Rajnath Singh’s Strong Response to Asim Munir’s Statement: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या विधानावरून पाकिस्तानला टोला लगावला आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या विधानांवर राजनाथ सिंह म्हणाले की अलिकडेच असीम मुनीर त्यांच्या विधानावरून पाकिस्तानात आणि पाकिस्तान बाहेर संपूर्ण जगभरात खूप ट्रोल झाले आहेत.
राजनाथ सिंह म्हणाले, "सर्वांनी म्हटले की जर दोन देशांना एकत्र स्वातंत्र्य मिळाले आणि एका देशाने कठोर परिश्रम, योग्य धोरणे आणि दूरदृष्टीने फेरारीसारखी अर्थव्यवस्था उभारली आणि दुसरा अजूनही डंपरच्या स्थितीत असेल तर ते त्यांचे स्वतःचे अपयश आहे. मी असीम मुनीर यांचे हे विधान देखील त्यांची कबुली म्हणून पाहतो."
याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह असंही म्हणाले की, "पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे लुटारू मानसिकतेकडे लक्ष वेधले आहे, ज्याचा पाकिस्तान त्याच्या जन्मापासूनच बळी पडला आहे. मला वाटते की आपल्याला पाकिस्तानी सैन्याचा हा भ्रम तोडावा लागेल. ऑपरेशन सिंदूरमुळे तर त्यांच्या मनात हा भ्रम निर्माण व्हायलाच नको होता.
परंतु आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की, भारताची समृद्धी, आपली संस्कृती आणि आर्थिक समृद्धीसोबत आमची संरक्षण क्षमता आणि आपल्या राष्ट्रीय सन्मानासाठी लढण्याची भावनाही तेवढीच सशक्त बनून रहावी. आपल्याला हे देखील सुनिश्चित करावे लागेल की, आपल्या सभ्यतेत, आपल्या राष्ट्रात लढण्याची भावनाही जिवंत राहील. असही राजनाथ सिंह म्हणाले.