Mansukh Mandaviya
Mansukh Mandaviya Sakal
देश

राष्ट्रहिताच्या नजरेतून : मेड इन भारत

शेखर गुप्ता

नवे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्या इंग्रजीची थट्टा करणाऱ्यांच्या प्रयत्नांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताने राजकारणावरील अभिजनांचे राजकीय वर्चस्व नाकारले आहे ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. (Shekhar Gupta Writes about Made in India)

नवे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीवरून निर्माण झालेल्या नव्या वादात तुम्ही कोणत्या बाजूने आहात? मोडक्या इंग्रजी भाषेवरून त्यांची थट्टा उडवायला एका गटाकडून विरोध होत आहे. मी या गटात आहे. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री असलेले राज नारायण यांनी लंडन येथे केलेल्या विधानाची मला यावेळी आठवण होते. इंग्रजी येत नसताना तुम्ही मंत्रालयाचा कारभार कसा काय चालवू शकाल, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांनी विचारला असता ‘अरे सब अंग्रेजी जानते है हम. मिल्टन, हिल्टन सब पढे है’ असे उत्तर त्यांनी दिले होते. त्यांच्याकडे बघून त्यांच्या शिक्षणाचा अंदाज कुणाला येत नव्हता. ते वयाच्या १७ व्या वर्षी विद्यार्थी नेते, स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि काँग्रेसचे सदस्य होते. ते वाराणसीमधून हिंदी भाषेत निघणाऱ्या जनमुख या साप्ताहिकाचे प्रकाशक होते. इंग्रजी यथातथा असूनही इंदिरा गांधी यांचा एकदा नव्हे तर दोन वेळा त्यांनी पराभव केला होता.

अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांनी दाख केलेल्या निवडणूक याचिकेमुळे इंदिरा गांधी यांना देशात आणीबाणी जाहीर करावी लागली होती. आणीबाणी उठल्यानंतर कारागृहातून सुटलेले राज नारायण यांनी त्यांचा रायबरेली येथून दुसऱ्यांदा पराभव केला.

दुसऱ्या गटाला मंडाविया यांचे मोडक्या इंग्रजीमधील जुने ट्विट भयंकर मजेशीर वाटत आहे. इंग्रजीचा गंधही नसलेल्या व्यक्तीला कोरोना संकटाच्या काळात देशाच्या आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी कशी दिली जाऊ शकते, असा या गटाचा सवाल आहे. भाजपमध्ये नव्या प्रतिभेची कमतरता आहे, हे त्यांच्या नियुक्तीतून दिसून येत असल्याचे या गटाचे म्हणणे आहे. इंग्रजी भाषा येण्याचा शिक्षण आणि बुद्धिचातुर्य याच्याशी काहीही संबंध नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना उपजत ज्ञान, राजकीय चातुर्य तसेच शिकण्याची तयारी यांच्यासह पक्ष संघटनेमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याची ताकद नेत्यांमध्ये असावी लागते, असे माझे मत आहे. यासाठी भाषा कधीच अडचणीची ठरत नाही.

के. कामराज हे काँग्रेसचे (१९६३ ते ६५) सर्वाधिक शक्तिशाली अध्यक्ष होते. कमालीची गरिबी आणि वडिलांच्या निधनामुळे वयाच्या अकराव्या वर्षी त्यांना शिक्षण सोडावे लागले होते. त्यांना फक्त तमीळ भाषा येत होती. पण भारतातील गरिबांच्या दुःखाची नाडी त्यांना सापडली होती. आपल्या अंगभूत क्षमतेचा पुरेपूर वापर करून त्यांनी काँग्रेसचे सर्वोच्च पद मिळवले. त्यांचे इंग्रजी म्हणाल तर ट्विटर अस्तित्वात नसल्याच्या काळातील ते नेते होते हे त्यांचे भाग्यच मानले पाहिजे. सशस्त्र सेनेच्या समारंभात साधी चप्पल घालून वावरणाऱ्या मनोहर पर्रीकर यांना आपण बघितले आहे. आतापर्यंतचे सर्वांत यशस्वी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाबू जगजीवन राम असेच सामान्यपणे वावरायचे. आपल्याला आपला गतइतिहास ठाऊक नाही.

भारतात इंग्रजीचे महत्त्व कमी मानून चालणार नाही कारण इंग्रजी ही येथे सबलीकरणाची भाषा समजली जाते. त्यामुळेच उच्चभ्रूंच्या विरोधाला इंग्रजीशी जोडण्याची चूक लोहियावाद्यांकडून झाली असे म्हणावे लागेल. हाच विचार मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशात रुजविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे पुत्र अखिलेश यांनी त्यापासून फारकत घेतली. योगी आदित्यनाथ आणि वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षणाला प्राधान्य देण्याचा विवेक दाखवला आहे. म्हणूनच इंग्रजी भाषा न येणाऱ्या नेत्यांची गावंढळ असे म्हणून निर्भत्सना करणे योग्य नाही.

भारतात सगळेच काही शाळेत इंग्रजी शिकलेले नसतात. तुम्ही कुठे शिकलेले आहात यावरही या भाषेचे ज्ञान अवलंबून असते. माझी इंग्रजी मूळाक्षरांशी ओळख सहाव्या इयत्तेत झाली. माझ्यासारखेच अनेकांनी वर्तमानपत्रे वाचून, रेडिओवरील बातम्या आणि क्रिकेट सामन्यांचे समालोचन ऐकून ही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासारखे ‘हिंदी मीडियम टाईप’ इंग्रजीत कधीच परिपूर्ण होऊ शकले नाही. पण बदलत्या भारताने आमचे इंग्रजी स्वीकारले. या महिन्यात खुल्या आर्थिक धोरणाला ३० वर्षे होत आहेत. अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कुशल कामगारांची गरज भासू लागली. ही गरज डून स्कूल, सेंट स्टिफन्स कॉलेज, ऑक्सफर्ड, केंब्रिज येथून शिकून आलेल्यांनी भागणे शक्यच नव्हते. तुमचे वडील कोण आहेत वा ते कोणत्या क्लबचे सदस्य आहेत हा प्रश्न या काळात अचानक गौण झाला. कार्पोरेट कंपन्या, स्टार्ट अप, नागरी सेवा आणि लष्करातील नियुक्त्यांमध्येही हा बदल दिसून आला.

आता मंडाविया वादाने काय धडा दिला याकडे वळू या. हिंदुत्वाने भारलेले राष्ट्रीयत्व, भ्रष्टाचाराशी लढणारा योद्धा आणि कल्याणकारी योजनांचा गरिबांना लाभ हे तीन घटक मोदी सरकारसाठी महत्त्वाचे असल्याचे माझे आकलन होते. यात अभिजन विरोधी या घटकाकडे माझे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

गेल्या दशकात इंग्रजी बोलणाऱ्या अभिजनांच्या विरोधात एकप्रकारचे बंड उभे झाले आहे. आता पाठ्यपुस्तकांमधील नेहरूंच्या उपलब्धी फारशा कुणाला भावत नाहीत, असे दिसते. पण ‘चायवाला’ ही ‘स्टोरी’ लोकांना आवडते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेस नेत्यांच्या एकदम विरुद्ध टोकावर उभे आहेत. पश्चिमेचा पगडा असलेल्या अभिजनांच्या विरोधात उभा ठाकलेला ‘देसी’ असे हे चित्र आहे. त्यामुळेच ते जेव्हा ल्युटेन आणि खान मार्केट गँग असा उल्लेख करतात तेव्हा त्याचा अर्थ या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून मी सरकार चालवत आहे, असे ते मतदारांना सांगत असतात असा आहे. त्यामुळेच ते जेव्हा ‘स्ट्रेंग्थ’ या शब्दाचे ‘स्पेलिंग’ चुकवतात असे निदर्शनास आणून देता वा मंडाविया जेव्हा महात्मा गांधी यांचा उल्लेख ‘नेशन ऑफ द फादर’ असा करतात असे सांगून त्यांची खिल्ली उडवता तेव्हा तुम्ही एकप्रकारे त्यांचाच मुद्दा त्यांच्या मतदारांपर्यंत पोहोचवत असता.

ट्रबलशूटर म्हणजे ट्रबलमेकर !

इंग्रजी भाषा बोलण्याची, लिहिण्याची आणि अर्थ लावण्याची एक वेगळीच पद्धत भारताने अंगीकारली आहे. देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजीचा वापर केला जातो. १९८१ मध्ये ईशान्य भारताचा दौरा करताना ‘ट्रबलशूटर’ या शब्दाचा सहजपणे वापर होत असताना अशी व्यक्ती संकटामधून बाहेर काढणारी असेल हा माझा समज तेव्हा खोटा ठरला. ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात ‘ट्रबलशूटर’ चा अर्थ अगदी विरुद्ध म्हणजे ‘ट्रबलमेकर’ असा होतो. बंगालमध्ये कुणी बाजारात खरेदीसाठी गेले असेल तर ‘मार्केटिंग’ला गेले असे सांगतात. पंजाबमधील लहान गावांमध्ये तुम्ही ‘एडिटर’ आहात असे सांगितले तर कुणी लक्ष देत नाही. ‘ऑडिटर’ म्हटले की त्यांचे चेहरे उजळतात. याचा अर्थ असा नाही की भारतात खराब इंग्रजी बोलणे योग्य आहे. पण त्याचा असाही अर्थ नाही की इंग्रजी बोलता येत नसेल तर तुम्हाला काहीच किंमत नाही.

(अनुवाद : किशोर जामकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT