Narendra Modi and Rahul Gandhi
Narendra Modi and Rahul Gandhi Sakal
देश

राष्ट्रहिताच्या नजरेतून : नजर २०२४ वर

शेखर गुप्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापुढे गांधी घराणे (Gandhi Dynasty) आणि काँग्रेस (Congress) आव्हान उभे करण्यात सपशेल अपयशी ठरले असताना, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा सत्तेत येणे आव्हानात्मक आहे का? आणि जर तसे आव्हानात्मक असेल तर ते आव्हान कोण आणि कसे उभे करू शकेल? (Shekhar Gupta Writes about Narendra Modi Congress BJP Politics)

या आठवड्यात दोन राजकीय महत्त्व असलेले दिनविशेष झाले. एक म्हणजे या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत आणि दुसरे म्हणजे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. २०२४ च्या उन्हाळ्याची वाट पाहत असताना या दोन्ही घटना विशेष महत्त्वाच्या आहेत. भाजप आणि कॉंग्रेस अशा दोन्ही राजकीय पक्षांचे भविष्य पाहण्यासाठी तर त्या अत्यंत उपयुक्त आहेत. आपण भूतकाळ बाजूला ठेवू या. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीप्रमाणे राजकारणात भूतकाळ हा भविष्यातील सर्वोत्तम मार्गदर्शक ठरतोच असे नाही.

तीस वर्षांपूर्वी जेव्हा राजीव यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या मागे असलेला कॉंग्रेस पक्ष आता पार बाजूला फेकला गेला आहे. २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झालेल्या ९० टक्के जागांवर कॉंग्रेसने भाजपला आव्हान दिले होते. २०१४ मध्ये हे प्रमाण ८८ -१२ असे तर २०१९ च्या निवडणुकीत ९२-८ असे होते. असे असताना मग कॉंग्रेसच्या पराभवाची आणि भाजपच्या भविष्याची चिंता आपण का करतो आहोत. कारण मतांच्या टक्केवारीचा विचार केला असता भाजपने जरी कॉंग्रेसचा पराभव केला असला तरी दोन्ही वेळा कॉंग्रेसच या शर्यतीमध्ये दुसऱ्या स्थानावर होता. दुसरे म्हणजे मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वात भाजपने ३८ टक्के मते मिळविली होती, त्यावेळी कॉंग्रेसची मतांची संख्याही २० टक्के म्हणजे भाजपच्या निम्मी होती आणि देशातील अन्य कोणत्याही पक्षाने मतांच्या टक्केवारीचा दुहेरी आकडा पार केलेला नव्हता.

‘एनडीए’मधील इतर तिन्ही पक्षांच्या मतांची टक्केवारी पाहिली तरी तीही दुहेरी आकडा पार करताना दिसत नाही. जरी यूपीएचे मित्रपक्ष डीएमके, राष्ट्रवादी, राजद या सर्व कॉंग्रेसेतर विरोधी पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत एक टक्के आणखी वाढविले तरी ते एकत्रितरीत्या २० टक्क्यांपर्यंत पोचू शकत नाहीत. अशा परिस्थितीत २०१४ आणि २०१९ मध्ये कॉंग्रेसने मात्र आपला २० टक्के मतांचा वाटा कायम राखला आहे. त्या तुलनेत भाजपविरोधी इतर पक्षांनी मात्र त्यांचे हक्काचे मतदार गमावले आहेत. राष्ट्रीय स्तरावर सत्तेच्या शर्यतीमध्ये भाजपसाठी टक्कर देईल असा केवळ कॉंग्रेस पक्ष आहे, हे भाजप नेतृत्वाला माहिती आहे. त्यामुळे जरी कॉंग्रेस सद्यःस्थितीत शर्यतीमध्ये दूर असले तरी भाजप त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. म्हणूनच ज्या राज्यात कॉंग्रेस नगण्य आहे (पश्चिम बंगाल) व जेथे आपण (भाजप) कमी आहोत (तमिळनाडू, केरळ) येथे ते कॉंग्रेसवर तुटून पडतात. राहुल गांधी यांना ‘पप्पू’ असे हिणवण्यात धन्यता मानतात. त्याचबरोबर कॉंग्रेसमध्ये असलेले पण पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्यांना चुचकारत राहतात. गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेतील निवृत्तीनंतर निरोपाचे भाषण आठवा.

ममतांचे लक्षणीय यश

मोदी-शहा यांच्यासारख्या बलाढ्य विरोधकांना पराभूत करत ममता बॅनर्जी यांनी मिळविलेला विजय त्यासाठी लक्षात घेणे आवश्यक आहे. हा विजय म्हणूनच सर्वांच्या लक्षात राहणारा आणि भारतीय राजकारणाला वळण देणारा ठरतो आहे. आपण जरी कॉंग्रेस पक्षाने हात टेकले असे म्हणत असलो तरी प्रत्यक्ष तसे असेलच असे नाही. ओमप्रकाश चौताला एका मुलाखतीवेळी म्हणाले होते, राजकारण ये धर्म-करम या तीर्थक्षेत्र नही है... ये सत्ता के लिए है.

कॉंग्रेसबाबत विचार करता हाताशी काहीच लागत नाही. गांधी परिवाराशिवाय कॉंग्रेस होत नाही.त्यांना २० टक्केपेक्षा जास्त मते मिळविता आलेली नाही.पण त्यांनी कॉंग्रेसला एकत्र ठेवले आहे. संघ एक अशी संस्था आहे, जिची उपासनाही केली जाते आणि द्वेषही केला जातो. अशा संस्थेच्या वलयाची भक्कम साथ भाजपला सद्यस्थितीत आहे. कॉंग्रेस मात्र एकाच स्तंभावर उभी आहे आणि तो म्हणजे गांधी कुटुंब. पण राजकारण कधीच एका घोड्याची शर्यत नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा तिसऱ्यांदा सत्ता मागण्यासाठी जनतेपुढे जातील तेव्हा त्यांच्या पुढे आव्हान असेल का आणि असेल तर ते कोण उभे करणार आणि कसे हे प्रश्न आहेतच.

कॉंग्रेससाठी महत्त्वाची संधी

माझे एक सहकारी द प्रिंटचे राजकीय संपादक, डी. के. सिंग मला म्हणाले होते, की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना भारतात पुढील सात वर्षांत १६ राज्यातील निवडणुका होणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर येथे फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये निवडणुका होतील तर गुजरात आणि हिमाचल प्रदेशात ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ मध्ये. तर त्यानंतर मेघालय, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण, मिझोराममध्ये निवडणुका होतील. या राज्यांचा विचार करता उत्तर प्रदेश वगळता इतरत्र कॉंग्रेस हाच भाजपच प्रमुख प्रतिस्पर्धी असणार आहे आणि या राज्यांत कॉंग्रेस पुन्हा एकदा यश मिळवू शकतो. त्यामुळेच २०२४ च्या निवडणुकीत कॉंग्रेस आव्हानात्मक बनू शकते.

मोदी-शहा यांना माहिती असणाऱ्या तीन गोष्टी

  • राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस हा एकमेव पक्ष त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे.

  • भाजपच्या तुलनेत कॉंग्रेसच्या मतांचा वाटा जास्त होऊ द्यावयाचा नाही. जर कॉंग्रेसच्या मतांचा आकडा २५ टक्क्यांपेक्षा जास्त झाला तर राष्ट्रीय राजकारणात बदल होऊ शकेल. एनडीएचे सरकार सत्तेवर येईल पण तेथे मोदी आणि शहा यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल.

  • केवळ गांधी घराणेच कॉंग्रेसला एकत्र ठेवू शकते त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने हल्ला करून कॉंग्रेसचे खच्चीकरण करणे.

  • वरील तीन गोष्टी पाहता आता मला प्रश्न पडतो, की कॉंग्रेस आणि गांधी परिवाराला हे लक्षात येतय की नाही...कदाचित ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भाजपला अगदी हलक्यात घेत असतील किंवा ते त्यांचा केवळ तिरस्कार करत असतील किंवा भाजप मोठ्या फरकाने जिंकतो आहे, हेच ते स्वीकारत नसतील.

कॉंग्रेसच्या विचारसरणीत दिसणाऱ्या तीन त्रुटी

  • नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे. २०१९ मध्ये ते जिंकले ते पुलवामातील घटनेमुळे आणि आता कोविडची साथ आणि आर्थिक पातळीवर झालेली घसरण यामुळे कदाचित मतदार विचार करतील.

  • भाजप म्हणजे संघाच्या विचारधारेतून जन्मलेला पक्ष आहे. त्यांची विचारधारा अनाकलनीय आहे. नेहरू-गांधी घराण्यावर टीका करण्यापुरती भाजप मर्यादित आहे आणि त्यांच्या भूतकाळातील नेत्यांविषयी केवळ चांगले सांगत असतो.

  • भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने केरळमध्ये डाव्या पक्षांसमवेत आघाडी केली असती तर त्यांना याचा फायदा झाला असता. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत युती केली असती तर किमान काही जागा नक्कीच निवडून आल्या असत्या आणि त्यामुळे पक्षाचे बळ वाढले असते. अलिकडच्या काळात काँग्रेस डाव्यांच्या प्रेमात पडल्याने त्यांना याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागत आहे. स्थानिक पातळीवर प्रभावशाली नेतृत्वाचा अभाव ठळकपणे जाणवतो.

(अनुवाद: प्रसाद इनामदार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT