा दावा मोदींनी केला. हे पॅकेज एकूण जीडीपीच्या दहा टक्के असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. या पॅकेजचा तपशील अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतंत्रपणे सांगतील, असेही त्यांनी सांगितले. अर्थात, पॅकेजमध्ये कुटीर उद्योग, गृहउद्योग, लघु, मध्यम उद्योगांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून कष्टकरी, शेतकरी, इमानदारीने कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांचाही विचार केल्याचे मोदी म्हणाले.
कोरोना संकटकाळात स्थानिक उद्योगांनी बचाव केला असल्याचे सांगताना मोदींनी ‘लोकल’चे पुरस्कर्ते व्हा असे आवाहन केले. यामध्ये स्थानिक उत्पादने वापरण्यावर आणि त्यांच्या आक्रमक प्रचारावर पंतप्रधानांनी भर दिला असला तरी स्वदेशी असा नामोल्लेख करण्याचे टाळले. आज ‘ग्लोबल’ बनलेली उत्पादने कधीकाळी ‘लोकल’ होती. वापरातून आणि प्रचारातून त्यांचा ‘लोकल’ ते ‘ग्लोबल’ असा प्रवास झाला. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने आपल्या ‘लोकल’साठी व्होकल (स्वदेशी उत्पादनांसाठी आक्रमक प्रचारक) व्हावे, असे आवाहन केले. लाॅकडाउनचा चौथा टप्पा नव्या रंगरुपात असेल, असेही मोदींनी स्पष्ट केले. यातील नवे नियम कसे असतील हे राज्यांकडून आलेल्या सूचनांच्या आधारे १८ मे पूर्वी जाहीर केले जाईल. या नियमांचे पालन करून कोरोनाशी संघर्षात विजय मिळवता येईल, असेही ते म्हणाले.
नव्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वावलंबी भारत हे एकमेव उत्तर आहे. कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती भारतासाठी संधी आहे. ठरवले तर कोणतेही लक्ष्य अवघड नाही ही भारतीयांची संकल्पशक्ती आहे. आता तर इच्छाही आहे आणि मार्गही आहे. भारत स्वावलंबी बनू शकतो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
स्वावलंबी भारत पॅकेजचे लक्ष्य
- कृषीव्यवस्था बळकट करणे
- कृषीच्या पुरवठा साखळीमध्ये सुधारणा करणे
- कर व्यवस्थेमध्ये बदल
- मनुष्यबळाचा योग्य वापर करणे
- बळकट वित्तीय व्यवस्था तयार करणे
- गुंतवणूकदारांना आकर्षित करणे,
-वैश्विक पुरवठा साखळीसाठी भारताला सज्ज करणे
- भूमी सुधारणा, श्रमसुधारणा,
- आर्थिक तरलता वृद्धी
- नवे कायदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.