जयपूर - राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने खासदारांना उमेदवारी दिली असून सत्ताधारी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी हे पक्षाच्या भात्यातील बाण असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र राठोड यांनी केले. काँग्रेसला २१ पेक्षा अधिक जागाही जिंकता येणार नाहीत, असे भाकीतही विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या राजेंद्र राठोड यांनी केले.
आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचेही सातवेळा आमदार राहिलेल्या राठोड यांनी स्पष्ट केले. खासदारांना विधानसभेची उमेदवारी देऊन भाजपने पराभव स्वीकारला असल्याची टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती. त्यासंदर्भात बोलताना राठोड म्हणाले, की राजस्थानात यंदा काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजप आपल्या भात्यातील प्रत्येक बाण वापरेल.
आमचे खासदार म्हणजे या बाणांपैकीच एक असा बाण आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींनी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. पक्षाने ४१ उमेदवारांच्या पहिल्या यादीत सात खासदारांनाही उमेदवारी दिली आहे. पक्षाने राजस्थानच नव्हे तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसारख्या राज्यांतही खासदारांना तिकीट दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल जयपूर (ग्रामीण) चे खासदार राज्यवर्धनसिंह राठोड म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणुकीचा चेहरा असतील. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाचे संसदीय मंडळ मुख्यमंत्रिपदाबद्दल निर्णय घेईल. मात्र, मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चितच नाही, आम्ही कार्यकर्ते आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यवर्धन राठोड, दिव्याकुमारी रिंगणात
जयपूर(ग्रामीण)चे खासदार राज्यवर्धनसिंह राठोड आणि राजसमंदचे खासदार दिव्याकुमारी आदींना भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. राठोड जयपूरमधील जोटवारा तर दिव्याकुमारी विद्याधरनगरमधून विधानसभेची निवडणूक लढवतील. त्याचप्रमाणे, झुंझुनूचे खासदार नरेंद्र कुमार यांनीही भाजपने मांडवामधून उतरविले आहे. अलवारचे खासदार बाबा बालकनाथ तिजारामधून, अजमेरचे खासदार भगीरथ चौधरींना किशानगढमधून तिकीट दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.