Vande Bharat Sleeper Train
ESakal
First Vande Bharat Sleeper Train Update: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन २२ जानेवारीपासून सर्वसामान्यांना प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे कामाख्या आणि हावडा दरम्यान ही ट्रेन सुरू झालेली असून, आता या विशेष ट्रेनसाठी बुकिंग सुरू करण्यात आली आहे. प्रवासी आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट, अॅप, रेल वन अॅप आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे तिकिटे बुक करू शकता.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटनुसार, २२ जानेवारीपासून सर्वसामन्य जनता या ट्रेनमध्ये प्रवास करू शकेल. यासाठी आरक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, समोर आलेल्या माहितीनुसार २६ जानेवारी रोजी कामाख्या ते हावडा ट्रेनसाठी १२ वेटिंग तिकिटेही दिसत आहेत.
अधिकृत वेबसाइटनुसार, कामाख्या ते हावडा ट्रेनचे भाडे थर्ड एसीसाठी २४३५ रुपये, सेकंड एसीसाठी ३१४५ रुपये आणि एसी फर्स्ट क्लाससाठी ३८५५ रुपये आहे. ट्रेन क्रमांक २७५७६ कामाख्या येथून १८:१५ वाजता निघेल आणि १४ तासांच्या प्रवासानंतर ०८:१५ वाजता हावडाला येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक २७५७५ हावडा-कामाख्या (गुवाहाटी) वंदे भारत स्लीपर हावडा येथून १८:२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०८:२० वाजता कामाख्या येथे पोहोचेल.
ही ट्रेन १४ तासांत आपला प्रवास पूर्ण करेल, ज्यामुळे ती या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन बनेल. प्रवासादरम्यान, ही ट्रेन रंगिया जंक्शन, न्यू बोंगाईगाव, न्यू अलीपुरद्वार, न्यू कूचबिहार, जलपाईगुडी रोड, न्यू जलपाईगुडी, अलुबारी रोड, मालदा टाउन, न्यू फरक्का जंक्शन, अझीमगंज जंक्शन, कटवा, नवद्वीप धाम, बंदेल जंक्शन येथे थांबेल आणि हावडाला पोहोचेल.